घरफिचर्ससाहित्य रत्नाकर...

साहित्य रत्नाकर…

Subscribe

वयाच्या सोळाव्या वर्षी रत्नाकर मतकरींनी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली होती. ज्या बालसुलभ वयात मैदानातील खेळाच्या पलीकडे आणि अभ्यासाच्या पुस्तकांपलीकडचे विश्व नसते, त्या वयात माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्यातील वेडेपण एकांकिकेच्या माध्यमातून मांडण्याची समज या कुमार रत्नाकराला होती. ज्यावेळी त्यांनी ‘वेडी माणसं’ ही एकांकिका लिहिली होती त्यावेळी ते मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत होते.पुढे साहित्याचा असा एकही प्रांत नव्हता जिथे मतकरींची मुशाफिरी झालेली नव्हती. ललित लेखन, कथा, बालकथा, बालनाट्य, गूढकथा, लोककथा, नाटक, वैचारिक लेखन, अनुभव कथन अशा साहित्यातील जवळपास सर्वच लेखनावर त्यांच्या लेखणीचा सिद्धहस्त अधिकार होता. चित्रपट कथानलेखनासोबतच त्यांच्या लेखनातील कथांवर अनेक चित्रपट बनले होते. त्यांच्या ‘इनव्हेस्टमेंट’ या कथेवर त्याच नावाचा चित्रपट पडद्यावर आला होता.बालनाट्य चळवळीला त्यांचा आधार होता. व्यावसायिक नाट्य आणि प्रायोगिक नाटकांच्या वादात बालनाट्य प्रवाहाबाहेर फेकल्यासारखी स्थिती असताना मतकरींनी बालनाट्याला जाणीवपूर्वक रंगभूमीवर स्थान देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. मतकरी जरी मोठे लेखक साहित्यिक असले तरी त्यांच्यात कायम एक लहान बालकासारखे संवेदनशील मन जीवनरसाने भरलेले होते. त्यामुळे भीती, तणाव, प्रेम, आत्मियता, दुःख, वेदना अशा मानवी संवेदनांमधील अस्सल स्वभाव लेखनातून टिपताना त्यात कधीही कृत्रिमता आलेली नव्हती. मानवी स्वभाव वैशिष्ठ्यांना इतक्या ताकदीने आणि परिणामकारकपणे न्याय देणारे लेखन मतकरींचे होते. एखाद्या घटनेतील आणि जाणिवेतील कंगोरे ते पारदर्शकपणे टिपताना त्यातील सहजता आश्चर्यकारक होती. मतकरींच्या गूढकथांवर आधारीत ‘गहिरे पाणी’ नावाची मालिका एका मराठी वाहिनीवर जवळपास दोन दशकांपूर्वी सुरू होती. मतकरींच्या लेखनातील किंवा कुठल्याही गूढकथांच्या वैशिष्ठ्यामध्ये भीतीदायक कल्पनेच्या भरार्‍या आढळतात. त्यामुळे अशा कथा या भयकथा होण्याचा धोका असतोच. मतकरींच्या गूढकथांना असा धोका कधीच नव्हता. गहिरे पाणी या गूढकथासंग्रहाविषयी त्यांचे म्हणणे होते, की माणसाच्या मनाची खोली म्हणजेच गहराई मोजता येत नाही. ही गहनता गहिरता जेवढी अथांग तेवढीच गूढ आणि खोल असते. या मनाच्या तळ गाठण्याच्या अंधारअंतराळी प्रवासात मानवी स्वभावातील अनेक कंगोरे तार्‍यांसारखे चमकत असतात. लेखकाला त्याला टाळून पुढे जाता येत नाही. ज्यावेळी मनाची ही गहराई म्हणजेच इच्छा मानवी जगण्यापेक्षा मोठी होते, त्यावेळी या जाणिवेला मृत्यू किंवा काळाची मर्यादा राहत नाही. मृत्यूनंतरही या जाणिवा जिवंत असू शकतात. ज्या जाणिवांचे कोडे माणसांना उलगडत नाही. त्यामुळे त्या गूढकथा होतात. ‘गहिरे पाणी’मधील या गहनतेचा तळ मतकरींनी ढवळून काढला होता. मानवी जाणिवेतील आणि जगण्यातील गूढ मतकरींना कळाले असावे, त्यामुळेच त्यांची लेखणी भरकटली नाही.मतकरींच्या अनेक कथांवर चित्रपट आले होते. त्यांचे लेखन मानवी सहज जीवनरसाने भरलेले होते. त्यामुळेच त्याचा चित्रपट करण्याचा मोह भल्याभल्या दिग्दर्शकांना आवरता येणे सोपे नव्हते. ‘माझे घर माझा संसार’ हा सिनेमा त्यापैकीच एक होता. आजही मराठी चित्रपटांच्या आठवणार्‍या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट हटकून असतोच. मतकरींच्या लेखनाचे वैशिष्ठ्य हेच होते की वैचारिक किंवा अगदी बालनाट्यही लिहिताना त्यांच्या लेखणीत एक प्रकारचा अंगभूत सहजपणा होता. लेखकाचे माणूसपण टिकवण्यासाठी मतकरींना वेगळे विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. बालनाट्य चळवळ हा रत्नाकर मतकरींच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळेच त्याविषयी त्यांच्या लेखनातील आत्मियता अस्सल होती, सुमारे ३० वर्षे त्यांनी स्वतःच्या खिशावर पडणारा बोजा संभाळून बालनाट्याची चळवळ सुरू ठेवली होती. नाट्य, कथा, सिनेमा अशा सर्वच क्षेत्रात त्यांच्या लेखनाचा प्रभाव होता. शाळेत असतानाच वर्गाच्या हस्तलिखितासाठी ‘पन्नादाई ’ नावाची एकांकिका रत्नाकर मतकरींनी लिहिली होती आणि टागोरांच्या ‘लिव्हिंग ऑर डेड’ या गूढकथा सदृश्य कथेचा कदम्बिनी नावाने अनुवाद केला होता. गूढकथा तीही टागोरांची त्याचा बालसुलभ वयात अनुवाद करण्याची सिद्धहस्त लेखणी रत्नाकर मतकरींकडेच होती. मतकरी हे नाव अनेक कलाप्रांताशी जोडले गेलेले होतेच. त्यांचे लेखन विपुल, विविधांगी असतानाच मतकरी हे उत्तम चित्रकारही होते. झोपडीतल्या मुलांनाही त्यांनी नाटक शिकवले. या मुलांचे जगणे जीवनाशी थेट भिडणारे आणि अस्सल असल्यामुळे त्यांच्यात नाट्यबीज रूजू शकते, याची जाणीव मतकरींना होतीच. शतकाच्या पहिल्याच वर्षी म्हणजे २००१ साली पुण्यामध्ये पहिले बालकुमार साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. रत्नाकर मतकरी त्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या नाटकातील मानवी जाणिवेला स्त्रीवाद, बाल, कुमार, वैचारिक, प्रायोगिक, गूढ, कौटुंबिक अशा कुठल्याही विषयप्रवाहाची मर्यादा नव्हती. एकाच वेळेस इतक्या विविधांगी मानवी जीवनवैशिष्ठ्यांवर लेखन करण्याची क्षमता अपूर्वच होती. त्यांच्या या अपूर्वाईचे कौतुक पु.ल. देशपांडे यांनीही केले होते. पुलं म्हणाले होते, गेल्या चाळीस वर्षांत मी मतकरींची काही नाटकं पाहिली आहेत. मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की या चार दशकात ते आपल्या लेखनातील टवटवीतपणा कायम ठेवू शकले. रंगभूमी ही पोटापाण्याचा व्यावसाय म्हणून रत्नाकर मतकरींनी निवडलेली नाही. त्यांनी घेतलेले नाट्यप्रसाराचे ते व्रत आहे. लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती यात त्याने गाठलेला दर्जा त्याचे अंगभूत कौशल्य आणि रंगभूमीवरील निष्ठा दर्शवणारा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अप्रुप मतकरींना कधीही नव्हते. मराठी भाषा आणि साहित्य चळवळीविषयी अशा संमेलनातून ठोस काही केले जात नाही, असे त्यांचे स्पष्ट आणि परखड मत होते. म्हणूनच मतकरी कधीच अशा संमेलनाच्या साहित्यवर्तुळात रमले नाहीत. साहित्य संमेलनातील राजकीय हस्तक्षेप, साहित्य क्षेत्रातील राजकारण यापेक्षा जगण्याशी संबंधित साहित्यमूल्य जपण्याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यापेक्षा त्यांना रंगभूमी त्यातही बालरंगभूमीविषयी जास्त आत्मियता होती. बालके किंवा लहान मुलांच्या जगण्यात लबाडी नसते, त्यात एक प्रकारची सहजता आणि निरागसपणा असतो. लहान मुलांचे विश्व हे समाज किंवा इतर घटकांमुळे काळाच्या ओघात दूषित झालेले नसते. त्यातले जगणे हे रससशीत आणि तेवढेच निर्भेळ असते. मतकरींना माणसांचे जगणेही असेच निर्भेळ अपेक्षित असावे. म्हणूनच लेखनाच्या एवढ्या मोठ्या विविधरंगी दुनियेत आपल्या झोळीत निरागस शब्द घेऊन हिंडणार्‍या रत्नाकर मतकरींना शब्दांचे मानवी जगण्यातील खरे अर्थ उमगले असावे. त्यामुळेच ते साहित्याच्या गर्दीत हरवले नाहीत. साहित्यिकांच्या समुहात रमले नसावेत…रत्नाकर नावाचा हा साहित्यसूर्य म्हणूनच एकमेव होता.१७ नोव्हेंबर १९३८ मध्ये उगवलेला साहित्य रत्नाकर मावळल्याने, नाट्य, बालनाट्य, कथा, साहित्य आणि सिनेमा अशा सर्वच शब्द क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्याहीपेक्षा जास्त नुकसान मानवी जगण्याचे झालेले आहे आणि प्रत्येक माणसात लपून बसलेल्या एका बालमनाचे झालेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -