घरताज्या घडामोडीCoronavirus: आता फेरीवाल्यांचीही कोरोना चाचणी होणार

Coronavirus: आता फेरीवाल्यांचीही कोरोना चाचणी होणार

Subscribe

मुंबईसह राज्यात कोरोनाची संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने मुंबई महापालिकेने फेरीवाले आणि मंडईतील गाळेधारकांसह लोकांच्याही चाचण्यांवर भर दिला आहे. त्यामुळे प्रत्येक फेरीवाल्यांसह दुकानदारांना चाचण्या करून अधिकाधिक कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईमध्ये दुसऱ्या लाटेची शक्यता कमीच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, कोणताही गाफिलपणा न राखता महापालिकेने यापूर्वीची कार्यपध्दती पुढेही कायमच ठेवत सर्वसामान्यांना लोकल प्रवास खुला करून दिला नाही. तसेच मास्क न लावणाऱ्यांविरोधातील धडक कारवाई आता अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढवण्याची मागणी होत आहे. परंतु दिवाळीनंतर चाचणीचे प्रमाण  दरदिवशी १५ ते १७ हजार एवढे होत आहे.

दिवाळीनंतर १४ नोव्हेंबरला एकूण चाचण्या या १६ लाख ७९ हजार ८८८ एवढे होते. तर २५ नोव्हेंबरला या एकूण चाचण्या १८ लाख १७ हजार  २३२ एवढे होते. त्यामुळे अवघ्या १२ दिवसांमध्ये तब्बल १ लाख ३७ हजार ३४४ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे हे चाचण्यांचे प्रमाण आता प्रत्येक  परिमंडळांचे उपायुक्तांच्या अधिपत्याखाली प्रत्येक विभागांमध्ये वाढवण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीवाले, दुकानदार, मंडईतील विक्रेते यांच्या चाचण्या करण्यात येत आहे. चारदिवसांपूर्वी दादरमधील रानडे मार्गावरील फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय बोरीवली पूर्व येथील स्थानिक नगरसेविका गीता सिंघण यांच्या पुढाकारानेही चाचण्यांची सुविधा विभाग कार्यालयाने राबवली. यामध्ये एकाही फेरीवाल्याची चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. तर गुरुवारी जोगेश्वरी येथील नवलकर मंडईतील विक्रेत्यांचीही चाचणी स्थानिक नगरसेवक पंकज यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. त्यामुळे फेरीवाले, मंडई तसेच दुकानदारांची मोफत चाचणी करून कोरोनाचा शोध घेत दुसऱ्या लाटेला परतवून टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरु केला आहे. प्रत्येक विभागातील फेरीवाऱ्यांची चाचणी केली जात असून यामुळे चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -