घरफिचर्सएक फेरफटका ‘मेलुहा’च्या नगरात

एक फेरफटका ‘मेलुहा’च्या नगरात

Subscribe

. सिंधू संस्कृतीचे जे सात प्रदेश मानतात, त्यातल्या प्रत्येक भागात एक राजधानीवजा महाजनपद असे. धोलावीरा हे कच्छचं महाजनपद असावं. सौराष्ट्र भागातही असं नगर होतं, ते म्हणजे लोथल. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं हे एक महत्त्वपूर्ण बंदर होतं. मध्य आशियातल्या पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार सिंधू संस्कृतीतल्या या प्रदेशाचं नाव ‘मेलुहा’ होतं. मात्र ‘मेलुहा’ म्हणजे कच्छ- सौराष्ट्रचा प्रदेश की संपूर्ण सप्तसिंधूचा, याबाबत मतमतांतरं आहेत.

नव्वदच्या दशकात आधुनिक भारतात जेव्हा मशीद पाडून राम मंदिराचे अवशेष शोधायचं काम सुरू होतं, त्याच कालखंडात कोटड्याच्या जमिनीतून त्याहूनही प्राचीन स्मृतीमंदिरांचे अवशेष दृगोच्चर होत होते. आर्थिक उदारीकरणाने भारतीय संस्कृती कूस बदलत होती, तेव्हा चिरनिद्रेतील संपन्न आणि श्रीमंत दुसरी भारतीय संस्कृती जागी होत होती.
रणोत्सव जगभरातील पर्यटकांना कच्छकडे आकर्षित करत असतो. पण या शुभ्र रणाच्या काही किलोमीटर पुढे गेल्यावर आपण पोहोचतो काही सहस्रकं मागे… धोलावीराला… सिंधू संस्कृतीत. रात्रभर प्रवास केल्यावर मी पहाटे धोलावीराच्या साईटवर पोहोचलो. दरवाजे उघडले आणि उत्खननाद्वारे भूतकाळाच्या डोहातून वर्तमानाच्या पृष्ठभागावर आलेलं हजारो वर्षांपूर्वीचं धोलावीरा जागं झालं.

‘मोहेन्जोदारो’ सिनेमा आणि ‘मेलुहा’ कादंबरीच्याही आधीही माझी सिंधु संस्कृतीशी ओळख झाली ती शाळेच्या पाठ्यपुस्तकांत. हडप्पा, मोहेन्जोदारो ही नगरं पाकिस्तानमध्ये असल्यामुळे दर्शनदुर्लभ आहेत. मात्र, भारतातही सिंधू संस्कृतीचे हजारो अवशेष आहेत. धोलावीरा, लोथल ही नगरं सिंधू संस्कृतीतील पाच मोठ्या नगरांपैकी आहेत. धोलावीराची सात वेळा पुनर्बांधणी झाली होती. कितीतरी स्थित्त्यंतरं या नगराने ताम्रयुगात अनुभवली होती. ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये नेहरूंनी लिहिलंय, की मोहेन्जोदारोच्या उंच टेकडीवरून भारतीय संस्कृतीचा वेध घेताना संस्कृतीचं एक टोक सिंधू संस्कृतीत तर दुसरं टोक स्वतः असल्याचं दिसलं. मग स्वतःला त्यापासून वेगळं करत भारतीय संस्कृतीकडे पाहाण्याची दृष्टी त्यांनी अनुसरली. हिच दृष्टी घेऊन मी धोलावीराची उंच टेकडी पाहू लागलो आणि वाटलं, राष्ट्राचा वास्तूपुरुष येथेच पुजला असावा.

- Advertisement -

(सिंधू संस्कृती वास्तुदेवतेच्या पुराणकथेहूनही प्राचीन आहे.) ही उंच टेकडी म्हणजे बालेकिल्ला. येथे शासनकर्त्यांची गढी तसंच शासकीय कार्यालयं अशी विभागणी होती. त्याला वेगळी तटबंदी होती. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर तिथे उत्खननात आढळलेल्या फलकाची प्रतिकृती दिसली. त्यावर अगम्य लिपीतली अक्षरं होती. मौखिक परंपरेने संस्कृती टिकवणार्‍या देशातला हा आद्य लेखन पुरावा आहे. संशोधकांना या भाषेचं आकलन अद्याप झालं नसलं, तरी या अवशेषांवरून ही संस्कृती सुशिक्षित आणि सुसंस्कृत असल्याची ग्वाही मिळते. येथील घोटीव खांब, ताशीव तुळया सर्वकाही आपल्याकडच्या पहिल्यावहिल्या प्रगल्भ संस्कृतीने घडवलेलं आणि हाताळलेलं होतं. बालेकिल्ल्यातच कठडारहीत विहीर होती. रहाटाचा शोध तेव्हा लागला नव्हता. पाणी शेंदताना दगडी फरशीला दोरखंडामुळे पडलेले वळ दिसत होते. जलस्रोतांसोबतच सोळा जलाशयांची व्यवस्था धोलावीरात होती. जलमार्गांत जलशुद्धीकरणासाठी कोळशांचा वापर होई. भुयारी नाल्यांसाठी तर सिंधू संस्कृती सुप्रसिद्धच आहे. धोलावीरामध्येही याची प्रचिती आलीच. सांडपाण्याचं इतकं काटेकोर नियोजन आजही आपण करत नाही, हे वास्तव आहे. बालेकिल्ल्यावरून कच्छचं शुभ्र रण, समुद्र आणि आकाश यांचं विहंगम दृश्य दिसत होतं आणि पायाखाली माणसांसोबत गाडली गेलेली रहस्यमय संस्कृती अदृश्यच होती.

बालेकिल्ला ओलांडल्यावर पठारसदृश मैदान लागलं. हे तत्कालीन ऑडिटोरिअम असावं. ते पार करून खाली उतरल्यावर लोकवस्ती सुरू होते. प्रशासकांचा बालेकिल्ला, मध्य नगर आणि त्याखाली ‘कनिष्ठ नगर’. ही त्रिस्तरीय नगररचना वैशिष्ट्यपूर्ण असली, तरी तटबंदीने अभेद्य बनवलेल्या वर्गभेदाची ही सांस्कृतिक आरंभरेषा असल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. चातुर्वर्ण्य व्यवस्था हे वैदिक काळाचं आपत्त्य मानलं, तरी त्यापूर्वी वर्गभेद नव्हताच असं तर नाही. धोलावीराच्या मध्यनगरात मण्यांचे कारखाने होते. सिंधू संस्कृतीतील नगरं आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रं होती.
सिंधु संस्कृतीचा काळ इ.स.पू. २६५० च्या सुमाराचा. ऐतिहासिक किल्लेच नव्हे तर पौराणिक तीर्थस्थळांच्याही आधीचा. त्यामुळे या ठिकाणांचं स्थानमहात्म्य सांगणार्‍या कोणत्याही अख्यायिका नाहीत. धोलावीरावासियांचा धर्म हा कुतुहलाचा विषय आहे. आजच्या प्रचलित सर्व धर्मांच्या जन्माआधीच उदयाला आलेल्या, भरभराट पावलेल्या आणि ही भरभराट पचवून अस्तंगत पावलेल्या नगरांमध्ये मातृदेवतेची पूजा होत असे. इथल्या उत्खननात योगासनातल्या शिवशंकराच्या मुद्रा सापडल्या आहेत. युनिकॉर्नसारख्या एकशिंगी जनावराच्या मुद्राही उत्खननात सापडल्या आहेत.

- Advertisement -

इथल्या भाजक्या विटांच्या भिंती काळाच्या भिंतींना पुरून उरल्या आहेत. उत्खननापूर्वी आसपासच्या गावकर्‍यांनी येथील विटांचा वापर घरांसाठी करायचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक बुजुर्गांनी ‘मुडद्यांच्या विटा’ म्हणत विरोध केला. मिथकांचा हाच धागा पकडून १९६७-६८ दरम्यान श्री जगत्पती जोशी यांनी या जागेखाली सिंधू संस्कृतीचे अवशेष असल्याचं हेरलं. नव्वदच्या दशकात आधुनिक भारतात जेव्हा मशीद पाडून राम मंदिराचे अवशेष शोधायचं काम सुरू होतं, त्याच कालखंडात बिश्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली कोटड्याच्या जमिनीतून त्याहूनही प्राचीन स्मृतीमंदिरांचे अवशेष दृगोच्चर होत होते. आर्थिक उदारीकरणाने भारतीय संस्कृती कूस बदलत होती, तेव्हा चिरनिद्रेतली संपन्न आणि श्रीमंत दुसरी भारतीय संस्कृती जागी होत होती. सिंधू संस्कृतीचे जे सात प्रदेश मानतात, त्यातल्या प्रत्येक भागात एक राजधानीवजा महाजनपद असे. धोलावीरा हे कच्छचं महाजनपद असावं. सौराष्ट्र भागातही असं नगर होतं, ते म्हणजे लोथल. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं हे एक महत्त्वपूर्ण बंदर होतं. मध्य आशियातल्या पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार सिंधू संस्कृतीतल्या या प्रदेशाचं नाव ‘मेलुहा’ होतं. मात्र ‘मेलुहा’ म्हणजे कच्छ- सौराष्ट्रचा प्रदेश की संपूर्ण सप्तसिंधूचा, याबाबत मतमतांतरं आहेत.

लोथल धोलावीरापेक्षा लहान, पण बंदराचं शहर असल्यामुळे संपन्न होतं. लोथल हडप्पापूर्व नगर मानतात. लोथलमध्ये पक्क्या विटांबरोबरच लाकडाचं बांधकाम जास्त आढळतं. येथेही मण्यांचे कारखाने होते. शासकांच्या विशेष देखरेखीत हस्तीदंताची कलाकुसरही चालत असे. लोथलमध्येही पाण्याचं व्यवस्थापन आणि सांडपाण्याचं नियोजन होतं. भुयारी नाले होते. दोन स्वच्छ पाण्याच्या विहिरी होत्या. गरम पाण्यासाठी व्यवस्था होती. चुली होत्या. पुराच्या भयामुळे गोदामं आणि इतर बांधकामं तीन साडे-तीन मीटरच्या चबुतर्‍यांवर उभारली होती. लोथलचं वैशिष्ट्य म्हणजे येथील गोदी. अभ्यासकांच्या मते या गोदीच्या एका बाजूला साबरमती आणि भोगावो (सिंधुची प्राचीन उपनदी) या नद्या होत्या तर दुसर्‍या बाजूला समुद्र (तो आता दूर सरकला आहे.) त्यामुळे नौकांमधून येणार्‍या वस्तू लहान नावांमध्ये लादून गोदीचा एक दरवाजा उघडून आत आणल्या जायच्या. मग तो दरवाजा बंद करून पाणी अडवलं जायचं आणि वस्तू गोदामात भरल्या जायच्या, निर्यात माल भरून समुद्राकडचा दरवाजा उघडून नौका सोडल्या जायच्या. नौकादुरुस्ती करायची असल्यास दरवाजे बंद करून पाणी अडवलं जायचं. रिकाम्या गोदीत नौका उपड्या करून दुरुस्त करता येत.

सिंधु संस्कृती कालौघात लुप्त झाली. ही संस्कृती व्यापार्‍यांची होती, तशीच ती शेतकर्‍यांची आणि कारागिरांचीही होती. परदेशी नागरिकांच्या स्वागताचीही होती, तशीच समुद्रलंघन करणार्‍या महत्त्वाकांक्षी पुर्वजांचीही होती. आज ज्ञात-अज्ञाताच्या उंबरठ्यावर वेगवेगळ्या सिद्धांतांच्या मिणमिणत्या प्रकाशात इतिहासाकडे बघताना आपल्या मुळांबद्दल नवे संदर्भ सापडतील; हडप्पा, मोहेन्जोदारो ही नगरं पाकिस्तानात असल्यामुळे सहजगत्या पाहायला मिळणार नाहीत, पण लोथल-धोलावीरासारखी सिंधू-सरस्वतीच्या पान्ह्यावर विस्तारलेली गौरवशाली नगरं आज खंडहरस्वरूपात का होईना, कोणत्याही अभिनिवेषाशिवाय बघितली तर आपली नाळ इथे पुरली असल्याची भावना नक्की देऊन जातील.


-आदित्य नीला दिलीप निमकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -