घरमहाराष्ट्रअनिल देशमुख यांच्या घरासह 10 ठिकाणी सीबीआयच्या धाडी

अनिल देशमुख यांच्या घरासह 10 ठिकाणी सीबीआयच्या धाडी

Subscribe

100 कोटींच्या कथित लेटरबॉम्ब प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीच्या लेटरबॉम्ब प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथील घरासह 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या धाडसत्रात सीबीआयच्या हाती काही कागदपत्रे लागली असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. सीबीआयच्या या धाडसत्रामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केला असून इतर पाच जण अनोळखी इसम प्रथम खबरी अहवालात दाखवण्यात आल्या आहेत. सीबीआयच्या धाडसत्रामुळे राज्यातील राजकारण आणखी पेटले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीचा लेटरबॉम्ब टाकून राज्यात खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंह यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवले होते. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमधून दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

या लेटरबॉम्बची सीबीआयमार्फत चौकशी करून व दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी याचिका अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या पत्राच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते,चौकशीचा अहवाल 15 दिवसात न्यायालयात सादर करण्यात यावा असेही उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या दुसर्‍याच दिवशी दिल्ली येथून आलेल्या सीबीआयच्या पथकाने या कथित लेटरबॉम्ब प्रकरणाचा तपास सुरू करून याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यानंतर सीबीआईच्या पथकाने परमबीर सिंह, सचिन वाझे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याचे स्वीय सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे चौकशी करून त्याचे जबाब नोंदवून घेतले होते. या तपासानंतर सीबीआयने शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

या गुन्ह्यात अनिल देशमुख यांच्या नावाची नोंद प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) मध्ये करण्यात आली असून इतर पाच अनोळखी आरोपी असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. तडकाफडकी सीबीआयने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांच्या घरांवर आणि मालमत्तेवर एकाच वेळी टाकलेल्या धाडसत्रामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून राज्यकर्ते आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत होता.

सचिन वाझेच्या पत्राची देखील चौकशी होणार
मुकेश अंबानी प्रकरणात एनआयएच्या अटकेत असताना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तीन पानाचे पत्र लिहले होते. या पत्रात त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप केला होता. तसेच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील या पत्रात उल्लेख करून त्यांनी काही प्रकरणात वसुली करण्यात सांगितले होते, असा देखील आरोप सचिन वाझेने पत्रात केला होता. मात्र, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शपथ घेऊन माझा काही संबंध नसून माझ्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत सचिन वाझे याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, सीबीआयने सचिन वाझे याचा जबाब नोंदवण्यात आला, त्यात वाझेने लिहलेल्या पत्राचा देखील उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. या पत्राची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांची सांगितले.

देशमुखांच्या घरी सापडली संशयित बॅग
अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी अचानक सीबीआयचे अधिकारी दाखल झाले व त्यांनी देशमुख यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सीबीआयच्या इतर पथकांनी मुंबईसह राज्यभरात असलेल्या देशमुख याचे घर व त्याच्या मालमत्ता अशा एकूण 10 ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये मुंबईतील सुखदा आणि ज्ञानेश्वरी या बंगल्याचा देखील समावेश आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांची त्याच्या नागपूर येथील घरीच साडे सहा तास चौकशी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या धाडसत्रात सीबीआयला एक संशयित बॅग मिळून आली असून त्यात काही कागद्पत्रे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआय अधिकार्‍यांनी बाहेरच्या वस्तू घरात नेल्या- जयंत पाटील
अनिल देशमुख यांच्या घरावर धाड टाकताना बाहेरील सामान सीबीआय अधिकार्‍यांनी घरात नेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. सीबीआयने प्राथमिक चौकशी करून त्याचा निष्कर्ष न्यायालयासमोर मांडायला हवा. तसेच सरकारी वकिलांना माहिती हवा की, नक्की निष्कर्ष काय काढला. ते कळण्याच्या आतच धाड टाकली. धाड टाकताना अधिकार्‍यांनी बाहेरच्या वस्तू आत नेल्याच्या घटना घडल्या. हे अतिशय आक्षेपार्ह आहे, एडके पाटील यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -