घरताज्या घडामोडीभारतात करोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला!

भारतात करोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला!

Subscribe

केरळमध्ये भारतातील तिसरा करोना व्हायरसचा रुग्ण आढळला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये करोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या आरोग्यविषयक धोक्याची झळ आता काही प्रमाणात भारताला देखील बसू लागली आहे. भारतात करोना व्हायरसची लागण झालेला तिसरा रुग्ण सापडला आहे. केरळच्या कासारगोड भागामध्ये हा रुग्ण आढळला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेऊन आहेत, असंही त्यांनी सांगितलं. चीनमधील वुहान प्रांतातून हा रुग्ण नुकताच परतला होता. वुहानमध्येच मोठ्या प्रमाणावर या व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत.

- Advertisement -

याआधी केरळमध्येच दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातला पहिला रुग्ण त्रिचूरमध्ये सापडला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण अॅलेपीमध्ये सापडला असून त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. २४ जानेवारीला हा रुग्ण वुहानहून अॅलेपीला परतला होता. याशिवाय पुण्यात ४ तर मुंबईत दोन रुग्ण संशयित आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, चीनमध्ये वेगाने फैलावत असलेल्या करोना व्हायरसमुळे भारताने रविवारी चीनी नागरिक आणि चीनमध्ये राहाणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी ई-व्हिसाची सुविधा स्थगित केली आहे. त्याशिवाय, ज्यांना याआधीच व्हिसा देण्यात आले आहेत, त्यांचे व्हिसा देखील रविवारपासून स्थगित ठरवण्यात आले आहेत. चीनमधून भारतात येणाऱ्या भारतीय नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्याशिवाय, जे रुग्ण आधीच चीनमधून भारतात परतले आहेत, त्यांची फोनवर चौकशी केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन त्यांना योग्य ते सल्ले दिले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -