घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री साहेब मंत्र्यांना आवरा, आतापर्यंत २५ मंत्र्यांना कोरोना

मुख्यमंत्री साहेब मंत्र्यांना आवरा, आतापर्यंत २५ मंत्र्यांना कोरोना

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच जनतेला केलेल्या आवाहनात विनंती केली होती की, कोविड योद्धा नाही झाला तरी चालेल, पण कोविड दूत मात्र होऊ नका. तसेच राजकीय पक्षांनाही विनंती करताना त्यांनी आपण आपआपल्या पक्ष वाढवुया पण, कोरोना वाढवूया नको असे आवाहन केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमधील ४२ पैकी २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने मंत्री महोदय आपआपल्या शासकीय कार्यक्रमात किंवा पक्षाच्या कार्यक्रमात कोरोनाची लागण करत असल्याचे सध्या तरी दिसते. शासकीय कार्यक्रम, तिन्ही पक्षांचे वेगवेगळे कार्यक्रम, विवाह सोहळे, जनता दरबार, संवाद यात्रा इत्यादी कार्यक्रमातून मंत्री कोरोनाचा संसर्ग त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांना कोरोनाची लागण देत असतात. राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेले असतानाच राज्यातील जनतेचे प्रतिनिधीत्व करणारी राजकीय मंडळीनांच कोरोनाचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करत कोरोनाला आवरतानाच मंत्रीमंडळातील मंत्र्यांनाही रोखण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

राज्यभरातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. राज्यातील जनतेकडून मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत काय करायचे असे विचारताना दिसले. पण महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळालाच कोरोनाने मोठ्या प्रमाणात ग्रासल्याची सध्याची स्थिती आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीतील २५ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्र्यांना झालेल्या कोरोनाची लागण पाहता जवळपास 65 टक्क्यांहून अधिक मंत्रीमंडळाला कोरोनाने आतापर्यंत लक्ष्य केले आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेला कोरोनाची त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर वेसण घालण्याची वेळ दुसरीकडे आलेली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमार्फत सुरू असलेल्या जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्र्यांनाच आता कोरोनापेक्षा अधिक मंत्र्यांनाच आवरा म्हणावे लागत आहे.

- Advertisement -

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गेल्या काही दिवसात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यातच खुद्द जयंत पाटील यांनाही कोरोनाने ग्रासले. त्यापाठोपाठच राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. वाढत्या कोरोनाच्या आकड्यामुळेच राष्ट्रवादीने जनता दरबारही रद् केला. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचे ट्विट करून जाहीर केले आहे. सार्वजिक कार्यक्रमात लग्न समारंभ, पार्टी यासारख्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामध्ये अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यासारख्या मंत्र्याचे नाव आहे. तर सर्वाधिक जनसंपर्कात असणाऱ्या जयंत पाटील तसेच बच्चू कडू यासारख्या नेत्यांनाही कोरोनाने ग्रासले आहे.

कॉंग्रेसमध्येही गेल्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर झालेल्या शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वात निघालेली बैलगाडी यात्रा, विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमासाठीची उपस्थिती यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. मुंबईसह नागपुरातही मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले होते. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसही अनेक कार्यक्रमात मास्क वापरत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनी केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेता असलेले देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. विरोधी पक्षामार्फतही राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला आणि सभांना मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असल्याचे पहायला मिळाले आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीत कोरोनाची लागण झालेले मंत्री

कॅबिनेट मंत्री

राजेंद्र शिंगणे – अन्न, औषध प्रशासन
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य
छगन भुजबळ – अन्न व नागरी प्रशासन
एकनाथ शिंदे – नगरविकास
अजित पवार – उपमुख्यमंत्री
जयंत पाटील – जलसंपदा
उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण
दादा भुसे – कृषी
अॅड. अनिल परब – परिवहन
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय विभाग
दिलीप वळसे पाटील – कामगार, राज्य उत्पादन शुल्क
अनिल देशमुख – गृहमंत्री
हसन मुश्रीफ – ग्रामविकास
बाळासाहेब थोरात – महसूल विभाग
वर्षा गायकवाड – शिक्षण
सुनिल केदार – दुग्धविकास, पशुसंवर्धन
नितीन राऊत – ऊर्जामंत्री
अस्लम शेख – वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय
विश्वजित कदम – सहकार, कृषी

राज्यमंत्री

अब्दुल सत्तार – (राज्यमंत्री) महसूल, ग्रामविकास, बंदरे
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री (उच्च, तंत्रशिक्षण, ऊर्जा)
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण (राज्यमंत्री)
सतेज पाटील – गृहनिर्माण (राज्यमंत्री)
संजय बनसोडे – राज्यमंत्री (पर्यावरण, पाणीपुरवठा)


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -