घरCORONA UPDATEनिराश होऊ नका, देशातले २५ जिल्हे झालेत कोरोनामुक्त!

निराश होऊ नका, देशातले २५ जिल्हे झालेत कोरोनामुक्त!

Subscribe

देशभरात कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतानाच एक दिलासादायक आणि सकारात्मक वृत्त समोर आलं आहे. देशभरातल्या कोरोनाग्रस्त झालेल्या एकूण २५ जिल्यांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. देशातल्या एकूण १५ राज्यांमध्ये हे २५ जिल्हे आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या फैलावामध्ये ही एक दिलासादायक बाब स्पष्ट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी दररोजप्रमाणे आजदेखील देशातल्या कोरोनाची परिस्थिती सांगण्यासाठी संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली. देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आज दुपारी २ वाजेपर्यंत ९ हजार ३५२ झाली आहे. त्यातल्या ९८० जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ९०५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५१ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी देखील त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा उद्या २१वा आणि शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंसोबतच इतरही वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना दळण-वळणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच असा माल घेण्यासाठी जाणाऱ्या रिकाम्या ट्रक्सना देखील परवानगी देण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या ट्रकमध्ये एक चालक आणि एक वाहक अशा दोघांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोरोनाचा लढा यशस्वी करणारे जिल्हे:

महाराष्ट्र – गोंदिया
गोवा – दक्षिण गोवा
छत्तीसगड – राजनांदगाव, दुर्ग, बिलासपूर
कर्नाटक – देवगिरी, कोडागू, तुमकुरू, उडुपी
केरळ – वायनाड, कोट्टायम
मणिपूर – पश्चिम इंफाळ
जम्मू-काश्मीर – राजौरी
मिझोराम- पश्चिम ऐजवाल
पुदुच्चेरी – माहे
पंजाब – एसबीएस नगर
बिहार – पाटणा, नालंदा, मुंगेर
राजस्थान – प्रतापगढ
हरियाणा – पानिपत, रोहतक, सिरसा
उत्तराखंड – पौरी गढवाल
तेलंगण – भद्राद्री कोठागुडम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -