घरफिचर्सज्येष्ठ पत्रकार, कार्यकर्ते दिनू रणदिवे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, कार्यकर्ते दिनू रणदिवे यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते दिनू रणदिवे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. दादर येथे त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे निधन झाले होते. त्या ९२ वर्षांच्या होत्या. सविता यांच्या निधनानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. दादर शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नव्वदी पार केलेले दिनू रणदिवे हे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. वयोमानामुळे त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र त्यांचे काम सतत सुरू होते. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व नव्या पिढीतील तरुणांचा त्यांच्या दादर येथील घरी सतत राबता असे. त्यांच्याशी ते अथक संवाद साधत. अनेकांना अभ्यासासाठी संदर्भ पुरवण्याचे त्यांचे काम काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरू होते.

पत्रकारितेचा आदर्श अशी त्यांची ओळख होती. १९२५ साली डहाणूतील आदिवासी भागात त्यांचा जन्म झाला होता. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्याचा सक्रिय सहभाग होता. १९५६ साली पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. तसेच या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबर कारावासही भोगला.

- Advertisement -

संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाचे अनियतकालिक सुरू केले. महाराष्ट्र पत्रिकेपासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली होती. नंतर १९६२ मध्ये सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले आणि महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्ती लढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’बरोबर ‘लोकमित्र’ या नियतकालिकाचेही संपादन केले होते. अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या कादंबर्‍यांवरून बेतलेल्या आणि पुढे सिनेमाच्या पडद्यावर आलेल्या ‘सिंहासन’ सिनेमात दिगू टिपणीस ही एका झुंजार पत्रकाराची भूमिका होती. ती दिनू रणदिवे यांच्यावरून बेतली होती. दिवंगत निळू फुले यांनी केलेली ही भूमिका अजरामर ठरली.

पत्रकारितेतील वैभव गेले-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ज्येष्ठ पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे’ , अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

एक महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्यावर आघातच झाला होता. प्रत्येक लढ्यात त्यांची साथ असायची. संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला असून पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -