घरCORONA UPDATEमहापालिकेच्या अभियंत्यांवर कारकुनी कामाची जबाबदारी!

महापालिकेच्या अभियंत्यांवर कारकुनी कामाची जबाबदारी!

Subscribe

अभियंत्यांची मदत मान्सूनपूर्व कामांसाठी घेवून अशाप्रकारची कारकुनी कामे महापालिकेच्या इतर लिपिक व अधिकारी वर्गांकडून करून घेणे आवश्यक असताना, या कामांसाठी अभियंत्यांची केलेली नियुक्ती ही महापालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे दर्शन घडवत आहे.

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांवर कोविड केअर सेंटरच्या उभारणीची जबाबदार सोपवल्यानंतर आता याच अभियंत्यांची मदत कारकुनी कामांसाठी घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने तब्बल २१ दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. अभियंत्यांची मदत मान्सूनपूर्व कामांसाठी घेवून अशाप्रकारची कारकुनी कामे महापालिकेच्या इतर लिपिक व अधिकारी वर्गांकडून करून घेणे आवश्यक असताना, या कामांसाठी अभियंत्यांची केलेली नियुक्ती ही महापालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे दर्शन घडवत आहे.

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने २१ दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू व सामान्य प्रशासन विभागाचे सहआयुक्त मिलिंद सावंत यांनी १९ मे रोजी यासर्वांच्या नियुक्तीचे आदेश बजावले आहे. यासर्वाची नियुक्ती छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे परदेशातून उतरणाऱ्या प्रवाशांच्या माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी केले आहे.

- Advertisement -

मलनि:सारण प्रकल्प, वास्तु शास्त्र विभाग, मलनि:सारण प्रचालन, जलकामे, मालमत्ता, रस्ते व वाहतूक विभाग तसेच इमारत देखभाल विभागांच्या दुय्यम अभियंत्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अभियंते माहितीचे व्यवस्थापन करतानाच परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी करणे, मुंबईत राहणाऱ्या प्रवाशांची स्वतंत्र यादी तयार करणे तसेच मुंबई बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची पुढील सोय करणे यासह हॉटेलमध्ये नेण्यासाठी बेस्टसोबत समन्वय साधून प्रवाशांची सोय करण्याची जबाबदारी आहे. कोरोनासाठी नेमलेल्या विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व दुय्यम अभियंते काम करत आहेत.

अभियंत्यांची मदत तांत्रिक कामांसाठी घ्या

कोरोना कोविडच्या कामांमध्ये महापालिकेचे अभियंते हे तांत्रिक कामांऐवजी झोपडपट्टयांमध्ये अन्नाची पाकिटे वाटतच आहेत. आता तर विमानतळावर कारकुनी कामांसाठी अभियंत्यांना जुंपले जात आहे. परंतु पावसाळा तोंडावर आल्याने रस्ते दुरुस्ती, नालेसफाई तसेच इतर देखभालीची कामे आजही अपूर्णावस्थेतच आहेत. मुंबई तुंबू नये यासाठी तसेच त्यांना पावसाळ्यात कोणताही त्रास होवू नये यासाठी ही कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविड-१९ अंतर्गत तांत्रिकी कामे वगळता अन्य कामे करणाऱ्या अभियंत्यांना परत अभियांत्रिकी खात्यांमध्ये पाठवण्यात यावे, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी यापूर्वी केली होती. त्यामुळे प्रशासनाने अभियंत्यांचा वापर कुठे करावा, हेच जर प्रशासनाला कळत नसेल तर दुर्देव आहे, असे युनियनने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -