घरताज्या घडामोडीखासगी रूग्णालयांचे नियंत्रण आता महापालिकेच्या हाती

खासगी रूग्णालयांचे नियंत्रण आता महापालिकेच्या हाती

Subscribe

मनमानीला बसणार चाप : संपर्क अधिकारी नियुक्त करणार

 

करोना रूग्णांना खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेतांना येणार्‍या अडचणी, रूग्णालयांकडून रूग्णांची केली जाणारी आर्थिक लूट, रूग्ण दाखल करून घेण्यात केली जाणारी टाळाटाळ यासारख्या तक्रारींची दखल घेत आता खासगी रूग्णालयांचे नियंत्रण महापालिकेच्या हाती असणार आहे. तसेच प्रत्येक रूग्णालयात संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात येउन नागरीकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

- Advertisement -

शहरामध्ये करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सरकारी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार करतांना अनेक अडचणींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. रूग्णांलयांमध्ये बेडसची कमतरता, वैद्यकिय, निमवैद्यकिय मनुष्यबळाचा अभाव यामुळे सरकारी रूग्णालयांत उपचार करणे मुश्किल बनले आहे. या परिस्थितीत करोना बाधितांना तातडीने उपचार मिळावेत याकरीता शहरातील २१ खासगी रूग्णालयांमध्ये ७५० बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. अनेकांना करोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर उपचार कुठे घ्यावेत याची माहीती नसल्याने खाजगी रूग्णालयांमध्ये विचारणा करतात. मात्र अनेक ठिकाणी अशा रूग्णांना माहीती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने रूग्णांचे हाल होतात. एखाद्या रूग्णालयांत दाखल करून घेण्यात आले तरी, रूग्णांकडून उपचारासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होउ लागल्या आहेत. सरकारी रूग्णालयांतून तर करोना रूग्णांना खासगी रूग्णालयांत उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एजंट कार्यरत झाल्याचीही चर्चा आहे. यातून उपचार तर बाजूलाच परंतु रूग्णांची आर्थिक लूटच होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहे. शहरातील काही रूग्णालयांमधून करोना रूग्णांना चांगली सेवा दिली जात असली तरी काही रूग्णालयांच्या या मनमानी धोरणामुळे आरोग्य व्यवस्था बदनाम होत आहे. याकरीता आता खासगी रूग्णालयांमधील करोना रूग्णांचे अ‍ॅडमिशन महापालिका प्रशासनामार्फत केले जाईल असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. त्यामुळे आता खासगी रूग्णालयांना कोणत्याही रूग्णास करोनासाठी राखीव बेडवर दाखल करून घेता येणार नाही. काही रूग्णालयामध्ये तर करोनाची लक्षणे नसलेल्या रूग्णांना अ‍ॅडमिशन दिल्याने ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यांना जागेअभावी उपचार मिळणे कठिण बनले आहे. त्यामुळे कोणत्या रूग्णास कोणत्या रूग्णालयात दाखल करायचे याचे नियंत्रण महापालिकेच्या हाती असणार आहे. याकरीता प्रत्येक खासगी रूग्णालयांत संपर्क अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांना एकाच संबंधित अधिकार्‍यासोबत चर्चा करता येईल, तसेच पेशंटला कुठल्या रुग्णालयात पाठवायचे आहे याबाबत मदत होणार आहे.

कारवाईस भाग पाडू नका

करोनाशी लढाई लढतांना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. सरकारी रूग्णालयांमध्ये सध्या काही गोष्टींची कमतरता आहे याकरीता खासगी रूग्णालये अधिग्रहीत करण्यात येत आहे. त्यामुळे या रूग्णालयांनीही प्रशासनाला या संकट काळात सहकार्य करावे. कारवाई करण्याची आमची इच्छा नाही. परंतु गंभीर तक्रारी येत असल्यास प्रशासनाला कारवाइ करण्यास भाग पाडू नका असा इशारा देत रूग्णालयातील अ‍ॅडमिशनबाबत आता महापालिका प्रशासनाने नियंत्रण ठेवावे असे आदेश पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -