घरफिचर्ससावधान... आर्थिक विषाणू येतोय !

सावधान… आर्थिक विषाणू येतोय !

Subscribe

जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे, 200 हून अधिक राष्ट्रांना त्याचा फटका बसला आहे. हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव जात आहेत. सर्व व्यवहार ठप्प करण्यावाचून कोणताच पर्याय नसल्याने जगभरातील अर्थव्यवस्था पूर्णतः ठप्प आहे. लॉकडाऊनच्या माध्यमातून चीनने करोनावर नियंत्रण मिळवले त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन हे या साथीच्या आजारावर रामबाण उपाय दिसत असले तरी लॉकडाऊननंतर मात्र जगभरात आर्थिक विषाणू थैमान घालणार आहे. आर्थिक महासत्ता म्हणवणारी अमेरिका आता जागतिक व्यापार संघटनेला म्हणते, आम्हाला आता विकसनशील म्हणा आणि त्याप्रमाणे आर्थिक फायदे द्या, यातच करोनामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर किती खोल परिणाम केला आहे हे समजते, एकूणच अर्थ क्षेत्रातील विविध संस्था सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचे मूल्यांकन करत आहेत, त्यांचा आधार घेऊन घेतलेला हा मागोवा.

‘करोना’मुळे अख्ख्या जगाचा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेनेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाही, आजच्या घडीलाच करोनामुळे जागतिक व्यापाराला सुमारे तीस टक्के फटका बसला आहे. जग/आशिया करोना व्हायरसने अख्ख्या जगालाच अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. ही अस्थिरता कधी संपेल, जीवन सर्वसामान्य कधी होईल, काहीच सांगता येत नाही. अजूनही अनेक देश आपापल्या अपुर्‍या आरोग्यसेवेनिशी करोनाशी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतांची संख्या रोज वाढतेच आहे. अनेक देशांसाठी हा आघात वेगवेगळा असला तरी कोणत्याही देशासाठी दोन आकड्यांपेक्षा कमी नाही. आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे.

एकेकाळी असे म्हटले जायचे की जर अमेरिका शिंकली तर उर्वरित जगाला थंडी, तापाचा त्रास होतो. आता हेच वाक्य चीनबाबत बोलले जात आहे. सन 2002 साली जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा 8 टक्क्यांवरून वाढून आज 19 टक्के झाला आहे. इंडियन सेल्युलर अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, करोनाच्या उद्रेकानंतर फेब्रुवारी महिन्यात देशात उत्पादनात 80 टक्के घट झाली. मार्चमध्ये ती 60 टक्क्यांपर्यंत झाली. एका महिन्याच्या नुकसानीमुळे उत्पादन क्षेत्राचे वार्षिक उत्पादन 12.5 टक्क्यांनी कमी झाले अर्थात निम्म्याने कमी झाले. याचा परिवहन, उत्पादन, विक्री, विपणन आणि जाहिराती, वितरक, किरकोळ विक्रेते आणि कोळसा आणि ऊर्जा यासारख्या मुख्य क्षेत्रांवर अनेक पटींनी परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, जागतिक प्रवासी महसुलात एअरलाइन्सला 113 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तोटा होऊ शकतो.

- Advertisement -

जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार, आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे, पण जी काही निर्यात आहे, तीही ठप्प झाली आहे. याचा आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. उत्तर अमेरिकेच्या निर्यातीलाही प्रचंड मोठा फटका बसला आहे. आशियाई देशांना या संकटातून सावरायचे तर त्यासाठी त्यांना लवकरात लवकर आणि अनेक आघाड्यांवर तातडीने प्रयत्न करावे लागतील. तज्ज्ञांच्या मते अन्यथा आशियाई देशात भूकबळी वाढायला फार वेळ लागणार नाही. जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेची ही परिस्थिती किमान वर्षभर तरी चालेल, असा अंदाज आहे. तरीही खात्रीने अजून काहीच सांगता येत नाही. कारण करोना आपले विखारी पंजे अधिकाधिक आवळतोच आहे आणि त्यावर रामबाण इलाज अजून सापडलेला नाही. केवळ दोन महिन्यांतच जागतिक व्यापारातील उलाढाल 12 ते 32 टक्क्यांनी कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही यासंदर्भात धोक्याची घंटा वाजविलेली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, करोनाने जगाच्याच डोळ्यांत पाणी आणले आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी जागतिक विकास यावर्षी किमान 3.3 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता; पण विकास दूरच, आताच्या घडीला जागतिक विकासात तब्बल तीन टक्क्यांनी घट झाली आहे. एका अभ्यासानुसार, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचेही कंबरडे करोनाने मोडले आहे. केवळ दुसर्‍या तिमाहीतच त्यांच्या अर्थव्यवस्थेला किमान 35 टक्के भगदाड पडेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एकीकडे अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली, तर दुसरीकडे लोकांचे रोजगारही झपाट्याने जात आहेत. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लाखो लोक बेघर होत आहेत. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, दोन महिन्यांत इंग्लंडमधल्या वीस लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणायची तर आधी सर्व उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला हवेत. ते सुरू झाले तरी लोकांची त्याला मागणी असली पाहिजे. कारण करोनाने आता लोकांचे प्राधान्यक्रमच पूर्णत: बदलून टाकले आहे. या परिस्थितीतून सावरायचे तर संपूर्ण जगालाच आपापले मतभेद बाजूला ठेवून जागतिक कल्याणाच्या दृष्टीने पावले उचलावे लागतील, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी) ने अहवाल दिला आहे की, करोना विषाणूमुळे पीडित जगातील 15 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत देखील एक आहे. चीनमधील उत्पादन घटल्याचा परिणाम भारताबरोबरच्या व्यापारावरही झाला आहे आणि यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 348 दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे नुकसान सहन करावे लागू शकते. युरोपच्या आर्थिक सहकार व विकास संघटनेने (ओईसीडी) देखील 2020-21 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज कमी केला आहे. ओईसीडीने यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तविला होता, पण आता ती कमी करून 5.1 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

- Advertisement -

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवस देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले होते. त्या दिवशी मध्यरात्रीपासून म्हणजेच 25 मार्चपासून लॉकडाऊनचा कार्यकाळ सुरू झाला, ज्याचा कालावधी मंगळवारी म्हणजे 14 एप्रिल रोजी संपला. दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्याची घोषणा केली. जगातील सर्वात मोठ्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 7-8 लाख कोटी रुपयांचा झटका बसण्याची शक्यता आहे.

या लॉकडाऊन दरम्यान बहुतेक कंपन्या, उद्योग बंद पडले, उड्डाण सेवा बंद करण्यात आल्या. या लॉकडाऊनमुळे भारताची 70 टक्के आर्थिक कामे थांबली. लॉकडाऊन दरम्यान, केवळ आवश्यक वस्तू आणि शेती, खाणकाम, उपयोगिता सेवा आणि काही आर्थिक आणि आयटी सेवा चालवण्यास परवानगी होती. भारतीय अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे आणि अशा परिस्थितीत करोना साथीने पूर्णपणे अर्थव्यवस्था कोसळली आहे. यामुळे, सर्व देशी आणि परदेशी रेटिंग एजन्सींनी जीडीपी वाढीचा अंदाज या आर्थिक वर्षात 1.5 ते 2.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. एक्यूट रेटिंग्ज आणि रिसर्च लिमिटेड या रेटिंग एजन्सीने यापूर्वी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दररोज सुमारे 35,000 कोटी रुपयांचा तोटा होईल असा अंदाज वर्तविला होता. 21 दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत जीडीपीचे 7 ते 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या वाहन उद्योगात सुमारे 3.7 कोटी लोक काम करतात. भारतातील वाहन उद्योग आधीच आर्थिक मंदीचा बळी होता. आता चीनमधील मंदीमुळे भारताच्या वाहन उद्योगातही सम भागांची कमतरता भासली आहे. लॉकडाऊनचा प्रत्येक दिवस वाढत असताना परिस्थिती अधिकच वाईट होत आहे. वाहन क्षेत्र आधीच मंदीच्या आहारी गेले होते आणि आता लोकांना भविष्याबद्दल जास्त चिंता वाटू लागल्याने नवीन गाडीत गुंतवणूक करण्याची मानसिकता संपली आहे.

यंदाच्या जानेवारीपासूनच्या तिमाहीत रोजगार संधीत सातत्याने घट होत होती. सीएमआयईच्या पाहणीनुसार आपल्याकडे बेरोजगारीचा दर सुमारे 24 टक्के झाल्याचे दिसते. यात शेवटच्या एका महिन्यात साधारण तिप्पट वाढ झाली. म्हणजे दर शंभरातील चौघास वा दर चारांतील एकास रोजगार नाही किंवा त्याचा होता तो रोजगार सुटला. गेल्या कित्येक वर्षांत बेरोजगारीत इतकी वाढ झाल्याचे दिसून आलेले नाही. हे कटू सत्य आता समोर येताना दिसते. या पाहणीनुसार या काळात बेरोजगारांच्या संख्येत 60 लाखांनी वाढ झाली. तसेच या तिमाहीत दिसून आलेली बाब अशी की जानेवारीपासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रोजगार असलेल्यांच्या संख्येत 41.10 कोटींवरून 39.60 कोटी अशी घट झाली आणि बेरोजगारांची संख्या 3.2 कोटींवरून वाढून 3.8 कोटींवर गेली. यात लक्षात घ्यावयाची बाब अशी की या संदर्भातील आकडेवारी ही संपूर्ण महिनाभर गोळा केली जात असते. या आकडेवारीत लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याचा विचार आहे. एप्रिलमध्ये यात भयंकर वाढ झालेली दिसेल.

बँका, आरोग्य, दूरसंचार, माध्यमे, सुरक्षा यंत्रणा, वीजनिर्मिती वगैरे काही मोजकी क्षेत्रे सोडली तर संपूर्ण अर्थविश्वच या काळात कोलमडून गेले. ते कधी उभे राहू शकेल याचा अंदाजही आता बांधता येणार नाही अशी स्थिती. म्हणजे हे काही अपवाद वगळता सर्व उद्योग या काळात बंद आहेत. तसेच हा उन्हाळ्याचा काळ. म्हणजे शेतीची कामेही जोमात सुरू असण्याची शक्यता नाही. जी काही असतील ती हंगामाच्या पूर्वतयारीचीच. म्हणजे शेतातही रोजगार निर्माण होण्याची शक्यता नाही. याचा अर्थ असा की देशाच्या अर्थव्यवस्थेचा साधारण 70 टक्के इतका वाटा सध्या पूर्णपणे बंद आहे. हा सर्व तपशील शेती वगळता संघटित क्षेत्राचा. त्याचीच माहिती आपल्याकडे नीटपणे हाती लागते. पण आपल्या अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्राचे प्रमाण 80 टक्के वा अधिक आहे. त्याचे संपूर्ण चित्र आकडेवारीच्या माध्यमातून रंगवता येणे जवळपास अशक्यच. उदाहरणार्थ आपल्याकडे सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग म्हणजे घरबांधणी. या प्रचंड उद्योगातील कामगारवर्ग प्रामुख्याने असंघटित असा आहे. तेव्हा घरबांधणी उद्योग संपूर्णपणे थंड असताना या क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड आपोआपच चालवली गेली असणार. अन्य अनेक क्षेत्रांनाही हे सत्य लागू होते. म्हणून हे बेरोजगारीचे प्रमाण दिसते त्यापेक्षा अधिक असण्याचीच शक्यता अधिक.

जीडीपीचा दर घटला

आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअरने 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षात (2020-21) वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर 5.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यापूर्वी जीडीपी विकास दर 6.5 टक्के होता. या रेटिंग्स सोमवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह, रेटिंग एजन्सीने पुढच्या वर्षी 2021-22 मध्ये जीडीपी विकास दर 6.9 टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे. पूर्वी हा अंदाज 7 टक्के होता. स्टँडर्ड अँड पुअरच्या मते, कोविड -19 मुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्राचे सुमारे 2020 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते.

*10 ट्रिलियन डॉलर्स किंवा 74 लाख कोटी रुपये नुकसान 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे होणार.
*34.8 दशलक्ष डॉलर्स किंवा 2,575 कोटी रुपयांचे नुकसान चीनमधून निर्यात थांबल्याने भारताचे होणार.
*18 टक्के भारताच्या एकूण वस्तूंच्या आयातीमध्ये चीनचा वाटा आहे.
*60 टक्के भारताचा व्यापार पश्चिम आशिया, चीन, युरोपियन युनियन आणि अमेरिका या देशांशी आहे.
*50 अब्ज डॉलर्स किंवा 3.7 लाख कोटी रुपये नुकसान एकट्या चीनचे झाले.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -