घरताज्या घडामोडीपोलादपूरमधील दरडग्रस्त रस्ते घेताहेत मोकळा श्वास..

पोलादपूरमधील दरडग्रस्त रस्ते घेताहेत मोकळा श्वास..

Subscribe

दरीच्या बाजूने वाहतुकीस रस्ता धोकादायक आहे.

गेल्या २२ जुलै रोजीच्या अतिवृष्टीत दरड कोसळून त्याखाली गुदरलेले रस्ते आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव हद्दीत ४ फुटांपेक्षा अधिक रस्ता खचला, तर महाबळेश्वर मार्गावर अंबेनळी घाटात चिरेखिंड ते वाडा इथपर्यतच्या अंतरात सातारा जिल्ह्याच्या सीमेपासून मेटकुळे गावापर्यंत आणि ग्रामीण मार्गावर ठिकठिकाणी महाकाय दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या.

अंबे नळी घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या सूचनेनुसार दुसर्‍या दिवशीच जेसीबी यंत्राद्वारे दरड हटविण्याचे काम सुरू झाले होते. चिरेखिंडपासून वाडा तालुक्याच्या हद्दीतील साडेचार किलोमीटर अंतरात कोसळलेल्या दरडी हटविण्यात आल्या आणि पुढे सातारा जिल्ह्यातीलही १० किलोमीटर अंतरापर्यंतच्या दरडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात आल्या आहेत. आता सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी यंत्राद्वारे दरडी हटविण्याचे काम सुरू असून, ४-५ दिवसांच्या अवधीत महाबळेश्वर मार्गावरील दरडी हटविण्यात येतील. त्यामुळे मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ही वाहतूक छोट्या वाहनांसाठीच असण्याची शक्यता आहे. दरीच्या बाजूने वाहतुकीस रस्ता धोकादायक आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यत्यारितील पोलादपूर ते बोरघर-कामथे रस्त्यावरील पितळवाडी जवळच्या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील २५ गावे आणि वाड्यांचा संपर्क पूर्ववत झाला आहे. बोरजफाटा ते दाभिळ या अंतर्गत रस्त्यावरील देवळे गाव हद्दीतील नरवीर तानाजी मालुसरे विद्यालयाजवळ रस्ता दोन्ही बाजूने खचला होता. तर हळदुले ते दाभिळपर्यंत ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर लागतचा डोंगर कोसळला होता. २७ जूलैपासून दोन जेसीबी यंत्रे काम करत होती. १४ व्या दिवशी रस्त्यावरील ही महाकाय दरड हटविण्यात रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला यश आले.

तसेच चांदके, खोपड, मोरसडे, आडाचा कोंड, कामथे, फौजदारवाडी, धारवली, कालवली या रस्त्यांवरील दरडी हटविण्यात आल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे महाड-पोलादपूरचे उप अभियंता नरेंद्र देशमुख यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथील उप कार्यकारी अभियंता रामदास बागूल यांनी नेहमीप्रमाणे माहिती देण्यास टाळाटाळ केली. कशेडी घाटात भोगाव हद्दीत ४ फुटापेक्षा अधिक रस्ता खचला होता. त्याची शिंदे डेव्हलपर्स या ठेकेदार कंपनीकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे १५ दिवसानंतर दरडग्रस्त झालेले महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत रस्ते मोकळा श्वास घेते झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – …त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हिंदुत्वाची हाक दिली, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -