घरफिचर्ससारांशचिकटलेल्या अंधश्रद्धांचे काय!

चिकटलेल्या अंधश्रद्धांचे काय!

Subscribe

सुपरस्टार रजनीकांतचा रोबोट सिनेमात त्याच्या शरीरात चुंबकीय शक्ती असल्याने धातूची हत्यारे अगदी बंदुका, चाकूसुरे त्याकडे आकर्षित होऊन त्याला चिकटतात. या सिनेमाला भविष्यातील विज्ञानाच्या अतिरेकाची मनोरंजक अशी ठाम बैठक असते, त्यामुळे हे सर्व घडू शकतं किंवा घडतंय अशा अर्थाने हा सिनेमा म्हणून थिएटरबाहेर येऊन विषय सोडून दिला जातो. पण माणसांना अनेक गोष्टी हजारो वर्षांपासून चिकटलेल्या असतात, ज्यांना कुठलीही वैज्ञानिक अशी ठाम बैठक नसते, मात्र ज्यांना आपण परंपरा, श्रद्धा, धर्म, व्यवस्था अशा अनेक शब्दांनी ओळखत असतो.

आपल्याकडे काळी बाहुली, लिंबू मिरची, वास्तूदोष, शुभ किंवा अपशकुन, दैवी यंत्र, चांगली वाईट दिशा, ग्रहदशा, शुद्ध-अशुद्धता, असलं बरंच काही असतं. चुंबकात जसे ऋण आणि धन असे दोन ध्रुव असतात, एक आकर्षणाचा आणि दुसरा प्रतिकर्षणाचा असतो, तसेच मानवी समुदायातही असेच दोन समाजध्रुव असतात. त्यात वास्तवापासून दूर पळणारा आणि पारलौकीक अशा कथित विषयांकडे आकर्षित होणारा एक समुदाय आणि अशा घटनांमागील कारणे शोधणारा तुलनेने कमी संख्येचा असा दुसरा समुदायही असतो. देवस्थानाकडे दर्शनासाठी जाताना वाहनाला अपघात होतो. त्यावेळी अशा अपघातातून वाचल्यास देवानेच वाचवल्यावर आपला विश्वास असतो तर अपघातात मृत्यू झाल्यास बघा..देवाच्या मार्गावर मृत्यू आल्याचं कौतुक होऊन त्याला खर्‍या श्रद्धेचं नाव दिलेलं असतं.

विदर्भामध्ये एक नुकतेच जन्मलेले बाळ आजारी पडल्यावर त्याच्या पोटावर भोंदू बाबाने उपचार म्हणून चटके दिल्याची घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. पुढे या बाळाला आजार बळावल्यावर रुग्णालयात नेले त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. भोंदू बाबाने चटके दिल्यावरही बाळ काही दिवस जिवंत होते, मात्र रुग्णालयात नेल्यावर दगावल्याने वैद्यकीय विज्ञानशास्त्रापेक्षा भोंदुगिरीची भलामण आपण वादविवादात करू शकतो. आपल्याकडे देवस्थानात मनातील इच्छा ओळखणारे दगड असतात. या दगडाने विशिष्ट दिशेला झुकून कौल दिल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार किंवा नाही, हे स्पष्ट होते. जर हा दगड स्थिर राहिल्यास इच्छा अनिश्चित असल्याचे समजले जाते. श्रद्धा अंधश्रद्धा सोयीच्या असतात. सोयीनुसार त्याची व्याख्या केलेली असते. पाप्यांना देवरूप आपले दर्शन देत नाही. त्यामुळे पाप्यांपेक्षा दैववादाचा अनुभव घेतलेले आपल्याकडे भरपूर आढळतात. आपले न दिसणारे किंबहुना मुदलात नसलेले पुण्य दाखवण्याची अशी सोय श्रद्धेने करून दिलेली असते. इथे पापे धुणार्‍यांचीही संख्या मोठी असते. गंगेच्या प्रवाहात मृतदेह सोडल्याने थेट मोक्षप्राप्तीची अपेक्षाही इथे असते. त्यामुळे अशा मृतदेहांचेही राजकारण आपल्याकडे नवे नसते.

- Advertisement -

आपल्याकडे पैशांचा पाऊस हा एक महत्वाचा ऋतू असतो. त्याला हवामानबदलाची गरज नसते. रिझर्व्ह बँकेने बनवलेले सरकारच्या अनुमोदनावर टाकसाळीत पाडलेले छापलेले चलन हवेतून कसे पडू शकते, याचा विचार पैशांचा पाऊस पाडणारे करत नसतात. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पर्जन्य बीज म्हणून खर्‍या नोटा घेतल्या जातात या नोटा जाळल्याचे दाखवले जाते. त्यातून तयार होणार्‍या धुरातून पैशांचा पाऊस पाडला जातो. त्यासाठी मांडूळ सर्प, अठरा नखांचे कासव किंवा पालीची शेपटी असलं विचित्र साहित्य सामुग्री मागवली जाते. ठाणे, रायगड किंवा महाराष्ट्रातील काही भागात मांडूळ सर्पाची कोट्यवधींमध्ये बेकायदा खरेदी विक्री केली जाते. ज्या ठिकाणावरून मांडूळ सर्प मार्गक्रमण करतो त्या ठिकाणी धनाचा हंडा आढळल्याचे मानले जाते. असे धन मिळवण्यासाठी कोट्यवधींना मांडूळ खरेदी केले जातात. त्यामुळे मांडूळ या जातीच्या निरपद्रवी सर्पांची संख्या कमी होत आहे.

देवाच्या मूर्तीला दूध पाजणे किंवा मानवी शरीरात चुंबकीय शक्ती तयार होऊन धातू वस्तू शरीराला चिकटणे यावर आपली श्रद्धा असते. कोरोना लसीमुळे शरीर चुंबक झाल्याचा दावा नाशिकमध्ये करण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांवर चुंबकाच्या गुणधर्माचे चर्वितचर्वण सुरू झाले. चुंबकाची ऋण-धन अशी दोन टोके आहेत. माणसांच्या समुदायातही कुठल्याही अतार्किक, अविश्वसनीय गोष्टींकडे आकर्षित होऊन ताबडतोब हे सगळं घडवणारी एक ईश्वरी शक्ती असल्याचे मानणारा घाई करणारा एक गट असतो तर दुसरा त्यामागील विज्ञान, अफवा, भ्रम, तथ्य शोधणारा चिकित्सकांचाही गट असतो. पारलौकिक शक्ती अनुभवाला आल्यास त्याबाबत प्रश्न विचारणं दैववादी आणि धर्मसंस्कृतीच्या विरोधात मानलं जात. कौल पहाणारे, शुभ अशुभ शकून तसेच संकेत सूचन करणारेही घटक समाजात असतात. अशांनी देवाधर्माच्या नावाखाली त्यांची दुकाने सुरू ठेवलेली असतात. मुंबईतील काही देवस्थानांमध्ये भूत, पिशाच्च, काळी जादू उतरवली जाते. आपल्याकडे बाबा-बुवांचे प्रस्थ मोठे असते. माळकरी व्यक्तीबाबत समाजात आदर सन्मान असतो. मात्र असाच कथित हभप वृद्ध माळकरी आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण करत असल्याने माध्यमांवर संताप चीड व्यक्त होते. माळकरी माणूस असे करूच शकत नाही, असा समाजमाध्यमांवरील चर्चेचा सूर असतो, महिलेला मारहाणीपेक्षा माळेची इभ्रत जास्त महत्वाची मानली जात असल्याने महिलेच्या मारहाणीचा मुद्दा दुय्यम असतो. निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराचे वाटोळे व्हावे म्हणून काळ्या बाहुलीतून जादूटोणा केल्याचे प्रकार घडतात, त्यानंतर ही काळी जादू उतरवण्यासाठी पुन्हा नव्याने सकारात्मक शक्तींना पूजेतून आवाहन केले जाते.

- Advertisement -

हे सर्व असेच असल्याने आणि त्याविषयी आपल्याकडील गूढतेला आपण श्रद्धेचे नाव दिल्याने मानवी शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूच्या वस्तू चिकटण्याचे अप्रूप आपल्याला असते. त्यामुळे तातडीने पारलौकिक निष्कर्ष काढण्यात आपण वाकबगार असतो, अशाच निष्कर्षातून संपूर्ण राज्यात तीन दशकांपूर्वी गणपतीच्या मूर्तीने दूध प्यायल्याची घटना घडलेली असते. कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकीय शक्ती आल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होते. त्यात चिकित्सा आणि अलौकिकता असे दोन्ही गट सक्रिय होतात. कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आल्याचा असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिकाकडून केला जातो. हा दावा खरा आहे का, त्याबाबत डॉक्टर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणेही मांडले जाते.

कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला नाणे आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा दावा नाशिकमधील एका व्यक्तीने केल्यानंतर कोरोना लसीबाबत संपूर्ण जगात आपण अनाकलनीय शोध लावल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ही अफवा इतकी वाढली की मात्र लस घेतल्यामुळे हे झालेलं नसावं, असे सरकारी अधिकार्‍यांना जाहीर करावे लागले. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार असल्याचं नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगावे लागले. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल त्याच्या प्रसाराबद्दल, म्युकरमायकोसीसच्या चिंतेबद्दल जगात संशोधन आणि गांभीर्य असताना आपल्याकडे मात्र कोरोनामुळे शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा शोध लागला. चुंबकीय शक्ती शरीरात निर्माण झाल्यानंतर शरीराला नाणी चिकटत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. यात अनेकांनी डोस घेतल्यावर संबंधित व्यक्ती मॅग्नेटमॅन बनल्याचा दावा केला होता. नाशिकमधील या व्यक्तीने 4 ते 5 दिवसांपूर्वी लशीचा दुसरा डोस खासगी रुग्णालयात घेतला होता. त्यानंतर एका वर्तमानपत्रातील बातमीत कोरोना लस घेतल्यावर शरीराला स्टील चिकटत असल्याचा आशय होता. त्यानंतर संबंधितांनी असा प्रयोग पाहिल्यावर त्यांच्याही शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. श्रद्धा अंधश्रद्धेने भिजलेल्या मेंदूंना यातही अलौकीक शक्ती असल्याचा भास होऊ लागला आणि भारताचा हा शोध जागतिक स्तरावर नेण्याची गंभीर चर्चा सुरू झाली. याबाबत थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांना विचारणा झाल्यावर त्यांनी त्वचेवर ओलसरपणा असल्यावर निर्वात पोकळी आणि वातावरणाचा दाब यामुळे नाणी शरीराला चिकटू शकतात, असे स्पष्ट केले. कोरोनाकाळातील आजाराचे गंभीर आव्हान समोर असताना अशा सनसनाटी आव्हानांवर अतार्किक चर्चा होण्यातून आपल्या समाजातील बौद्धिक दिवाळखोरी समोर आली आहे.

शरीरावर धातू चिकटवण्याचा आणि कोरोना लसीचा काहीही संबंध नाही, असे जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनीही स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तज्ज्ञ पाठवून चौकशी करून त्यासंबंधी एक अहवाल शासनास पाठवणार आहे. त्यानंतर शासन निर्देशानुसार कार्यवाही होईल, असं नाशिकमधील सरकारी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना लसीचे परिणाम, त्यांची गरज त्याचा पुरवठा, लॉकडाऊनचे आव्हान आदी प्रश्न समोर असताना कोरोनाच्या अशा चिकटलेल्या परिणामांवर चर्चा होण्याची गरज असावी का, माणसांना जळमटांसारख्या चिकटलेल्या अंधश्रद्धांनी माणसांची खूप हानी केलेली आहे हे ध्यानात आले तरी पुरेसे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -