उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्यात महिलांचा सन्मान

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘उंच माझा झोका पुरस्कारा’चे आयोजन करण्यात आले असून हे पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणार्‍या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला.

unch maza zoka awards 2018
प्रातिनिधिक चित्र

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘उंच माझा झोका पुरस्कारा’चे आयोजन करण्यात आले असून हे पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणार्‍या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. आपल्या भरीव योगदानाबद्दल वीणा गवाणकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच आयएएस ऑफिसर मनीषा म्हैसकर यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. येत्या रविवारी २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचे औचित्य साधून हा सोहळा झी मराठीवर सायंकाळी ७ वाजता दाखवण्यात येणार आहे.

राज्यातील कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला आहे. पुरस्कार दिलेल्या अनेकींचे कार्य प्रकाशझोतात आले तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव ‘मी आता थांबणार नाही’ हे ब्रीद वाक्य असलेल्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’ देऊन करण्यात आला. यावर्षी महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मीनल मोहाडीकर, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि कामगार संघटक मुक्ता मनोहर, नाशिकमधील आनंद निकेतन या मराठी शाळेच्या प्रवर्तक आणि संस्थापक विनोदिनी पिटके-काळगी, १५ हजार प्राण्यांवर उपचार करून त्यांची प्रेमाने शुश्रूषा करून त्यांच्या अधिवासात सुखरूप नेऊन सोडणार्‍या सृष्टी सोनावणे, भारतीय क्रिकेट संघामधून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, मराठी मनाला लावणीची गोडी लावणार्‍या राजश्री नगरकर यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

राजश्री नगरकर यांच्या पुरस्कार प्रदान हा कार्यक्रमाचा सर्वोत्कृष्ट क्षण ठरला असून त्यांना ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनिता दाते यांनी केले. तसेच या पुरस्कार सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.