घरमहाराष्ट्रनाशिकHAL मध्ये होणार अत्याधुनिक विमानांची निर्मिती

HAL मध्ये होणार अत्याधुनिक विमानांची निर्मिती

Subscribe

खासगी कंपनीकडून २५०० ते ३००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित; २०२८ मध्ये प्रत्यक्ष सुरुवात

नाशिकच्या एचएएल कारखान्यात पाचव्या जनरेशन लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी तयारी सुरू झाली असून, यासाठी खासगी कंपनीसोबत करार केला जाणार आहे. लढाऊ विमानांची प्रत्यक्ष निर्मिती २०२८ मध्ये सुरू होणार असल्याचे संकेत एचएएलच्या सूत्रांनी दिल्याने एचएएलला पुन्हा सुगीचे दिवस येणार आहेत.

भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प समजल्या जाणार्‍या पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने अर्थात अ‍ॅडव्हान्स मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) च्या उत्पादनासाठी सक्षम खासगी कंपन्यांचा सहभाग आवश्यक असून, खासगी कंपनीकडून २५०० ते ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. एचएएल व खासगी कंपनीने या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी संयुक्त रचना आणि योजनेनुसार एचएएल कंपनीवर २०२८ पर्यंत उत्पादननिर्मितीची जबाबदारी आहे.

- Advertisement -

या योजनेत खासगी क्षेत्राला संयुक्त प्रकल्पात नियंत्रित हिस्सा देण्यास प्राधान्या दिले जाणारे मॉडेल व भांडवलाची कमीत कमी गुंतवणूक ठेवण्यासाठी विद्यमान उत्पादन पायाभूत सुविधा लीजवर घेण्याचादेखील पर्याय असल्याचे समजते. ज्या खासगी कंपन्या या प्रकल्पासाठी पुढे येतील त्यांच्यासाठी पुढच्या पिढीतील लढाऊ विमानांच्या निर्मितीची मोठी संधी आहे. जे आतापर्यंत खासगी कंपन्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हते, पाश्चिमात्य देशात खासगी कंपन्यांना प्राधान्य दिले जात होते. आवश्यकता वाटल्यास या कंपन्यांना अनुदान व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात होत्या. त्याच धर्तीवर या प्रकल्पाचे काम होणार असल्याचे कळते. नवीन संरक्षण संपादन प्रक्रियेत शस्र प्रणालीच्या निर्मितीसाठी डीआरडीओ आणि पीएसयूकडून खासगी क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी खरेदीची नवीन श्रेणी जोडली गेल्याचेही सूत्रांनी सांगितले.

नाशिकमधील एचएएलमधील सुविधा पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी खासगी कंपनीला उपलब्ध करण्याची शक्यता आहे. बहुधा बंगलोर येथील एचएएलमध्ये या विमानाचा नमुना तयार केला जाईल आणि उत्पादन नाशिक येथे होऊ शकेल. या विमानांची निर्मिती २०२८ मध्येच सुरू करायची असल्याने व खासगी क्षेत्राला नवीन परिसंस्था तयार करण्याची व निर्मिती क्षमता मिळावी, हा उद्देश असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -