घरमहाराष्ट्रजाणता राजा शिवरायच

जाणता राजा शिवरायच

Subscribe

उदयनराजेंची शरद पवारांवर नाव न घेता टीका

देशभरात वादंग माजलेल्या जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला. यावेळी उदयनराजेंनी जय भगवान गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही.

तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

- Advertisement -

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहीत नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं. गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा आहे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, कार्यपद्धतीने जगाला दाखवून दिलं, अनेक जाती धर्मातील लोक माझे जीवलग मित्र, कुठल्याही देशात धार्मिक स्थळी योद्ध्यांचा फोटो नसतो, केवळ आपल्या शिवरायांचा फोटो असतो, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

- Advertisement -

लोकशाहीने चाललोय, राजेशाहीने चाललो तर गोयल फियल कोण नाही. पुस्तक लांब राहील गोयलला विड्रॉल करेल. कुठे प्रबोधनकार ठाकरे? शिवाजी महाराजांचा विसर पडला असेल तर आजोबांचा विचार तरी आठवा, असं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच हल्ला चढवला.

उदयनराजे म्हणाले की, सर्वात प्रथम माझ्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आज पानिपतचा शौर्य दिवस आहे, या युद्धात जे कामी आले त्यांना श्रद्धांजली वाहतो. ही पत्रकार परिषद घेण्यामागे कोणतेही राजकारण नाही, मी कधी राजकारण केले नाही, करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरही केली जाते याचे वाईट वाटते. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही.

काल जे पुस्तक प्रकाशित झालं मी वाचलं नाही; पण वाईट वाटतं. जो गोयल म्हणून लेखक आहे त्याने मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली. वास्तविक जगात कोणाचीच तुलना शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. कोणालाही जाणता राजा म्हणता, त्याचाही मी निषेध करतो. जाणता राजा फक्त शिवाजी महाराज. त्यांनी जे कार्य केले ते जगाला दाखवून दिलं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं का?
शिवसेना जेव्हा काढली त्याला नाव दिले तेव्हा तुम्ही वंशजांना विचारायला आला होता का, महाशिवआघाडी नाव ठेवले तेव्हा विचारले का? शिव का काढून टाकले? सोयीप्रमाणे हे लोक वापर करतात, ही यांची लायकी. शिव वडा, हे वडा अरे महाराजांना काय आदराचे स्थान ठेवा ना, वडा पाव हे काय? विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवाजीच्या वेषात आलेले आमदार प्रकाश गजभिये यांच्यावर टीका करताना थर्डक्लास कोणतरी आहे, असे उदयनराजे म्हणाले.

शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली
शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. कारण आम्ही जरी वंशज असलो तरी आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. तुम्ही सर्वजण महाराजांचे कुटुंब आहे, राजांनी कधी तू कोणत्या जातीचा, किंवा धर्माचा असे मतभेद केले नाही. दादरला मोठं शिवसेना भवन आहे, तिथं महाराज कुठं आहेत बघा, खाली कोण आहे वरती कोण आहे. शिवसेना भवनावर महाराजांची मूर्ती खाली, वरती फोटो कुणाचा पाहा, वंशज म्हणून तुम्ही आमच्यासारख्यांवर टीका करता, शिवाजी महाराजांनी दिलेली आम्ही शिकवण पाळतो, निवडून येऊनही मी राजीनामा दिला, जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही, असं उदयनराजे म्हणाले.

जाणते राजे कोण?
सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही. आरक्षणाचा विषय का लांबवता. शिवसेनेने इतिहास संशोधक आहात असं म्हणत माफी मागितली. कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण त्यांचं नाव का घेता. त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहीतले राजे जाणते राजे म्हणे. राज्याचा खेळखंडोबा केलाय, किळस वाटते.

शिवसेना नाव ठाकरे सेना करा
हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं. शिवसेना नाव काढून टाका ठाकरे सेना करा ना, काय प्रॉब्लेम आहे, सरकार तर तुमचं आहे. मला पण बघायचं आहे, नाव बदलल्यावर किती तरुण तुमच्यासोबत राहतात. महाराजांचं नाव घ्यायचं अन् जातीय दंगली घडवून आणायच्या. भिवंडी आठवा, श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल काय म्हणतो. हे खोटं आहे का? तीन शिवजयंत्या? अजून किती मानहानी करायची महाराजांची? महाराष्ट्रातील जनता हे जास्त दिवस बघणार नाही. शिवस्मारकाचं काय झालं? असे प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केले.

भिवंडी दंगल कोणी केली?
कोणी उठसूठ काही बोलायचं आम्ही ऐकून घ्यायचं असं होणार नाही. प्रत्येकाने भान ठेवावं. नक्षलवादी का निर्माण होतात? ज्यांना तुम्ही निवडून देता, त्यांना कधी तरी जाब विचारणार आहात की नाही? याद राखा यापुढं महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशोबाने वागा. तुमच्या कपटीपणाचं, गैरव्यवहाराचं खापर आमच्यावर फोडलं तर परिणामाला सामोरं जावं लागेल, परिणाम काय होतील ते आत्ता सांगणार नाही. फक्त मी नाही तुम्ही सगळे महाराजांचे विचारांचे वारस आहात. हा संवेदनशील विषय आहे. आजपर्यंत महाराजांच्या नावाचं फक्त राजकारण केलं. पूर्वी चार जाती होत्या, आज चारच्या चार हजार झाल्या आहेत. भिवंडीची दंगल कोणी केली बघा. जाणते राजे म्हणवणार्‍यांनी जरा बघावं. सत्तेसाठी कठपुतली बनलेत. तुमचा वापर होऊ देऊ नका, असं चालत राहीलं तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असा सल्ला उदयनराजेंनी दिला.

पुस्तकाचे पुनर्लेखन करणार -गोयल
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त पुस्तक मागे घेणार नाही. तर त्याचे पुनर्लेखन करणार असल्याचे मत भाजप नेते जय भगवान गोयल यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, गोयल यांच्या पुस्तकावरून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.गोयल पुस्तक कसे मागे घेणार नाही, ते बघतो असा इशाराही उदयनराजे यांनी दिला होता. दरम्यान, तर वादग्रस्त पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाचण्यासाठी देणार असल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेऐवजी सोनियासेना नामकरण करण्याचा सल्लाही गोयल यांनी दिला.

उदयनराजेंवर बाबासाहेब पुरंदरेंचे संस्कार आहेत. आपण एखाद्याला लोकनायक म्हणतो, लोकनेते म्हणतो. तसे शरद पवार यांना जाणते राजे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी सातार्‍यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवले जाते.
-जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -