घरफिचर्सलढवय्या!

लढवय्या!

Subscribe

सामान्य कार्यकर्त्याविषयी जिव्हाळा बाळगणारे, मृदू भाषिक, पण लढवय्ये पत्रकार दिनू रणदिवे यांचे मंगळवारी १६ जूनला निधन झाले. मागच्याच महिन्यात 16 मे रोजी त्यांची पत्नी सविता यांचे निधन झाले. दोघेही चळवळीतील, पण पती-पत्नी प्रेमाचा, आत्मियतेचा, स्मृतीचा आदर्शमय झराच जणू! मागच्याच वर्षी दिनूंच्या वाढदिवशी दिनू सविता वहिनींना म्हणाले, भीतेस कशाला? आपण दोघेही एकत्र जाऊ.’ पहा, सविता वहिनींना जाऊन जेमतेम महिना होतो आणि त्या गेल्यानंतर जेवण टाळणे, हा स्नेहासाठीचा भूक सत्याग्रह नव्हे काय?

दिनू वय वर्षे 95, तरीही ते अबालवृद्धापर्यंत सर्वांचेच दिनू. कोणी त्यांना दिनकरराव म्हणून संबोधलेले मला आठवत नाही. डावखुर्‍या हाताने लेखणी चालविणारे दिनू समाजवादी विचार मंथनातून घडले. ते तत्वनिष्ठ होते, पण भिडस्त नव्हते. विचाराच्या गर्तेत ते स्वतःला झोकून देत. परिस्थिती साधारण असूनही ते कुठल्या मोहात पडले नाहीत. विचारवंतांचा आदर करत ते वावरले. चळवळीत राबणार्‍या कार्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी होती.

नेत्यांविषयी आदरभाव व्यक्त करताना त्यांनी स्वयंसेवक वा सैनिकवृत्तीने कामे केली. 1984 च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी हे जेव्हा आजारपणात रुग्णालयात होते, तेव्हा अण्णांच्या सेवेत असलेल्या ‘कॉफी क्लब’मध्ये दिनू रणदिवे हेसुद्धा सदस्य होते. अण्णांच्या ‘मी एस. एम.’ या आत्मकथनाचे पहिले वाचकही तेच होते.

- Advertisement -

दादर पश्चिमेच्या उड्डाणपुलाला विरोध करताना पुलावरील वाहतुकीने होणार्‍या दुष्परिणामाविषयी ते पोटतिडकीने बोलत. पण यावेळी या वृद्ध पत्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले. गाड्यांच्या धुरांड्यात वसाहतीतील लोक अडकून !कॅन्सर’सारख्या रोगांचे बळी होतील, हे त्यांचे वाक्य पुढे खरे ठरले. तो आजार सविता वहिनींच्या मागे लागलाच ना!

उड्डाणपुलालगतच्या ‘घामट टेरेस’मध्ये आता दोनच कुटुंबे, एक चरणकर नावाचे वादक आणि दुसरे रणदिवे. बाकी या चाळीचे व्यापारीकरण झालेले. दिनूंचे घरही एखाद्या रद्दी पेपरच्या दुकानासारखे भरलेले दिसले तरी त्या वर्षानुवर्षे साठलेल्या रद्दीत विचारांचा आगळा गंध-दर्प होता. त्यावर साचलेला धुरळा म्हणजे वैचारिक चळवळीचा उधळला जाणारा ‘बेल-भंडारा जणू’. तो भंडारा तेथे प्रवेश करणार्‍याच्या अंगाला लागला की, विचाराने तो कार्यकर्ता लढवय्या झाला नाही तरच नवल! दिनूंचे घर म्हणजे विचारांची पुंजी. त्याग, तत्व, वात्सल्य, सत्य, चळवळ यांचे केंद्र जणू! ‘घामट टेरेस’मध्ये सारे व्यापारी पण रणदिवेंच्या उंबरठ्यावर व्यापार शृंखला तुटली. तिथे उगवले सामाजिक बांधिलकेचे अंकुर.

- Advertisement -

दिनूंनी आयुष्यभर निर्भीड पत्रकारिता जोपासली. आणीबाणीविरोधी त्यांनी लिहिले. पायपीट करत बातम्यांचा जिवंतपणा ठेवला. चळवळीत राबणारे तळागाळाचे कार्यकर्ते हे आपला आधार असल्याचे ते मानत. त्यांच्यातील सत्यता हेरून त्यांना प्रकाशमान केले. कोणी जिवलगही झाले. बाबू मुंबरकर, रेड्डी, लक्ष्मण जाधव, प्रभाकर मोरे, विष्णू आंग्रे, चंदू मेढेकर, दत्ता आयरे, राजा केळकर, चं.ह.ताम्हाणे, जं.शं.आपटे ही मित्रमंडळी त्यापैकीच होती.

दिनूंच्या पत्रकारितेचा प्रारंभही चळवळीतून झाला. 1940 च्या दरम्यान त्यांनी लोकमान्य टिळकांवर पुस्तक लिहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुखपत्रिकेचा जन्म दिनूंच्या सिद्धहस्त लेखणीने झाला. स्वतःच्या अंकात व्यंगचित्र असावं या विचाराने बाळासाहेब ठाकरेंच्या कुंचल्यातून व्यंगचित्र मिळविणारे दिनू आणि सविता होते! स्वतःला वृत्तपत्र सेवेत वाहून घेतल्यानंतर लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांची आत्मियता या बळावर दिनूंना अनेक पुरस्कार मिळाले. पण त्यांनी संस्थांनी दिलेल्या रकमा परत केल्याची बरीच उदाहरणे आहेत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवामुक्ती संग्रामात झोकून दिलेल्या या लढवय्याने आंतरभारतीचे स्वप्न पाहिले. वैचारिकरित्या त्यांनी गुजराथी भाषिक सविता वहिनींशी विवाह केला. जीवनात एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडिस, मृणालताई गोरे यांना दिनूंनी आपले आदर्श मानले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्याच्या इतिहासाचा नुसता साक्षीदार नव्हे तर त्यातला लढवय्या सैनिक आणि लढवय्या पत्रकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

हजारो चाहते, अनेक अनुयायी आताच्या करोना परिस्थितीत दिनूंच्या अंत्यदर्शनाला येऊ शकले नाहीत. पण दिनू तुमच्या विचारांची पायपीट आम्ही आमच्या हृदयात जतन करुन ठेवली आहे. तुमच्याच मनातली गर्जना म्हणतो ‘संयुक्त महाराष्ट्र चिरायू होवो.’

-भास्कर सावंत 

-(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -