घरCORONA UPDATEअक्कलकोटच्या समर्थ अन्नछत्रात कोविड केअर सेंटर निर्मितीमुळे भक्तांमध्ये संताप

अक्कलकोटच्या समर्थ अन्नछत्रात कोविड केअर सेंटर निर्मितीमुळे भक्तांमध्ये संताप

Subscribe

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानातील अन्नछत्राच्या यात्रीनिवास इमारतीत कोविड सेंटर बनवण्यात आले आहे. लाखो स्वामी भक्तांच्या श्रध्देचा विषय असलेल्या स्वामी समर्थांच्या अन्नछत्र संचालकांनी विनवण्या करुनही इथले कोविड सेंटर यात्री निवास इमारतीतच कायम ठेवण्यात आल्यामुळे स्वामी भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत सोलापूरच्या पालकमंत्र्यांकडे कैफियत मांडूनही ही समस्या तशीच असल्याने स्वामी समर्थांच्या भक्तगणांत भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात. या भक्तांच्या सोयीसाठी परिसरात अन्नछत्र चालवण्यात येते. या अन्नछत्रात दररोज सुमारे १५-१८ हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. दानशूर भक्तांच्या तसेच सामाजिक संस्थांच्या पाठिंब्याने याच परिसरात भक्तांना राहण्यासाठी यात्री निवासची सोय करण्यात आली आहे. याच इमारतीचा ताबा कोविड केअर सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये ज्यांना लक्षणं दिसत नाहीत, पण जे पॉझिटिव्ह आहेत अशा रुग्णांना ठेवण्यात आले आहे. याबाबत अनेक स्वामी भक्तांनी आणि अन्नछत्र संचालकांनी तहसिलदार अंजली मरोड यांना हे कोविड केअर सेंटर दुसरीकडे हलविण्याची विनंती केली.

- Advertisement -

मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तहसिलदारांकडून सांगण्यात आलंय. या कोविड केअर सेंटरला भक्तनिवासमध्ये किंवा जवळच बांधून तयार असलेल्या म्हाडाच्या इमारतीत या पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र त्याला केराची टोपली दाखवली गेली आहे. मंदिराच्या शेजारीच असलेल्या भक्तनिवासमध्ये रुग्णांची सोय न करता अन्नछत्राला वेठीला धरण्यात येत असल्याची स्थानिकांची भावना आहे. अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचे १६७ रुग्ण आहेत. त्यातील ९५ रुग्ण बरे झाले आहेत. ५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, त्यातील ३० रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये आहेत.

mhada building akkalkot
अन्नछत्राजवळच बांधून तयार असलेली म्हाडाची इमारत

स्वामी समर्थ अन्नछत्राचे सचिव एस.एस.मोरे यांनी याबाबत सांगितले, आम्ही सरकारला सर्वतोपरी मदत करतोय. फक्त आमच्या यात्री निवासमध्ये लक्षणं न दिसणारे पॉझिटिव्ह रुग्ण ठेवले आहेत. त्यांना देवस्थानाच्या रुग्णालयात दाखल करावे कारण त्या रुग्णालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच आमच्या परिसरात विलिगीकरणात असलेल्यांना ठेवायला आमची काहीच हरकत नाही. आम्ही जे करतोय त्याउपरही सर्वतोपरी सहकार्याला तयार आहोत’ असंही मोरे म्हणाले.

- Advertisement -

अन्नछत्राच्या संचालकांना होत असलेल्या त्रासामुळे समर्थ भक्तांच्या वाढत्या नाराजीचा रोख तहसिलदार अंजली मरोड यांच्यावर आहे. त्या आकसाने अन्नछत्राला त्रास देत असल्याची टिका मुंबई-पुण्यातील काही स्वामी भक्तांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून या समस्येचं निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना सांगण्यात आले. मात्र परिस्थिती बदलत नसल्याने समर्थ भक्तांनी ‘आपलं महानगर’ कडे कैफियत मांडली. त्याबाबत तहसिलदार अंजली मरोड यांना संपर्क साधला असता, आपण आकसाने काही करत नसल्यांचं सांगून त्या पुढे म्हणाल्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने इमारत अधिग्रहित केली आहे. या इमारती प्रमाणे इतरही १० इमारती ताब्यात घेतल्या आहेत. तरीही कोविड केअर सेंटर तिथून हलवून दुसरीकडे नेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या तर आपण त्याचे तंतोतंत पालन करु असंही त्या म्हणाल्या.

Collector Milind Shambharkar and Anjali Marod
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि तहसीलदार अंजली मरोड

याबाबत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. त्यांना प्रतिक्रियेसाठी लघुसंदेश पाठवला त्यालाही जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे लाखो समर्थ भक्तांच्या या श्रध्देच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी, पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -