घरफिचर्सश्रावण... निसर्गाचा उत्सव

श्रावण… निसर्गाचा उत्सव

Subscribe

श्रावण सुरु होणार म्हटल्यावर सृष्टीची ऐट ती काय विचारता ....! .संपूर्ण माळरान हिरव्या छटांनी नटलेली असते. शेताच्या मेरेवरून फिरताना आजूबाजूंच्या कुणग्यात भाताची रोपं गुडघाभर उंचीला आलेली असतात... त्या पात्यांचा पायाला होणारा स्पर्श किती मोहरून टाकायचा. शेतात आता कोणी दिसणार नाही.. पण शेतातून फेरी मारताना ह्या तरव्याचा गंध नाकात नुसता भरून घ्यावा ...हा गंध मनभावन आहे. त्या तरव्याचा होणारा ओला स्पर्श मनाला किती सुखद अनुभव देतो!

आषाढ महिना जसा संपत येतो तसा पावसाचा जोर कमी होतो. पावसाचा जोर कमी होतो म्हणण्यापेक्षा त्याच्या वागण्यात शिस्त येते, सात्विकता येते, आषाढात धुंद, मस्त बरसणारा पाऊस आता श्रावणात सरींच्या माध्यमातून शांत धार धरतो. आषाढाच्या सरींनी झोडपली गेलेली जमीन श्रावणाच्या त्या शांत सरींनी मोहरून गेलेली असते. सृष्टीच्या त्या रम्य वातावरणात श्रावणातले कोवळे उन लोभस वाटू लागते.

ग्रीष्मातल्या कडकडीत उन्हाच्या झळा आणि आषाढातला बेधुंद पाऊस यांचे मनोहर रूप म्हणजे श्रावण. यात उन पावसाचा रम्य खेळ सतत चालू असतो. नदी -ओहोळ जे आतापर्यंत खळखळ वहात होते, बेधुंदपणे पुढे जात होते. एखाद्या षोडशतरुणासारखे बेछुटपणे वागत होते, ते आता समंजसपणे सरसरत जातात. त्यांच्या वहाण्याची गती जी मंदावत नसली तरी त्यांचा खळखळाट मात्र कमी झाला असतो.

- Advertisement -

चहूकडे जमलेले काळे ढग आता दिसेनासे होतात आणि उन पावसाच्या खेळात आकाशात इंद्रधनू दिसू लागते. इतके दिवस ही धरणी उन्हाला पारखी झाली होती. आषाढाच्या सरींनी त्या उन्हाला जमिनीवर पोचूच दिले नव्हते. त्या उन्हाला गच्च काळ्या मेघांनी दाटून टाकले होते ….आता ही ही कोवळी उन्हं जमिनीवर मुक्तहस्ते संचार करणार ….त्यांनी पावसाशी गट्टी केलेली असते…त्यामुळे या पुढे उन्-पाऊस एकत्र, हातात हात घालून जमिनीवर अवतरणार असतील. श्रावणातला पाऊस देखील तसा लहरीच..कधी कोसळेल त्याचा नेम नाही. अशावेळी अचानक बालकवी आठवतात …अशाच कुठल्यातरी श्रावणाच्या गंधित वातावरणात त्यांना

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनी येते अवनीवरती ग्रहगोलची कि एकमते
असं काही सुचलं असेल.

- Advertisement -

श्रावण सुरु होणार म्हटल्यावर सृष्टीची ऐट ती काय विचारता ….! .संपूर्ण माळरान हिरव्या छटांनी नटलेली असते. शेताच्या मेरेवरून फिरताना आजूबाजूंच्या कुणग्यात भाताची रोपं गुडघाभर उंचीला आलेली असतात… त्या पात्यांचा पायाला होणारा स्पर्श किती मोहरून टाकायचा. शेतात आता कोणी दिसणार नाही.. पण शेतातून फेरी मारताना ह्या तरव्याचा गंध नाकात नुसता भरून घ्यावा …हा गंध मनभावन आहे. त्या तरव्याचा होणारा ओला स्पर्श मनाला किती सुखद अनुभव देतो! त्या वातावरणात एक सात्विक उत्तेजना आहे. श्रावणी वातावरणाला सुरुवात होते ती मुळात आकाशात दिसणार्‍या इंद्रधनुने…. शेताच्या आजूबाजूला असणार्‍या तणांना कुठेतरी केसरा फुटायचा.

खळ्यात घातलेला मांडव आता फुलू लागायचा. भेंडी, पडवळ, झालीच तर दोडकी आता हळूहळू अंग धरू लागायला सुरुवात करायची. पावसाळ्यात घातलेली अळी आता वेगाने मांडवावर चढायला लागलेली आहेत… आता गणपतीच्या आसपास ह्या दोडकी, तौशी, पडवळ धरायला लागतील. पुढल्यादारी सहज पायरीवर बसलं तरी या वेलींचा सुटणारा गंध नाकात भरून यायला आता सुरुवात होणार ही कल्पनाच किती सुंदर आहे.

घराच्या कौलावरून ओघळणारे पावसाचे थेंब, त्यात खळ्यात पसरणारे उन …. आणि वेलींना चढलेला हिरवा रंग ही सृष्टीची हिरवी गौळण मनाला भूल पाडते हे खरं ! . श्रावण आला की पावसाच्या एखादी सर कोसळून नव्हे तर शिडकावून गेली की, पाटल्यादाराच्या अळवाच्या बेटात जाऊन बघावे …त्या सृष्टीच्या शिडकाव्याचे बरेच थेंब त्या पानावर पडले जातात, ते जलथेंब आता मोत्यासारखे दिसू लागतात. दुरून पाहणार्‍याला जणू मोत्यांचा सडा त्या पानांवर तयार झाल्यासारखा दिसायचा. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीपाठोपाठ मातीला एक श्रावणीक गंध सुटू लागतो.

हा गंध त्या वातावरणात आपोआप तयार होतो, त्याची अनुभूती ही आपोआप तयार होते… या श्रावणसरींच्या आगमनावर कुसुमाग्रजांची

लपत छपत हिरव्या रानात
केशर शिंपित श्रावण आला
इंद्रधनुच्या बंधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला

ही कविता आठवत रहाते, त्यात मिसळलेले पद्मजा फेणानी जोगळेकर यांचे सूर एका वेगळ्या दुनियेत आपल्याला घेऊन जातात. सृजन सृष्टीला मिळालेली ही अनुभूती किती सात्विक आहे याचा अनुभव श्रावणात येतोच. अशाच एखाद्या श्रावण सकाळी उठावे आणि नदीच्या काठावर बसून ह्या श्रावणाचा आनंद घ्यावा. समोरचा डोंगर हिरवागार झालेला असतो…. नदी आपल्या पात्राचा आधार घेत मंद वहात असते, त्या प्रवाहाचा आवाजदेखील कानात झुळझुळतो. कुठून तरी दोन चार गुराखी आपली गाई वासरं घेऊन नदीच्या वरच्या चरावाला सोडून खुशाल त्या नदीच्या काठावर येऊन बसतात. त्यांना पक्क ठाऊक ही गुरं हे रान सोडून कुठे जाणार नाहीत….चरावाला एवढा हिरवा चारा हल्ली कुठे मिळणार ? ….त्या नदीच्या काठी बसून गप्पांना सुरुवात होते ….आणि त्या सोनसकाळी श्रावणसरींना सुरुवात होते, त्या सरींना अंगावर घेत धुंद होता येते….दुसर्‍याक्षणी सरी विश्रांती घेतात आणि हलक्या उन्हाचा शिडकावा होतो…. हा खेळ किती अद्भुतरम्य !

नदीच्या काठावर कधी सुतारपक्षी बघायला मिळतो …आपल्या ढोलीतून बाहेर येऊन …तो आसमंत कवेत घ्यायला बाहेर पडतो… कोकिळेचा आवाज ऐकायला मिळत नसला तरी कोकिळा दृष्टीस पडते…पोपट, कावळा हे तर नित्याचे श्रावणात तिथे बघायला मिळतात. त्याच नदीच्या काठावरून उठून वरच्या बाजूला जिथे वाडीतली सगळी गुरं चरतात. तिथे आलं की समोरच्या नजरेला पुरणार नाही इतका परिसर रानफुलांनी भरून गेलेला असतो… त्या भूसभुशीत झालेल्या मातीत ठिकठिकाणी वारूळ तयार झालेली असतात. ह्या वारुळाच्या वर अनेक अळंबीची पैदास झालेली असते. ह्या अळंबी चवीला खूप चविष्ट लागतात, पण त्या अळंबी काढणार कोण ….? . तरी वाडीतली पोरं धीर करून त्या वारूळावरची ती अळंबी काढायची…. ह्या श्रावणात किती वेगवेगळ्या भाज्या मिळतात. श्रावण महिना तसा शाकाहार भक्षण करायचा महिना, ही निसर्गाची किमया मला खरंच कळत नाही …अळूच्या खाजणीत तयार झालेल्या अळवाच्या भाजीला काय चव येते म्हणून सांगू ?

त्या अळवाची भाजी केळीच्या पानावर वाढली की, ती खाण्यात किती मजा येते म्हणून सांगू ? केळीचं हिरवं पान त्यावर एका बाजूला भात आणि बाजूंला अळू एवढाच काय तो आहार पण त्या पानाचा फोटो किती सुंदर आणि विलोभनीय दिसतो म्हणून सांगू . श्रावण सुरु झाला की, सणांची रेलचेल सुरु होते, त्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. पूर्वी नागपंचमी म्हटली की, सासुरवाशीण स्त्री या नागपंचमीची जणू वाट बघायची…. श्रावणात झाडांना झुले बांधले की, समजायचे नागपंचमी आली ….आता माहेरून कोणीतरी भाऊ आपल्याला माहेरी न्यायला येणार ….या माहेरच्या आठवणी येऊन ती सासुरवाशीण काय म्हणत असेल याचे गदिमांनी छान वर्णन केले आहे, गदिमांनी म्हटले आहे,

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळखळा वाहतात, धुंद नदीनाले

गावी नागपंचमी आली की, भाऊ भोगले उठायचा आणि वाडीतल्या सगळ्या घरांसाठी नागोबा बनवायचा. बिर्‍हाडातला पोरगा भाऊकडे जाऊन आपल्या देव्हार्‍यासाठी नागोबा घेऊन यायचा. नागोबाचे अळवाच्या पानाचे काय नाते आहे माहीत नाही पण नागोबाचे आगमन अळवाच्या पानावर बसून होते. नागोबाची प्रतिष्ठापना झाली की, नागोबाला नैवेद्य म्हणून भाताच्या लाह्या, दूध आणि भाताची गूळ घालून केलेली खीर बनवली जाते. आमची कुलदेवता नागेश्वर, गावातल्या प्रत्येक घरातला देवघरात भीतीवर नागोबाचे चित्र काढलेले आढळते.. नागपंचमीच्या संध्याकाळी घरोघरी पुजलेले हे नागोबा गुरं घेऊन रानात निघाले की, त्यांच्याबरोबर हे नागोबा पुन्हा अळूच्या बेटात विसर्जन केले जातात.

पिढ्यानपिढ्या गावात नागपंचमी का साजरी करतात, याबद्दल आबा आजोबा सांगायचे. आबा आजोबा काही सांगायला बसले, की त्या गोष्टीची उकल समोरच्याला समजेपर्यंत करत असत. आपल्या खास पोलिसी थाटात ते सांगायला बसत ….त्यांनी कधी सांगितले होते की, नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगर धरायचा नाही किंवा कुठे काही खणायचे नाही, झालाच तर घरात भाजी पण चिरायची नाही …हे लोकसंकेत गेली कित्येक शतके, कित्येक पिढ्या पाळत आल्या आहेत…पण त्याची उकल आजोबांनी केली …अरे, त्याचे काय आहे. अशी सुरुवात करून आजोबा सांगायला सुरुवात करत नागलोकीत पंचमीचा दिन म्हणजे सुगीचा दिन असतो, यादिवशी भूमीच्या प्रत्येक कणात नागलोकीचा अवशेष असतो, त्या लोखंडी वस्तूने या जीवाची हानी होऊ नये म्हणून त्यादिवशी काही खणू नये किंवा धातूचा वापर करून काही खणू किंवा कापू नये.

चुलीवर शिजवलेल्या त्या खिरीला काय स्वाद यायचा म्हणून सांगू ….? त्या खिरीत टाकता यावी म्हणून रानात जाताना चारबोरं (चारोळी) घरोघरी जतन करून ठेवलेली असायची. या श्रावणातल्या सणसोहळ्यासाठी म्हणून घरातल्या माय भगिनींनी खूप धावपळ केलेली असते….ही धावपळ नेहमीचीच…पण ही धावपळ केवळ श्रावणासाठी. लहानपणी श्रावण म्हटलं की, केळीच्या पानावर जेवायचे एवढेच माहिती, क्वचितच श्रावणात ताटात जेवण व्हायचे.

हल्ली गावच्या घरात लाद्या घातल्या आहेत पण पूर्वी श्रावण म्हटला की, शेणाने जमीन सारवण आलं, ह्या महिन्यात गुरांना चरायला हिरवागार चारा मिळतो म्हणून शेणाचा सुद्धा हिरवा रंग असायचा. साहजिकच जमिनीवर सारवायला घेतलं की, जमीन देखील हिरवीगार दिसायची, त्या हिरवट झालेल्या जमिनीवर कणी घातलेली रांगोळी सुद्धा उठून दिसायची.

आषाढ महिन्यात रानातला चारा खाऊन मत्त झालेली गुरं देखील ह्या श्रावणी वातावरणाला रुळलेली आढळतात. ह्या श्रावण महिन्यात गावी वाड्यात एखादी गाय किंवा म्हैस व्यालेली असायची… त्यामुळे दूध भरपूर… त्यामुळे ताक कढी तर रोजचीच. श्रावणात येणार्‍या सणांची आखणी आषाढातच होते. पंचमी संपली की, अष्टमीचे वेध लागतात. ही अष्टमी म्हणजे गोकुळाची अष्टमी … कोकणात प्रत्येक घरी गोकुळ बसवतात. देवाच्या पाटावर चार गोकुळा बनवली जायची. त्या गोकुळांची साग्रसंगीत पूजा केली जायची… दिवसभर उपवास असला तरी घरोघरी तांदळाच्या पिठाच्या पोळ्या (आंबोळ्या), शेगलाची भाजी आणि काळ्या वाटण्याची उसळ ( सांबारे ) हे नक्कीच बनवतात.

त्यादिवशी वाडीतल्या लोकांचे अष्टमीचे भजन तर व्हायचेच, पण त्याचबरोबर मांडावर स्त्रियांच्या फुगड्या रंगायच्या, त्या फुगडीगीतात स्त्री जीवनातील कष्ट किंवा माहेरची आठवण सहज यायची, त्यात राम-सीतेचा विरह असायचा आणि त्याचबरोबर कृष्ण-राधेच्या प्रेमाचे वर्णन असायचे. कोकणातल्या घराघरात ह्या ओव्या किंवा ही लोकगीतं पिढ्यान पिढ्या चालत आल्या आहेत…

मेघाच्या वर्षाले नदी भरली गंगा
भरल्या नदीतून बंधू न्यायालान आला
बंधून केली गुलाबाची होडी
बंधू दोन हातानी पाणी ओढी
बहिणीला नेली पैलतीरी
वहिनीने दुरून पहिली
वहिनी हसत आली
आकाबाय आली बराच झाला
पाण्याची दुड तरी हाडतील हो
घरातला स्वयंपाक करतील हो
वाड्यातला शेण तरी भरतील हो
लाकडाची मोळी आणतील हो
केरवारा थोडा करतील हो
आईबापाची आज्ञा मोडली
वहिनीने अब्रू घालवली

अशी लोकगीते गात रात्रभर फुगड्या चालायच्या. ह्या फुगड्या म्हणजे येणार्‍या श्रावण आणि भाद्रपद महिन्याची नांदी असायची. ह्या लोकगीतांनी तिथल्या स्त्रियांच्या जीवनात श्रावणी रंग भरला हे मात्र खरं. श्रावणात मिसळणारा रंग म्हणजे भक्तीचा ….श्रावणात सर्वत्र सात्विकता का असते …तर ह्या दिवसात गावी माझ्या घरात काय किंवा वाडीतल्या मांडावर ग्रंथवाचन व्हायचे ….

एकदा दीपअमावस्या झाली की, आमच्या गावच्या घरी आजोबा, नंतर माझे मोठे चुलते दादा ईनामदार असे कोणी ना कोणी हरिविजय, पांडवप्रताप किंवा अगदीच नाही तर तुकारामाची गाथा किंवा ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे. त्यावेळी वाडीतली नव्हे तर गावातली माणसं रात्रीची जेवणं आटोपली की, घराच्या सदरेवर जमा होतं. महिनाभर हा कार्यक्रम चाले, यादिवसात घराच्या मागच्या परसात चिबूड किंवा तोवशी खूप धरलेली असायची. तासभर ग्रंथवाचन झाले की, प्रसाद म्हणून तौश्याची किंवा चिबुडाची एखादी फोड हातावर पडायची. स्वयंपाकघरात एकदा प्रसादाची गडबड सुरु झाली की, आम्ही मुलं ग्रंथवाचन चाललेले असे तिथे येऊन बसू. प्रसाद वाटणारा आम्ही मुलं …ग्रंथ ऐकायला बसलो म्हणून कौतुकाने एखादी जास्तीची फोड आमच्या हातावर ठेवी…

श्रावणातले दिवस तसे निर्मळच ! एकदा गुरं माळावर लागली की, विशेष असं काही काम नसे… गुरांना सोडून घरी आले की, सगळे सदरेवर बसून गजाली करायचे. बाहेर श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालू असायचा ..तर सदरेवर गप्पाचा फड रंगलेला असायचा. गप्पा पण कसल्या …? आषाढात किती पाऊस पडला यावर येणार्‍या पिकाच्या अनुमानाच्या …. कोणी किती शेती केली..ह्यावर्षी वसूल किती घालायचा या गप्पा ऐकताना मनाची मशागत व्हायची. यातून मैत्री, प्रेम हे धुमारे मनातल्या मनात हळूच कधीतरी फुलायला लागतात …ही श्रावणभूल देखील वेगळीच ! याच एका उत्कटक्षणी अभिनेत्री स्पृहा जोशी हिची एक कविता आठवते …

अधीर श्रावण मनात पैजण
उनाड वाहे वारा
आठव येता तुझी माधवा

देह सावळा सारा …. मानवी मनाच्या वेगळ्या अनुभूती श्रावणसरींच्या माध्यमातून किती वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होत असतात, याचे प्रत्यंतर या ओळीतून येते.

श्रावण मनामनात बरसतो ..त्याचा रंग मनावर राज्य करतो… आपल्या अभिव्यक्ती उल्हसित करतो. आकाशात तो घननिळा बरसू लागला की, व्यष्टीमनाच्या तारा खूप वेगळ्या झंकारु लागतात. त्या तारांची लय आणि त्या तारांची तान मनाच्या एका कोपर्‍यात गुपित म्हणून बसली आहे. गावाकडचा श्रावण जसजसा मुंबईकडे सरकू लागला तसा त्याच्या बाह्यरूंपात बदल होत गेला… पण त्याचे आंतरिकरूप मात्र तसेच राहिले ..काहीसे सात्विक आणि सोज्वळ…

श्रावण म्हणजे संयम … तरी श्रावणात रमल्यामुळे पंचेंद्रिये तृप्त झाली…ह्या सताड डोळ्यांनी ह्या श्रावणसरींना बघायला मिळाले…. श्रावण महिन्यात गावी असो किंवा मुंबईत असो एक गोष्ट मात्र प्रकर्षाने दृष्टीला पडते.. ती म्हणजे सजत असलेली, गजबजत असलेली गणपतीशाळा …. गावी श्रावणाचा पाऊस पडायला सुरुवात झाली…की गावचा साकव ओलांडून चाफेडीत जाऊन सुतारांना भेटून यंदाच्या वर्षी गणपती कसा हवा याची ऑर्डर देऊन यायचे मोठे काम असते ..एकदा त्या गणपतीची ऑर्डर दिली की, सदरेवरच्या गजालीत गणपती हा विषय खूप महत्वाचा होऊन बसतो….

आता अख्ख्या गावाला गणपतीच्या आगमनाची आतुरता असते.. हळूहळू गणपतीशाळेच्या फळीवर गणपतीच्या अर्धवट रंगवलेल्या, अजून दृष्टी न उघडलेल्या मूर्ती येऊन बसतात. त्याचवेळी माझ्यासारखा कोणी गेला की, हातातला ब्रश बाजूला ठेऊन एखादा कारागीर …वायच त्या गणपतीच्या हाताक रंग मार रे ….असं म्हणायचा की, मग त्या पडत्या फळाची आज्ञा मानून गणपतीला रंग लावायचे किंवा माती मळून द्यायचे काम करत बसू.. ….भाद्रपद चतुर्थीला येणार्‍या गणपतींची चाहूल तशी श्रावणात लागते…

श्रावणाचा दिसणारा रंग हा हिरवा असला तरी त्या हिरवाईला अनेक छटा आहेत…त्यात पिवळ्या-लाल रंगाच्या फुलांचा रंग मिसळला गेला आहे… मेरेवर डसलेल्या लाल मातीचा रंग बेमालूमपणे त्यात मिसळला आहे ..तृणपात्यांचा एक वेगळा रंग त्यात मिसळला आहे ….या रंगाबरोबर एक अलौकिक असा गंध त्यात मिसळला गेला आहे …त्या गंधाला भक्ती आणि अध्यात्माचे कोंदण आहेच …..एकूण श्रावण बहुरंगी ….आणि बहुढंगी आहे.. त्यात आतुरता ही ओतप्रोत भरली आहे..कविवर्य अशोक बागवे सरांच्या शब्दात सांगायचे तर

झोका मंद झुले
श्रावण आला गं
मन असे दरवळे
साजण आला गं ….

प्रचंड गतिमान आयुष्याला श्रावण उभारी देतोच पण त्या बरोबर स्थिरता देतो…श्रावणरंगाची कमाल तशीच न्यारी आहे…त्या घननीळाच्या साक्षीने श्रावणरंग धुंदपणे अनुभवला जातोय हे मात्र खरं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -