घरदेश-विदेश...तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

…तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

Subscribe

पेगॅसस प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले असून पेगॅससवर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकार चर्चेला तयार नाही आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राष्ट्राच्या सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी तीन तास मागत आहोत. जर हे सरकार तीन तास देऊ शकत नसेल तर या सरकारच्या हातामध्ये राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. आज ते माध्यमांशी बोलत होते.

पेगॅससच्या चर्चेसंदर्भात विरोधकांची मागणी साधी आहे. चर्चा सुरु करा आणि प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री यांनी चर्चेच्या वेळी उपस्थित रहावं. त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची का? की जीपीसी चौकशी नेमायची? हा नंतरचा विषय आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षा, नागरिकांचं स्वातंत्र्य या सगळ्याशी संबंध आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांच्या अस्तित्वाने फरक पडत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हे ऐकणं गरजेचं आहे. सरकार यापासून का पळ काढतंय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. एवढ्या गंभीर विषयावर केंद्राचे गृहमंत्री, पंतप्रधान तीन तास देऊ शकत नाहीत का? आम्ही फक्त तीन तास मागतोय देशासाठी…आणि जर सरकार तीन तास देशाच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातामध्ये राष्ट्र सुरक्षित नाही, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

सरकारला संसद चालवू द्यायची नाही

सरकारला संसद चालवू द्यायची नाही. सरकार विरोधी पक्षांवर ठपका ठेवत आहे. पण सरकारलाच संसद चालवू द्यायची नाही आहे, गोंधळ घालायचा आहे. सरकारला पेगॅससवर ऐकण्याची भिती वाटतेय. विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून जाणवत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -