घरअर्थजगतभारताची अर्थव्यवस्था मंदावली; विकास दरात ऐतिहासिक २३.९ टक्क्यांची घसरण

भारताची अर्थव्यवस्था मंदावली; विकास दरात ऐतिहासिक २३.९ टक्क्यांची घसरण

Subscribe

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा दर जाहीर केला आहे. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा दर -२३.९ (Negative Growth) टक्के एवढा आहे. लॉकडाऊनमुळे जीडीपीची दर घसरला असे बोलले जात आहे. तिमाही दरामधली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी घसरण आहे.

भारताने १९९६ पासून तिमाही जीडीपीची मोजणी करायला सुरुवात केली. त्यानंतरची देशातील जीडीपीतील ही सर्वात मोठी घसरण आहे. आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्येही ही सर्वात मोठी घसरण आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच २०१९-२० तिमाहीतील जीडीपीमध्ये ५.२ टक्के इतकी वाढ होती.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावला आहे. एप्रिल-जून तिमाहीचे जीडीपीचे आकडे हे गेल्या काही दशकातले सर्वांत वाईट आकडे असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. याचे सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन. या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता बाकी सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला.

या तिमाहीत म्हणजेच एप्रिल आणि मे मध्ये लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प होती. दरम्यान, देश अनलॉक प्रक्रियेत असल्यामुळे जूनमध्ये थोड्याफार प्रमाणात अर्थव्यवस्थेला वेग आला आहे. या कारणास्तव, जूनच्या तिमाहीत जीडीपी १६ ते २५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता रेटिंग एजन्सी आणि अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. जर तसे झाले तर ती ऐतिहासिक घसरण होईल. औद्योगिक उत्पादन, केंद्र व राज्य सरकारच्या खर्चाचे आकडे, शेतीतील उत्पन्न आणि वाहतूक, बँकिंग, विमा इत्यादींच्या कामगिरीची आकडेवारी पाहता ही भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

जीडीपी म्हणजे काय?

जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (Gross Domestic Product) अर्थात जीडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असते तेव्हा जीडीपीचा वापर केला जातो. तसेच देशांतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन किती वाढले, हे मोजण्यासाठीही जीडीपीच्या दराचा वापर होतो. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी हा त्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय खर्च यावरून ठरवता येतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -