घरक्रीडाInd vs NZ: पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडची भारतावर मात

Ind vs NZ: पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडची भारतावर मात

Subscribe

अनुभवी फलंदाज रॉस टेलरच्या दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ४ विकेट राखून मात केली. या विजयामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हॅमिल्टनला झालेला हा सामना जिंकण्यासाठी भारताने न्यूझीलंडसमोर ३४८ धावांचे आव्हान ठेवले होते, जे त्यांना चेंडू ११ राखून पूर्ण केले. न्यूझीलंडने भारताविरुद्ध धावांचा यशस्वीपणे पाठलाग करताना केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

अय्यरचे पहिलेवहिले शतक 

पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या भारताच्या सलामीवीरांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत आठव्या षटकात भारताच्या ५० धावा फलकावर लावल्या. मात्र, याच षटकात पृथ्वी (२०) आणि पुढील षटकात मयांक (३२) बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने १०२ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील ५८ वे अर्धशतक केले, पण ५१ धावांवर ईश सोधीने त्याचा त्रिफळा उडवला. पुढे अय्यरला लोकेश राहुलची चांगली साथ लाभली. अय्यरने ६६ चेंडूत आपले अर्धशतक, तर १०१ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. अखेर त्याला १०३ धावांवर टीम साऊथीने माघारी पाठवले. तो बाद झाल्यावर राहुल (नाबाद ८८) आणि केदार जाधव (नाबाद २६) यांनी अप्रतिम फलंदाजी केल्याने भारताने ५० षटकांत ४ बाद ३४७ अशी धावसंख्या उभारली.

भारताचे गोलंदाज अपयशी 

भारताने दिलेल्या ३४८ धावांचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केल्यावर गप्टिलला (३२) शार्दूल ठाकूरने बाद केले. तर टॉम ब्लंडेल (९) फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मात्र, निकोल्स (७८) आणि कर्णधार लेथम (६९) यांच्या साथीने टेलरने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. टेलरने ८१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०७ धावांची खेळी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -