घरताज्या घडामोडीसंगमनेरमध्ये करोना संशयिताचा मृत्यू

संगमनेरमध्ये करोना संशयिताचा मृत्यू

Subscribe

अहवालानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट; मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात

नगर जिल्ह्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या संगमनेरमधील एका करोनासदृश संशयिताचा मंगळवारी नगरच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे अहवाल अद्याप प्रशासनास मिळाले नसल्याने अहवाल येईपर्यंत मृतदेह जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहे. मृत झालेली व्यक्ती संगमनेरमधील निमोण परिसरातील आहे. तहसीलदार अमोल निकम यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

निमोण परिसरातील एक व्यक्ती उपचारासाठी रविवारी ग्रामीण रुग्णालयात आली होती. या रुग्णाच्या एक्स रे मध्ये न्युमोनियासदृष्य लक्षणे आढळल्याने त्याला उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्याचे स्त्राव घेऊन ते तपासणीसाठी पुण्याच्या लष्करी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मात्र, त्याचे अहवाल येण्यापूर्वीच त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. करोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या संगमनेरसाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान संबधित मृत व्यक्तीचे पुन्हा स्त्राव घेण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल. यापुर्वी संगमनेरमध्ये एका करोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या अहवालाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

श्वसनाच्या त्रासामुळे निमोण परिसरातील व्यक्तीत करोनासदृश तीव्र लक्षणे आढळल्याने त्याला तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचे स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल अद्याप जिल्हा प्रशासनाला मिळाला नव्हता. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र, या रुग्णाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने त्याचा अहवाल येईपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच ठेवला जाणार आहे. सोमवारी नाशिकमध्ये उपचार घेणारा रुग्ण करोनाबाधित असल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी करोना संशयिताचा मृत्यू झाल्याने हा दुसरा धक्का आहे. यामुळे संगमनेर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले आहे. तहसीलदार निकम यांनी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले असले, तरी रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नव्हती.

जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संगमनेरमध्ये, नऊ अहवाल प्रलंबित

आतापर्यंत संगमनेरमध्ये सर्वाधिक करोनाबाधित आढळले आहेत. नगर जिल्हा प्रशासनाकडे १७ जणांची नोंद असून एकावर नाशिकमध्ये उपचार सुरु असल्याने तो नाशिकच्या यादीत धरण्यात आला आहे. तर धांदरफळ येथील एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला असून त्याच्या संपर्कातील सात जणांना करोनाची लागण झाली होती. त्यांनादेखील सोमवारी जिल्हा रुग्णालयातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर संगमनेरमध्ये आश्रयाला थांबलेल्या चार नेपाळच्या तबलिगींना व शहरातील तिघा जणांना करोनाची बाधा झाली होती. याशिवाय तालुक्यातील आश्वी येथील एकाचा तर शहरानजीकच्या कुरण रोडवरील एका महिलेचा यात समावेश आहे. संगमनेरमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या आहे. त्यामुळे अद्यापही संगमनेर जिल्हा प्रशासनाच्या रडारवर असताना आता नव्याने गेल्या दोन दिवसांत एक बाधित रुग्ण आढळून आला. त्याच्या संपर्कातील सात जणांचे आणि चणेगाव येथील एकासह मंगळवारी मृत झालेल्या व्यक्तीसह नऊ लोकांचे अहवाल प्रलंबित असून चणेगाव येथील व्यक्तीचा स्त्राव दुसर्‍यांदा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आता या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर रहेमतनगरमधील संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -