घरफिचर्समायमहानगर ब्लॉगक्षणोक्षणी महाराष्ट्र दिन

क्षणोक्षणी महाराष्ट्र दिन

Subscribe

आज १ मे, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस. प्रत्येक महाराष्ट्रप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि आनंदोत्सवाचा दिवस. मात्र आज केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण मानवजातीवर कोरोनाची काळी छाया पडली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक स्तरावर स्वत:ला माणूस म्हणवणारी व्यक्ती धडपडत आहे. या कोरोनापासून ज्या दिवशी मानवजात मुक्त होईल तोच खर्‍या अर्थाने आनंदोत्सवाचा दिवस ठरेल. कोरोना हा अगदी नवा विषाणू आहे. कमीअधिक प्रमाणात त्याची लक्षणे वा त्रास जुन्या कुठल्या तरी आजाराशी जुळणारा असला, तरी त्याची पसरण्याची कुवत अपार आहे. त्याने एका फटक्यात किंवा अवघ्या काही महिन्यात माणसाने मागल्या शतकात मेहनतीने उभे केलेले अवघे जग विस्कटून टाकलेले आहे. महाशक्ती वा प्रगत देश असल्या कल्पनाही धुळीला मिळवलेल्या आहेत. भारतासारखा तुलनेने गरीब देश त्याच्याशी समर्थपणे सामना करीत असताना प्रगत युरोप व अमेरिकेने त्याच्यापुढे गुडघे टेकलेले आहेत. विविध अत्याधुनिक साधने व उपकरणेही तोकडी पडली असताना विपन्नावस्थेतला भारतातला कोट्यवधी नागरिक तुलनेने सुखरूप राहिलेला आहे. अतिशय विचारपूर्वक केलेली गुंतवणूक वा उभारलेले उद्योग व्यापार या रोगाने जमीनदोस्त करून टाकलेले आहेत.

युरोपात तर जवळपास जुनी पिढीच कोरोनाने मारून टाकलेली आहे. त्यांनी शोधून काढलेली औषधे व उपचाराच्या सुविधा निकामी ठरवल्या आहेत. हजारो वर्षांपूर्वीचा मानव जसा अगतिक व हताश निराश होता, तशी अवस्था या आजाराने करून टाकली आहे. मग त्याच्यावर मात करण्यासाठी नव्या पद्धती व नवे उपाय शोधण्याला पर्यायच उरलेला नाही. जी स्थिती त्या आजाराची बाधा झालेल्या माणसाला वाचवण्याच्या बाबतीत आहे, त्यापेक्षा त्यामुळे उध्वस्त झालेल्या विविध व्यवस्था नव्याने उभारण्याची समस्याही किंचित वेगळी नाही. ती कालची अर्थव्यवस्था, उत्पादन पद्धती वा वितरण वा व्यापार शैली यांच्यासह जीवनशैली यांना आता नव्या जगात स्थान नसेल. कित्येक वर्षात व पिढ्यातून तयार झालेल्या आपल्या सवयी कोरोनाने घातक ठरवल्या आहेत. त्यांना बदलताना जगण्याच्या अन्य क्षेत्रातील निकष व नियमही आमूलाग्र बदलावे लागणार आहेत. दोन माणसांमधले अंतर कायम जपायचे, म्हणजे जगण्यातला व्यवहारच बदलून जातो ना?

- Advertisement -

दाटीवाटीच्या वस्त्या व कामाच्या जागांपुरता हा बदल पुरेसा नाही. मानवी स्पर्श, संपर्कच रोगाला आमंत्रण असेल तर समाजजीवन कसे चालणार आहे? ते जुन्या पद्धतीने चालणार नसेल तर एकूण व्यापार, व्यवहार व उद्योगही बदलण्याला पर्याय उरत नाही. आजवर माणूस जसा जगत आला, त्याच आधारावर बाकीच्या व्यवस्था उभारलेल्या आहेत. सहाजिकच त्या जगण्याच्या शैली व सवयीलाच फाटा द्यायचा असेल, तर त्यावर बेतलेल्या विविध व्यवस्था व रचनाही निरूपयोगी होऊन जातात. माणसाच्या आयुष्यातील जीवनावश्यक वस्तू वा सेवांमुळे व्यापार चालतो. सवयी बदलल्या तर त्या जीवनावश्यक वस्तू व सेवांचे स्वरूपही बदलून जाणार ना? मग तेच बदलणार असेल तर आपोआप त्याचा बाजार बदलतो आणि उत्पादनाच्या प्रणाली बदलाव्या लागतात.

अशा अनेक पद्धती, प्रणालींवर समाजाचे व जगाचे अर्थशास्त्र बेतलेले आहे. त्याच्या विकासातून वा उलगडण्यातून त्याचे नियम निर्माण झालेले आहेत. ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. मग ज्या पायावर आधारीत ही शास्त्रे व त्यांचे नियम निकष उभारले गेले आहेत, तो पायाच पुरता बदलून जाणार आहे. मग जुन्या निकष नियमानुसारचे अर्थकारण चालणार कसे? आज जाणकार म्हणवणारे म्हणूनच जुन्या पायावर नव्या जगाच्या कल्पना मांडतात, ते चमत्कारीक वाटते. त्यांचे दावे मनोरंजक तितकेच हास्यास्पद वाटतात. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे चिनी अ‍ॅप्सवर भारताने अचानक घातलेली बंदी होय. ती घोषणा केल्यावर किंवा चिनी मालावरच्या बहिष्काराची भाषा झाल्यावर यापैकी बहुतांश अर्थ जाणकारांनी टवाळी केली होती. चीनला काहीही फरक पडणार नाही अशी ग्वाही दिलेली होती. व्यवहारात त्याचे काय परिणाम दिसले? बघता बघता चीनला घाम फुटला आहे. अर्थतज्ज्ञांनाही त्याचा अंदाज आला नाही. चीनने कोरोनाविषयी लपवाछपवी केली. त्यामुळे सध्या चीनने जगाचा रोष ओढवून घेतला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येणारच नाही असे मानून महाराष्ट्रातील सरकार ढिम्म राहिले. ना हॉस्पिटलांंची क्षमता वाढवली ना ऑक्सिजन प्लान्ट निर्माण केले. इतकेच नव्हेतर कोरोनाची दुसरी लाट आली तर रेमडेसिवीर नावाचे औषध मोठ्या प्रमाणात लागणार याचेही भान महाराष्ट्र सरकारला राहिले नाही. दुसरी लाट आली आणि तिने आतापर्यंत हजारोंचे बळी घेतले. मात्र, त्यातच पुन्हा आपण वाढत्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी किंवा रुग्णांच्या उपचारासाठी महाविकास आघाडी सरकार कसे कंबर कसून राबते आहे आणि त्यात विरोधी पक्ष कसा व्यत्यय आणतो आहे; त्याच्या रसभरीत चर्चा माध्यमातून ऐकत आलो. पण जे दावे राज्य सरकारने केले, ते कधीतरी माध्यमांनी तपासले आहेत काय? अनेक भागातून बाधा झालेल्यांना रुग्णवाहिका मिळत नाहीत वा जिथे रुग्ण मृत्यूमुखी पडला, तिथेही त्याचा मृतदेह हलवायला जागा नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

एका बाजूला रुग्णांना बेड्स नाहीत म्हणून बहुतांश इस्पितळात त्यांना दाखल करून घेत नाहीत आणि अनेक ठिकाणी एकाच शय्येवर दोन दोन रुग्ण असल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. हॉस्पिटलला आगी लागल्याच्या बातम्या आल्या. त्यात काही बळीही गेले. या आगीच्या घटना तर अद्याप थांबलेल्या नाहीत. मात्र, राज्य सरकार केंद्राकडून मदत मिळत नाही, हेच तुणतुणे लावून बसले होते. त्यात भरीसभर म्हणून अन्य राज्यात काय चालले आहे हे बघा, असे सल्ले दिले जात होते. अर्थात ज्याच्या घरात कोरोना शिरला आणि त्याने घरातील पाच, सहा, सात माणसे मारली त्यांच्यासाठी हे सल्ले काय कामाचे होते? आमचे काय ते बोला, हा एकच त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा होता.

अशा परिस्थितीत लढत आहे ती जनता. सरकार, प्रशासनाकडून काय मदत येईल? राजकीय पक्ष आपल्याला सहाय्य करतील, या आशेवर न राहताच महाराष्ट्रातील जनता कोरोनासाठी लढायला सिद्ध झाली. राज्य सरकारने लॉकडाऊन केले तर त्याचे पालन करायला राज्यातील जनता घरातच राहू लागली. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून प्लाझ्मा डोनेशन करू शकणार्‍या व्यक्तींची यादी, रेमडेसिवीर कुठे आणि कसे मिळेल याची माहिती, इतकेच काय कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत याचीही इत्यंभूत माहिती आपल्या-आपल्या ग्रुपवरून देऊ लागली. जनतेची आणखी लढायची त्रास सोसूनही झुंजायची ही इच्छाशक्ती बघितली मग दत्ताजी शिंदे आठवतो.

मृत्यूच्या अखेरच्या क्षणात जायबंदी होऊन पडलेल्या दत्ताजीला शत्रूचा सेनापती खिजवायला विचारतो अब क्या करोगे? तो मराठा लढवय्या उरलासुरला प्राण जिभेवर आणून उच्चारतो, बचेंगे तो और भी लडेंगे. बाकीच्या भारताची गोष्ट बाजूला ठेवा. आपण मराठे व मराठी अस्मितेचे उपजत वारस आहोत. त्या दत्ताजी शिंदेचे आपण वंशज आहोत, त्याच्यापुढे कोरोनाचा टिकाव कसा लागेल? अजून आपण तर सुखरूप आहोत आणि कोट्यवधीच्या संख्येने सुखरूप आहोत. लढणे तर आपल्या रक्तात आहे आणि जगण्यातच आहे. ही लढण्याची इच्छा म्हणजेच क्षणोक्षणी साजरा होणारा महाराष्ट्र दिन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -