घरफिचर्सचिरतरुण पवार पॅटर्न

चिरतरुण पवार पॅटर्न

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तेत महत्वाची आणि मुख्यता प्रमुख केंद्राची भूमिका बजावणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज 22 व्या वर्षात पदार्पण करतो आहे. बावीस वर्षांत स्वतःच्या बळावर वाटचाल करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची प्रमुख धुरा आजही 82 वर्षीय शरद पवार या मनाने तरुण असलेल्या मात्र आता काहीसे वृद्धत्वाकडे झुकलेल्या नेत्याच्या खांद्यावरच आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तर भाजपने राष्ट्रवादीला अखेरची घरघर लावली होती. वर्षानुवर्ष शरद पवारांच्या मर्जीमुळे सत्तेच्या खुर्च्या उबवणार्‍या नेत्यांनी राष्ट्रवादीचा हा अत्यंत खडतर आणि पडता काळ लक्षात घेऊन भाजप-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीतचे संस्थान पूर्णतः खालसा करण्याचा जणू विडाच उचलला होता.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई, ठाणे या पट्ट्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज मंडळींना फडणवीसांनी भाजपात आणण्याचा सपाटाच या काळात लावला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत एक विधान केले होते जे खूप गाजले होते. या निवडणुकांनंतर राज्यातील पवार पॅटर्न संपुष्टात आलेला असेल असे फडणवीस यांनी म्हटले होते. दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात जे अभूतपूर्व असे सत्तांतर नाट्य झाले त्याचा नाट्याचा प्रमुख सूत्रधार अर्थातच शरद पवार हेच होते. शरद पवार यांनी धाडस दाखवल्यामुळेच 105 आमदार निवडून आलेल्या भाजपला आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून आणि मुख्यमंत्रीपदापासून वंचित राहावे लागले. ज्या फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि पर्यायाने शरद पवार यांच्या अस्तित्वावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला होता, त्या फडणवीसांना शरद पवार यांनी दिलेला हा मुहतोड जवाब होता.

- Advertisement -

आज शरद पवार यांचा पवार पॅटर्नच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नावाने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काळपुरुषाच्या रुपात राज्य करत आहे. आणि दुसरीकडे एकशे पाच आमदार राज्यात स्वतःच्या पक्षाचे असताना तसेच केंद्रात भाजपाची एक हाती सत्ता असताना फडणवीस यांच्यासारखा जाणकार आणि राजकीय नैपुण्य असलेला नेता हतबल अवस्थेत आहे. यालाच पवार यांचे राजकारण असे म्हणतात. दिल्लीत झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक भेटीनंतर जरी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत वेगवेगळ्या चर्चेच्या वावड्या उठत असल्या तरीदेखील दिवाळीपर्यंत तरी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीमध्ये फारशी काही उलथापालथ संभवत नाही. आणि याचे प्रमुख कारण मुख्यमंत्रीपद आहे. उद्या जरी भाजप आणि शिवसेना हे पुन्हा एकत्र आले तरीदेखील उद्धव ठाकरे हे काही युतीचे मुख्यमंत्री असू शकणार नाहीत हे राजकीय सत्य लक्षात घेण्याची गरज आहे. तसेच दुसरीकडे जरी राष्ट्रवादी भाजपबरोबर गेली तरीदेखील राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद येणार नाही.

तसेच भाजपचा जो मुख्यमंत्री होईल तो काही शरद पवार यांच्या सांगण्यानुसारच राज्याचा कारभार चालवेल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यात भाजपची जी राजकीय नीती आजवर चालत आलेली आहे त्यानुसार भाजप ज्या राजकीय पक्षांशी युती अथवा आघाडी करतो त्या मित्रपक्षांनाच संपवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न करतो. त्यामुळे राष्ट्रवादीने भविष्यात जर भाजपशी घरोबा केलाच तर ते राष्ट्रवादीसाठी सर्वाधिक धोकादायक ठरू शकेल याचे भान शरद पवार यांच्यासारख्या धूर्त, मुत्सद्दी आणि चाणाक्ष राजकीय नेत्याला आहे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्यात जरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार असले तरीदेखील या सत्तेच्या केंद्रस्थानी शरद पवार हेच आहेत. महाराष्ट्रात भाजपला विरोध करत पवारांनी हे तीन पक्षांचे सरकार स्थापन केले ते टिकवून दाखवले हीच शरद पवार यांची खरीखुरी राजकीय ताकद आहे.

- Advertisement -

त्यामुळे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या अर्ध्या तासाच्या खास बैठकीनंतर चर्चेच्या कितीही वावड्या उठल्या तरी स्वतः शरद पवार हे त्यांची जी प्रतिमा या सरकारच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय स्तरावर उभी राहिलेली आहे ती स्वतः मोडतील असे समजणे हा शुद्ध मूर्खपणा म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या राजकारणाचा जर अभ्यास केला तर ते आजवर केंद्र सरकारशी कायम मिळतेजुळते धोरण ठेवत आलेले आहेत. त्यांचे राष्ट्रीय नेतृत्वाशी असलेले उत्तम असे वैयक्तिक संबंध हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. तथापि गेल्या दीड वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर देशात आणि राज्यात भाजपविरोधी जनमत ज्या प्रमाणात वाढीस लागले आहे ते कमी करण्याचा वा थोपवण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्यासारखा नेता करेल, असे आज तरी संभवत नाही. विशेषत: 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राज्यात भाजपची लाट रोखून राष्ट्रवादीला 54 तसेच काँग्रेसला 44 एवढ्या विधानसभेच्या जागा निवडून आणण्याचे खरे मानकरी हे शरद पवारच आहेत हे अमान्य करण्यात काही अर्थ नाही.

आज राष्ट्रवादी 22 व्या वर्षात पदार्पण करत असतानादेखील राष्ट्रवादीत या पक्षाचा प्रमुख आधारस्तंभ हा ग्रामीण महाराष्ट्र हाच आहे आणि भाजपचाही वाढलेला जनाधार हा ग्रामीण महाराष्ट्रातीलच आहे. त्यामुळे जर भाजप आणि राष्ट्रवादी हे जर का एकत्र आले तर त्यामध्ये राष्ट्रवादीचे नुकसान अधिक होण्याचा संभव आहे. हे लक्षात घेऊनच पवार यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली हे लक्षात घ्यायला हवे. अर्थात, केवळ शिवसेना आणि भाजप अथवा काँग्रेस यांच्याबरोबर सत्तेत राहून राष्ट्रवादी स्वबळावर कधीही सत्तेत येऊ शकत नाही याची जाणीवदेखील शरद पवारांना आहे. मात्र तरीदेखील राज्याची आणि देशाची जी राजकीय स्थिती आहे ती लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये पुढील काही काळ तरी निश्चितपणे पवार पॅटर्नच राज्य करेल याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामागे या पक्षाचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करून तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याची पवारांची आकांक्षा होती आणि आजही आहे.

कारण जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या आणि त्या पुढे पंतप्रधान होतील, असे वाटू लागल्यानंतर पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. पवारांनी राष्ट्रीय पातळीवर आपला प्रभाव वाढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या पक्षाला त्यात फार यश आले नाही. पवारांचा मूळ प्रभाव हा महाराष्ट्रात आहे. पवार सत्तेत असले किंवा नसले तरी महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय पान हलत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पवारांना आव्हान देणे वाटते तितके सोपे नाही. आता त्यांच्या पक्षाचे वय बावीस आहे आणि पवार हेही मनाने बावीस वर्षांचेच आहेत, हे त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन करून दाखवून दिले आहे. शरद पवार यांच्यापाठोपाठ अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याही नावाला चांगला जनाधार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा लॉबीचा असलेला प्रभाव आणि पवार घराणे याच लॉबीचे प्रमुख प्रतिनिधी आहेत, हेही लक्षात घ्यावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -