घरठाणेभिवंडीतील कशेळी येथे सापडल्या ऐतिहासिक तोफा; शिवप्रेमींमध्ये उत्साह

भिवंडीतील कशेळी येथे सापडल्या ऐतिहासिक तोफा; शिवप्रेमींमध्ये उत्साह

Subscribe

भिवंडी ठाणे मार्गावर असलेल्या कशेळी गावातील मैदानात दोन ऐतिहासिक तोफा रविवारी सापडल्या आहेत. या तोफांमुळे भिवंडीतील इतर गावांप्रमाणेच आता कशेळी गावाला देखील ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. या तोफा मिळाल्यानंतर तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाची एकच लाट उसळली आहे. भिवंडी तालुक्यातील शिव प्रेमी व इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवज्योत संघटनेचे अध्यक्ष रोशन प्रकाश पाटील, पप्पू पाटील, शुभंकर पाटील, उदय पाटील हे तरुण एकत्र येत त्यांनी शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य हि संघटना स्थापन केली आहे. आज या संघटनेचे ८० हून अधिक सभासद आहेत. शिव कालीन गड किल्यांच्या इतिहास तरुणांसह नागरिकांना माहित व्हावा तसेच ऐतिहासिक गड किल्ल्यांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हि संघटना काम करते.

ठाणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला असल्याने या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर शिवज्योत संघटनेचे तरुण जिल्ह्यासह राज्यातील गड किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. भिवंडीतील कशेळी येथील मैदानाच्या मोकळ्या जागेत ऐतिहासिक तोफा असल्याची माहिती इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या अभ्यासात तसेच रोशन पाटील यांना चर्चेतून माहिती मिळाली होती.

- Advertisement -

शिवज्योतच्या सभासदांनी मागील पंधरा दिवसांपासून कशेळी येथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली असता रविवारी कशेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असलेल्या दत्त मंदिर आणि स्मशान भूमीच्या बाजूला सुरुवातीला एक तोफा आढळली. शिवज्योतच्या सभासदांनी अगोदर स्वतःच्या हातांनी आणि श्रमदानाने ही तोफ बाहेर काढण्यासाठी सकाळी आठ वाजल्या पासून सुरुवात केली होती. हे खोदकाम करताना शिवज्योतच्या सर्वच सभासदांच्या हाताला अक्षरशः फोड आले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर हे सगळे केल्याची प्रतिक्रिया या सभासदांनी दिली आहे.

historical guns found in bhiwandi 1

- Advertisement -

दरम्यान तोफा मोठ्या आणि मातीत खोलवर असल्याने शेवटी जेसीबी मशीनच्या साहाय्याने दोन तोफा बाहेर काढण्यात आल्या आहेत. तोफा बाहेर निघताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष साजरा केला. या तोफा ब्रिटिश कालीन असून तोफांवर १७९८ ते १८११ असा उल्लेख असून तोफांवर ब्रिटिश राजमुकुट असल्याने या ब्रिटिश कालीन ताफा असाव्यात ज्यांची लांबी ९ फूट २ इंच आणि दुसऱ्या तोफेची लांबी ९ फूट ३ इंच आहे. त्यामुळे तोफांची लांबी आणि त्यावरील ब्रिटिशकालीन नोंद यामुळे या तोफा ब्रिटिशकालीन असाव्यात तसेच या ठिकाणी आणखी चार तोफा अजून आहेत, असा अंदाज शिवज्योतचे मार्गदर्शक व इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांनी प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला आहे.

गावातील लोक पुरातन खांब म्हणून या तोफांचा उल्लेख करत होते. मात्र हे लोखंडी खांब इतिहासाचे पुरावे असल्याची खात्री पटल्यानंतर शिक्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शोध मोहीम सुरू केली. या तोफा मिळाल्या ज्याचा आम्हला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया शिवज्योत शिवज्योत परिवार संघटनेचे अध्यक्ष रोशन पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -