घरफिचर्ससारांशभय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही…

Subscribe

जपानमध्ये प्रत्येक अभिवादनावेळी कंबरेत वाकण्याची म्हणे पध्दत आहे. येथे जपानमधील महागाई आणि कोरोनानंतरच्या एक्स्ट्रा खर्चामुळे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जपानला जाताना खर्चाच्या ओझ्यानं आधीच वाकलेलो आहोत. फक्त भय एवढ्याच गोष्टीचं आहे, की कोरोना पॉझिटिव्ह चुकून आढळलोच तर ते कंबरेत झुकुनच विनम्रपणे मला डिपोर्ट करतील आणि मग खर्चाच्या बोजानं मोडलेल्या कंबरड्याने गुमान भारतात परतावे लागेल. पण सध्या तरी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’च्या थाटात टोकियोत आलो आहे. मनात भीतीचे ठोके पडत आहेत. ती भीती मोजण्याचे कोणतेही साधन सध्या उपलब्ध नाही. मी ग्रीस, ब्राझिल, लंडन, बिजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचे वार्तांकन केले. पण टोकियोतील भय खरंच संपत नाहीय...

कलेक्टरी तो हम शौक़ से करते हैं, रोज़ी-रोटी के लिए नहीं. दिल्ली तक बात मशहूर है की, राजपाल चौहान के हाथ में तंबाकू का पाइप और जेब में इस्तीफा रहता है.

‘सूर्या’ सिनेमात राजकुमारनं रंगवलेला चौहान सध्या टोकियोला येताना माझ्या अंगात भिनला होता. फक्त शब्दात बदल एवढाच की हा चव्हाण तोंडावर मास्क आणि खिशात डिपोर्टेशनचे पत्र घेऊनच आलो आहे.

- Advertisement -

ऑलिम्पिकसाठी जपान दौर्‍याची तयारी करताना माझी काहीशी अशी अवस्था झालीय. टोकियो ऑलिम्पिकला मी निघतोय. हे माझे पाचवे ऑलिम्पिक. पत्रकार म्हणून गेल्या 26 वर्षात जवळपास 38 देशांत प्रवास केला. पण यंदाच्या जपान प्रवासाइतकी अनिश्चितता मी कधीही अनुभवलेली नाही. अगदी अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर हल्ला झाल्यानंतर झालेल्या 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्येही नाही. दिवसागणिक जग बदलतेय पण भय काही इथले संपत नाही…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियोमध्ये 2020 मध्ये होणारे ऑलिम्पिक आता 2021 मध्ये होतेय. कोरोनाची भीती काहीशी निवळलीय, पण बंधनं जैसे थै तशीच आहेत. आता हेच पहाना मला जपानला जायच्या आधी सलग सात दिवस आरटीपीसीआर ही कोरोना टेस्ट करावी लागली. बरं ही टेस्टही जपान सरकारनं ठरवलेल्या मुंबईतील मोजक्याच केंद्रांवर होती. या मोजक्या केंद्रात आपलं दादरचं मराठमोळं फडके लॅब पाहून जरा बरं वाटलं. तर या सातही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे जपानच्या एअरपोर्टवर प्रवेश मिळला. तेथे पुन्हा टेस्ट झाली, ती टेस्ट निगेटिव्ह होती. मला थेट ऑलिम्पिक समितीनं निर्धारीत केलेल्या बायोबबलच्या हॉटेलवर तीन दिवस कोंडून रहावे लागत आहे. त्या तीन दिवसात दररोज टेस्ट होत आहे. ती निगेटिव्ह आहे. त्यामुळे स्टेडियमपर्यंत जाता आले. 14 दिवसांनी पुन्हा टेस्ट होणार. ती निगेटिव्ह निघाली तर मग टोकीयो भटकता येणार. यापैकी माझी कोणतीही टेस्ट पॉझिटिव्ह आली की बाडबिस्तारा गुंडाळून थेट जपानमधून मुंबईला डिपोर्टेशन म्हणजेच जबरदस्तीची पाठवणी.

- Advertisement -

आयुष्यात निगेटिव्ह शब्दाचा मी कधीही एव्हढा बाऊ केला नव्हता…निगेटिव्ह विचार करू नका असे लहाणपणासून शिकवले जायचे, पण कोरोनानं निगेटिव्ह शब्दाभोवतालची काजळी आता कमी करून आत्मियता आणलीय…कोरोनानं केवळ शब्दांचेच नव्हे तर जगण्याचेही सारे संदर्भ बदलून टाकलेत. सोशल डिस्टन्सिंग हा एक नवा शब्द आपल्या जीवनाच अविभाज्य भाग बनलाय. मला आठवतंय, 2004 साली अथेन्स ऑलिम्पिकवर दहशती हल्ल्याचे सावट होते. अमेरिकेत ट्विन टॉवर कोसळला होता. युरोपमध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. ग्रीससारख्या गरीब देशांनं मग नाटोपासून थेट अमेरिकेकडे सुरुक्षाव्यवस्थेसाठी मदतीची मागणी केली होती. त्यावेळी ऑलिम्पिकच्या संवेदनशील जागांवर पांढर्‍या आणि लाल रंगाच्या पट्ट्या आखण्यात आल्या होत्या.

तुमची ओळख पटल्याशिवाय त्या लाल रंगाची पट्टी ओलांडलीत की सैनिकानं तुमच्यावर बंदूक ताणलीच समजा. एकप्रकारचे ते सुरक्षा सोशल डिस्टन्सिंगच होते. पण हे सुरुवातीच्या तीन चार दिवस चाललं. जसजसं जगभरातून ऑलिम्पिकसाठीचा लोंढा अथेन्समध्ये येऊ लागला तसतशी ही कठोरता शिथिल होत गेली… पण यंदा जपानमध्ये परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळी दहशतवादी हल्ल्याच्या भीतीपोटी विदेशातील एअरपोर्टवर संपूर्ण कपडेही उतरवावे लागले होते, आता कोरोनाच्या भीतीपोटी आहे त्या कपड्यांवर मास्क, हँडग्लोव्हज, आवश्यक असेल. जणू पीपीई किट वाटेल. गमतीचा भाग सोडून द्या, पण कितीही काळजी घेतली तरी मनातील भीती घालवणार कशी? स्पर्धेचे वार्तांकन करणार्‍या आम्हा पत्रकारांचे हे हाल आहेत तर स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंची मानसिक अवस्था काय असेल याचा फक्त विचार करा. स्पर्धेतील कोणत्याही फेरीदरम्यान ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना स्पर्धेतून बाद करणार. यावर अजूनही नियामांची खलबतं सुरू आहेत.

त्या मानानं बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकला सुरक्षेचा फारसा बागुलबूवा नव्हता. पण ब्राझिल ऑलिम्पिकला मात्र स्थानिक गुंडगिरीचा जबरदस्त फटका बसला होता. ऑलिम्पिक कव्हर करणार्‍या आम्हा पत्रकारांना लेखी सूचनाच दिली होती, त्यामध्ये सातच्या आत हॉटेलवर, मोबाईल घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावर हिंडू नका, सांयकाळी सोने अंगावर बाळूगून फिरू नका, कुणी बंदुकीचा धाक दाखवून अंगावरील सोने, पैसे किंवा मोबाईलची मागणी केली तर कोणतीही खळखळ न करता त्याला ती देऊन टाका आणि मग पोलीस तक्रार करा, असं आम्हाला कळवण्यात आलं होतं. ब्राझिलमध्ये हॉटेलवर शिरताच आमच्या हातात हे प्रेमपत्र देण्यात आले होते. सुदैवानं कोणतीही वाईट घटना घडली नाही, उलट ब्राझिलवासियांशी जरा आत्मियताच जडली. मुळात एखादा ब्राझिलियन जर तुम्हास भेटला तर त्यांच्या संस्कृतीनुसार आधी गळाभेट केल्याशिवाय भेटीची सुरुवातच होत नाही. स्री आणि पुरषांसाठी पद्धत तीच. ब्राझिलच्या दौर्‍यात कीती गळाभेटी झाल्या याची मोजदादच नाही.

एकदा मी ज्या हॉटेलवर उतरलो होतो त्या रुमची चावी मी अनावधानानं रुममध्येच विसरलो. परत आलो तेव्हा चावी आत राहिल्याचे लक्षात आले. मी रिसेप्शनवर आलो. तेथे एक सुंदर रिसिप्शनिस्टनं माझं सुहास्य वदनानं स्वागत केले. मी तिला म्हटलं आय लॉस्ट माय की…ब्राझिल ही पोतुर्गालांची वसाहत असल्यानं तिथं पोर्तुगीज आणि स्पॅनिश बोलले जाते . इंग्लिशची तशी बोंबचं. काही केल्या तिला की या शब्दाचा अर्थ कळेना. एरव्ही हातवारे करून तुम्ही सांगू शकता, पण ‘की’ या शब्दात तीही सोय नाही. उगाच ती भलतासलता अर्थ काढायची. शेवटी मी कंटाळून माझ्या मराठमोळ्या शब्दात म्हटलं हिला सालं चावीसुद्धा कळत नाही. माझ्या तोंडून चावी हा शब्द एकताच ती जोरात किंचाळली… ओ यू वाँट चावी… असं म्हणून ती काऊंटरवरून बाहेर येऊन ओ मॅन बोलत तिनं माझी गळाभेट घेतली. येथे मी अलिंगन वैगरे शब्द वापरत नाही. मग मला कळलं की चावी हा मुळात पोर्तुगीज शब्द आहे. आणि मी पोर्तुगीज भाषा तिच्यासाठी वापारली याचा तिला कोण आनंद झाला होता आणि त्या आनंदाचा शेवट मिठीत झाला होता.

तर अशा या गळाभेटींची इतकी सवय झाली की मी भारतात परतल्यावरही ती काही काळ शिल्लक होती. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याचे अवघड पडसाद पडायच्या आता ही सवय सुटली हा भाग वेगळा… पण विचार करा हाच कोरोना 2016 सालच्या ब्राझिल ऑलिम्पिकच्या वेळी आला असता तर सोशल डिस्टन्सिंगचा किती फज्जा उडाला असता. आता ब्राझिलमध्ये काय करतात माहीत नाही. पण उत्साही ब्राझिलियन्सनी त्यावरही शक्कल लढवलीच असेल.

जपानमध्ये प्रत्येक अभिवादनावेळी कंबरेत वाकण्याची म्हणे पध्दत आहे. येथे जपानमधील महागाई आणि कोरोनानंतरच्या एक्स्ट्रा खर्चामुळे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जपानला जाताना खर्चाच्या ओझ्यानं आधीच वाकलेलो आहोत. फक्त भय एवढ्याच गोष्टीचं आहे, की कोरोना पॉझिटिव्ह चुकून आढळलोच तर ते कंबरेत झुकुनच विनम्रपणे मला डिपोर्ट करतील आणि मग खर्चाच्या बोजानं मोडलेल्या कंबरड्याने गुमान भारतात परतावे लागेल. पण सध्या तरी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’च्या थाटात टोकियोत वावरत आहे. मनात भीतीचे ठोके पडत आहेत. ती भीती मोजण्याचे कोणतेही साधन सध्या उपलब्ध नाही… भय इथलं खरंच संपत नाहीय…

–संदीप चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -