घरताज्या घडामोडीपुण्यात मृतदेह नेण्यासाठी एम्ब्युलन्सचे वेटिंग, PMC स्कूलबसचा वापर शववाहिनी म्हणून करणार

पुण्यात मृतदेह नेण्यासाठी एम्ब्युलन्सचे वेटिंग, PMC स्कूलबसचा वापर शववाहिनी म्हणून करणार

Subscribe

पुण्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आता मृतदेहांची वाहतूक करायची कशी हा पुणे महापालिकेसमोरील मोठा प्रश्न आहे. कोरोनाच्या काळात बंद असलेल्या शाळांच्या बसेसचा वापर हा मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी मिळावा म्हणूनच पुणे महापालिकेकडून प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कडे स्कुलबसची मागणी करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत आरटीओने आता शाळेच्या बसेसचा बसचा वापर शववाहिनीच्या रूपात करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात शववाहिनीच्या स्वरूपात स्कुल बसेस काम करतील. पुण्यातील एम्ब्युलन्सची गरज पाहता पुण्यात स्कुलबसचा वापर करण्यात येणार असल्याचे परिणामी रूग्णांच्या सोयीसाठी अधिक एम्ब्युलन्स उपलब्ध होणार आहेत.

पुण्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच पुण्यात विकेंड लॉकडाऊनपासून ते कडक निर्बंधांची अंमलबजावणी असे अनेक प्रयत्न होताना दिसत आहेत. पण या संकटामध्ये रूग्णवाहिकांचा मोठा तुटवडा पुणे महापालिकेला भेडसावत आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेने आरटीओला विनंती करत दहा स्कुल बसची मागणी केली होती. आरटीओने दिलेल्या परवानगीनुसार आता या स्कुलबसचा वापर शववाहिनी म्हणून करता येणार आहे. पुण्यात असलेल्या स्कुलबसच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये मृतदेहांची वाहतूक करता येईल या उद्देशातूनच आता स्कुलबसची मदत घेण्यात आली आहे. मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्येने दररोज १० हजारांचा आकडा पार केला आहे. पुण्यामध्ये वाढते कोरोनाचे संकट पाहता पुण्यात रूग्णवाहिकांचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाला आहे. कोरोनामुळे होणाऱे मृत्यू पाहता या मृतदेहांची वाहतूक करण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. त्यामुळेच शाळा बंद असलेल्या स्कुल बसेस वापरता येईल का ? असे पत्र पुणे महापालिकेने आरटीओला दिले होते. या पत्रावर आरटीओने उत्तर देताना स्पष्ट केले आहे की, स्कूलबसचा वापर हा शववाहिनी म्हणून करता येईल. आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांनी ही परवानगी पुणे महापालिकेला दिली आहे.

- Advertisement -

स्कूलबसमध्ये मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरमधील सीट्सही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच शववाहिनीसारखा वापर करणे आता शक्य होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या पुढाकारास पाठिंबा देत काही स्कूलबसही उपलब्ध करून दिल्या आहेत. या पुढाकारामुळे मृतदेहांसाठी रूग्णवाहिकांचे वेटिंगही कमी होईल. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईंकाची सध्याची होणारी गैरसोयही टळेल. पालिकेकडून वाहनाचे भाडे आणि चालक भत्त्यासह मानधनही देण्यात येणार आहे. त्यासाठी दिवसाला १६०० रूपये इतके भाडे आरटीओने ठरवून दिले आहे. स्कूल बस गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे मृतदेह पोहचवण्याच्या निमित्ताने का होईना पण स्कूलबस पुन्हा एकदा पुण्याच्या रस्त्यावर धावणार आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -