घरफिचर्ससारांशमॉर्निंग वॉकर्सचं विश्व

मॉर्निंग वॉकर्सचं विश्व

Subscribe

सुरुवातीला ‘नवीन वर्षाचा संकल्प’ इथपासून होणारा मॉर्निंग वॉकर्सचा प्रवास हळूहळू ‘आदतसे मजबूर’ या वळणावर येऊन पोहोचतो. हा प्रवास तो करणार्‍यांसाठी तर मजेदार असतोच, पण आरोग्य कमावण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा नसलेल्यांसाठी तो मनोरंजकही ठरू शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आत्मनिरीक्षणाचा एक तरी क्षण येतोच येतो. अशा वेळी पहिली नजर चेहरा, डोळ्यांखालची काळी वर्तुळं, उडत चाललेले किंवा पांढरे पडत चाललेले केस यांपैकी कुठेही न जाता पोटाच्या वाढत्या घेरावर स्थिरावते. आवडते कपडे घट्टं व्हायला लागलेले असतातच. डॉक्टरांनी वजन नियंत्रणात ठेवायला सांगितलं असतं. आणि त्याच गाफील क्षणी पहाटे उठून चालायला जाण्याचा संकल्प सुटतो.

हा संकल्प करणं फार सोपं असतं. सरत्या वर्षाला निरोप देताना तर अनेक जण हा संकल्प नेमाने करतात. पण तो सुरू ठेवणं, तेवढंच कर्मकठीण काम! सुरुवात होते, पहाटे उठण्यापासून. कोणीतरी म्हणून गेलंय, ‘तुमच्या पलंगापासून ते तुमच्या चपलांपर्यंतच अंतर हे सर्वात मोठं असतं.’ अर्थात, हे वाक्य सकाळी उठून चालायला किंवा धावायला जाणार्‍यांसाठीच त्या कुणीतरी म्हणून ठेवलंय. अगदी मोजक्या पब्लिकसाठी असलं, तरी या वाक्यामागील खरेपणा काही दुर्लक्षून चालणार नाही. मुंबईत राहत नसाल, तर अगदी उन्हाळ्यातही पहाटेचं वातावरण छान गार असतं. त्यात पहाटेची साखरझोप आणि उबदार दुलई, असा योग असेल, तर मग डोळा उघडता उघडत नाही. त्यातूनही नव्याने लग्न झालं असेल, तर मग बोलणंच नको!

- Advertisement -

हे एवढे सगळे सुखावह मोह सोडून मोठ्या निकराने उठून चालायला जाणं, खरंच खूप कठीण असतं. पण मॉर्निंग वॉकर्सचा प्रवास सुरू होतो तो या बिछान्यापासूनच! सुरुवातीचे काही दिवस कर्णकर्कश गजर वाजला की, निमुटपणे उठून बसायचं. बाजूला किंवा खोलीत इतरत्र झोपलेल्यांच्या शिव्या खायच्या आणि थोडा वेळ भोवतालाचा अंदाज घेत चाचपडायचं. मग अक्षरश: कोण्या अज्ञात शक्तीने ओढल्यासारखं पाय खेचत पहिले बाथरूम किंवा बेसिनपाशी जाऊन पाण्याचे हबकारे तोंडावर मारून ताजंतवानं व्हायचं.

नवीन वर्ष संकल्पवाल्यांच्या मॉर्निंग वॉकची सुरुवात बूट आणि कपडे खरेदीपासून होते. काही जण दंडाला मोबाईल अडकवण्याचे पट्टेही विकत घेतात. मग नव्या वर्षाच्या दुसर्‍या-तिसर्‍या आठवड्यात ते यथावकाश कपाटात धुळ खात पडतात. पण त्यातही काही चिवट मॉर्निंग वॉकर्स असतातच. साधारण पहाटे पाच साडेपाच ते सकाळचे अगदी नऊ ही या मॉर्निंग वॉकर्सची वेळ!

- Advertisement -

घराजवळील एखादं उद्यान, खास चालण्यासाठी म्हणून केलेला रस्ता, टेकडी, तलाव, खाडीलगतचा रस्ता, समुद्रकिनारा आणि यापैकी काहीही नसेल तर घराखालचा रस्ता ही या मॉर्निंग वॉकर्सची कार्यक्षेत्रं. बर्‍याचदा मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने हा संकल्प सुटलेला असतो. त्यामुळे मग दोन-तीन किंवा त्यापेक्षा जास्त जणांसोबत हा प्रवास सुरू होतो. सुरुवातीच्या काळात अगदी निग्रहाने चालणारे हे लोक हळूहळू गप्पांच्या मार्गावर येतात आणि मग यातूनच वेगवेगळे कट्टे तयार होतात.

तरुण मंडळी असतील, तर एखाद्या चहाच्या टपरीजवळ किंवा ‘प्रेक्षणीय स्थळं’ अधिक प्रेक्षणीय दिसतील अशा एखाद्या जागेजवळ कोंडाळं जमतं. मध्यमवयीन हमखास चहाच्या टपरीवर आढळतात. म्हातारे लोक मात्र उद्यान, तलाव अशा ठिकाणी त्यांच्यासाठीच बसायला केलेल्या बाकड्यांवर ऊन खात किश्श्यांची चंची उघडून सुपारीच्या खांडासारखा एक एक किस्सा चघळत बसतात.

या चर्चांचे विषयही भन्नाट असतात. फिरायला येणार्‍या मध्यमवयीन किंवा म्हातार्‍या बायका ‘शेजारच्यांच्या अमकीने तमुक केलं’ या घरगुती विषयांपासून ‘अमुक मालिकेत तमुक झालं’, ‘अमेरिकेत मुलगा बोलावतोय’ वगैरे आंतरराष्ट्रीय विषयांपर्यंत पोहोचतात. पुरुषांमध्ये हे विषय ‘काय मग जोशी, तुमचा मोदी उद्धवला सोडत नाही’ वगैरे गल्ल्यांमधून फिरून ‘शुगर-कॉलेस्ट्रॉल-बीपी’ वगैरेंवर येऊन थांबतात. तरुण मुलामुलींचा घोळका असेल, तर हमखास कोण्या एका बापड्याला पिडणं सुरू असतं. मुली-मुली एकत्र चालताना त्या नेमक्या कोणत्या विषयाबद्दल बोलत आहेत, हेच कळत नाही. एक तर देशाच्या सुरक्षेबद्दलचं गुपित सांगितल्याच्या आविर्भावात त्या बोलतात. बहुतेक वेळा ‘मागून येणार्‍यांपैकी निळा टीशर्टवाला तुझ्याकडे बघतोय… मिंत्रावर सेल लागलाय’ अशी निसटती वाक्यंही ऐकू येतात. मुलांचं काही वेगळं चाललेलं नसतं. फक्त त्यांच्या विषयात आदल्या रात्रीच्या फुटबॉल मॅचचा संदर्भ डोकावून जातो, एवढंच काय ते!

मॉर्निंग वॉकला येणार्‍यांच्या चालण्याच्या तर्‍हाही निरनिराळ्या असतात. काही जण अगदी निग्रहाने चालतात. ‘दहा दिवसांत वजन उतरवतो की नाही, बघा,’ हे वाक्य त्यांच्या चालण्यातूनही ऐकू येतं. काही हात असे पुढे-मागे हलवत चालतात. काहींना मध्येच हात वर करून टाळ्या वाजवायची सवय असते, काही मध्येच धावतात-मध्येच चालतात, काही जण मध्येच हात वर करून दुसर्‍याला हाळी देतात, काही कानातला ब्लुटूथ हेडफोन पडणार तर नाही ना, या चिंतेत असतात, काही जण हातातल्या फिटनेस बँडवर सतत किती पावलं चाललो, हे बघत असतात, काही सावकाश एक एक पाऊल टाकत असतात, काहींची नजर सवयीने नेहमीचे चेहरे शोधत असते, काही हातातला नॅपकीन उगाच फिरवत त्या वार्‍यावर पुढे सरकत असतात.

दिल्लीत असताना तिथल्या पार्कमध्ये नेमाने सकाळी चालायला जाणं व्हायचं. एक तर दिल्लीत विस्तीर्ण उद्यानं भरपूर! त्यात थंडीच्या दिवसात जरा सूर्य बाहेर पडला की, दिल्लीकर मंडळी शेकायला बागांमध्ये आलीच समजायची. इतर वेळीही ‘चढ्ढाजी’, ‘मिश्राजी’, ‘चोपडा साब’, ‘चावला’ वगैरे मंडळी गोल करून व्यायाम करताना दिसायचे. मध्येच मोठ्ठा हशा उसळायचा आणि सगळेच लाफ्टर क्लबी हसायला लागायचे. जाम मजा वाटायची ते पाहताना! तिथले गप्पांचे विषय मात्र एक तर सेक्रेटरिएटभोवती नाहीतर दुकानांभोवती घुटमळणारे!

कामानिमित्त एक महिना लेबनॉनमधल्या बैरूतमध्ये राहणं झालं. तिथेही मॉर्निंग वॉकला निघालं की, काही चेहरे हमखास दिसायचे. भूमध्य समुद्राची निळाई डोळ्यात साठवत वॉटरफ्रंटवरून चालायला मजा यायची. चढ-उताराच्या रस्त्यांवर एखादं टुमदार वळण असायचं, तिथे एखादी अरबी ख्रिश्चन असलेली ललना कुत्र्याला फिरवायला आली असायची, काही जण न्याहरी विकत घ्यायला बाहेर पडलेले दिसायचे. ‘कि-फाक’ म्हणजे कसे आहात, अशी एकमेकांची विचारपूस व्हायची. छान वाटायचं!

एक तर सकाळची वेळ प्रसन्न असते. हवेत थोडासा तरी गारवा असतो. दिवसाला घाम फोडणारी आणि त्याचा श्वास कोंडणारी रहदारी सुरू झालेली नसते. थंडीचे दिवस असतील, तर दवं वगैरे पडलेलं असतं. अगदी मर्ढेकरांच्या कवितेचा आधार घ्यायचा, तर ‘डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी… नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती… कुठे धुराचा जळका परिमळ, गरम चहाचा पत्ती गंध, कुठे डांबरी रस्त्यावरती भुर्‍या शांततेचा निशिगंध’ असं चित्रं असतं. त्या शांततेत चार घटका मोकळा श्वास घेता येतो. बरोबर कोणी नसेल, तर ‘आपुलाची वाद आपणांसी’ होतो.
मुंबई, पुणे, दिल्ली असो की लेबनॉन वा इतर कोणताही देश, मॉर्निंग वॉक आणि मॉर्निंग वॉकर्सचं जग फार बदलत नाही. सुरुवातीला संकल्प म्हणून या जगात प्रवेश होतो. तो टिकला, तर मग सवय लागते. ती एवढी अंगवळणी पडते की, पावसापाण्यातही हा वॉक चुकत नाही. मॉर्निंग वॉकर्सचं जग नकळत आवडू लागतं आणि आपणही त्या जगाचा भाग होऊन जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -