घरफिचर्सनाटककार बाबुराव गोखले

नाटककार बाबुराव गोखले

Subscribe

ज्येष्ठ नाटककार बाबुराव गोखले यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1916 रोजी झाला. जन्मभर बाईडींग आणि वृत्तपत्र विक्रीत रमलेल्या बाबुरावांना खाण्याचा, पळण्याचा, चालण्याचा, व्यायामाचा, अघोरी वाटाव्या अशा गोष्टी करण्याचा छंदच होता. रोज पहाटे साडेतीनला उठून, कात्रज, खेड-शिवापूर करत, कल्याण दरवाजामार्गे सिंहगडावर चढून, खडकवासला, मार्गे सकाळी नऊला दुकानात परतत. काही काळ रोज लोणावळ्यापर्यंत पायी जात. पुढे दर रविवारी सायकलवरून खोपोलीपर्यंत जाण्याचा नेम चुकला नाही. पुणे ते कराची सायकल फेरी करून जद्नबाई, हुस्नबानू, बेगमपारोचे मनमुराद गाणे ऐकले आहे. बाबुराव स्वत: तबला वाजवत. गंधर्वांची गाणी तोंडपाठ हे कळल्यावर नर्गिसच्या आईने जद्नबाईने त्यांना कराचीत थांबवून त्यांच्याकडून गंधर्वांची गाणी शिकून घेतली.

सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने १९३६ साली ते बर्लिन ऑलिंपिकपर्यंत पोहोचले. पायात चप्पल-बूट काही न घालता, ४० मैल पळू शकतात, हे पाहून दस्तूरखुद्द हिटलरने त्यांना जर्मनीत चार दिवस मुक्त भटकण्यासाठी, हवे ते खाण्यासाठी पास दिला. बडोद्याच्या महाराजांमुळे लंडनलाही गेले. स्वागताला तीन-चार गव्हर्नर्स गाड्यांसह हजर. पुण्यात पेपर विकणार्‍या गोखल्यांच्या स्वागताला एवढे गव्हर्नर्स आत्मीयतेने कसे जमले, असा प्रश्न सयाजीराव महाराजांना पडला. उत्तर मिळाले. दर पावसाळ्यात पुणे मुक्कामी येणार्‍या गव्हर्नरला मराठी-हिंदी भाषा आणि क्रॉसकंट्री शिकवायला बाबुराव जात असत.

- Advertisement -

पर्वती चालत कुणीही चढेल. बाबुराव हातावर शीर्षासन करत पायर्‍या चढत. बायकोला पाठुंगळी घेऊन ४३ वेळा पर्वती सर केलीय. क्रॉसकंट्री स्पर्धेचे २५७ बिल्ले जिंकणार्‍या गोखलेंना काका हलवाई एक शेर दूध, एक शेर पेढ्याचा खुराक देत. महाराष्ट्र मंडळाच्या पैजेच्या जेवणात ९० जिलब्यांचे ताट सहज फस्त करत. वयाची शंभरी ओलांडल्यावरही बाबुराव रोज १५ पोळ्या रिचवू शकत होते. त्यांनी आपल्या डझनभर नाटकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा मास्टरपीसच. ‘अन झालं भलतंच’,‘रात्र थोडी सोंगं फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे, शाप कुणाला’, ‘ते तसे, तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ’ ही नाटके नावापासूनच नाट्यमय ठरली.

बाबुरावांनी अनेक नाटके लिहिली, सादर केली. त्यासाठी ‘थ्री स्टार्स’ ही कंपनी स्थापन करून अनेक उत्तम नाटके दिली. दिग्दर्शक, निर्माते, प्रमुख भूमिका, पार्श्वसंगीत, म्युझिक सेट्स तयार करणे या सगळ्यांत अग्रेसर असणारे बाबुराव मनाने अगदी हळवे होते. बाबुरावांनी अनेक भावगीते लिहिली, परंतु गजानन वाटवे यांनी गायलेले आणि दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेले ‘वारा फोफावला..’ हे गीत फार गाजले. इतके की,‘वारा फोफावला’चे बाबुराव गोखले असेच त्यांना ओळखले जाऊ लागले. ‘नाखवा वल्हव वल्हव..’ हे त्यांचे गीतसुद्धा त्या वेळी लोकप्रिय झाले होते. अशा या महान नाटककाराचे 28 जुलै 1981 रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -