घरभक्तीगणपती गौरी अन, खान्देशातील भालदेव

गणपती गौरी अन, खान्देशातील भालदेव

Subscribe

रक्षाबंधन आणि पोळा या सणानंतर आनंदात अधिक भर घालण्यासाठी येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणपती म्हटलं की, आपल्या सर्वांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. गणपती प्रतिष्ठापणेनंतर तिसर्‍या दिवशी येणार्‍या गौरींना गौरी-गणपती असेदेखील म्हटले जाते. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला खान्देशातील घराघरात भालदेव बसविण्याची जुनी परंपरा आहे. साधारण तीन, पाच, सात आणि नऊ दिवसांसाठी भालदेवची स्थापना केली जाते. घराच्या दाराजवळ भालदेव बसवला जातो. भालदेव म्हणजे शेणाचा देव.

आपल्या देशाचं प्रतिकात्मक रुप हे सण-उत्सव आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरामधून दिसत असतं. याच परंपरा खर्‍या अर्थाने आपल्या देशाची सांस्कृतिक ओळख जपून आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीत सर्वच सण-उत्सवांना मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रात तर हे सर्व उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे केले जातात. श्रावण महिन्यापासून सण उत्सवांना सुरुवात होते. मुळातच या महिन्यात निसर्गाने हिरावाईचा शालू पांघरून पृथ्वी नटलेली असते. त्यामुळे वातावरणदेखील आल्हाददायी असते. त्यातच सण-उत्सव म्हणजे सर्वांच्या आनंदाला उधाण आलेले असते.

रक्षाबंधन आणि पोळा या सणानंतर आनंदात अधिक भर घालण्यासाठी येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणपती म्हटलं की, आपल्या सर्वांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. गणपती स्थापनेच्या साधारण दहा-पंधरा दिवस आधी संपूर्ण महाराष्ट्रात लगबग बघायला मिळते. गावापासून शहरापर्यंत गणपती डेकोरेशनपासून ते पूजेच्या साहित्याचे ठिकठिकाणी स्टॉल लागलेले असतात. गणपती मूर्तींचीदेखील विविध रुपे स्टॉलवर बघायला मिळतात. गावागावातील चौकात मोठमोठ्या मंडळांचे शेड उभे राहतात. गावातून वर्गणी गोळा करुन गणेशाची स्थापना केली जाते. सोबतीलाच घराघरातदेखील गणपती बाप्पा विराजमान होतात. पूर्वी गणेशोत्सवात जिवंत देखावे उभे करण्याकडे मंडळांचा कल असायचा. यातून अनेक मनोरंजनाच्या गोष्टी दाखवल्या जायच्या. सोबतच सामाजिक विषय घेऊन भाविकांच्या मनाचा ठाव घेतला जायचा. मंडळासमोर मोठ्या पडद्यावर दाखवले जाणारे चित्रपट एकप्रकारे मनोरंजनाची पर्वणीच असायची. कालांतराने गणेशोत्सवाचे रुप बदलत गेले. जिवंत देखाव्यांची जागा रेडिमेड देखाव्यांनी घेतली. लायटिंग, डेकोरेशन अन उंचच उंच गणेशमूर्ती आल्या. डॉल्बी अन ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन होऊ लागले.

- Advertisement -

शेकडो वर्षांपासून चालत आलेला उत्सव आता मात्र, अधिक जोमाने साजरा होऊ लागला आहे. गणपतीला हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता आणि विघ्नांचा नियंत्रक म्हटलं जातं. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करुन मोठ्या भक्तीभावाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. या दिवसात गणपतीला प्रसन्न करुन घरात सुखशांती नांदते. गणपतीची सेवा करुन त्याला आवडणारे मोदक आणि लाडूचा प्रसाद बनवून दिला जातो. विविध आभूषणे घालून भक्तिभावाने अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाची सेवा केली जाते. गणेशोत्सवात सोयीनुसार एक दिवस सत्यनारायण पूजा केली जाते.

प्रतिष्ठापणेपासून ते विसर्जनापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते रोज साफसफाई, दुर्वा, हार, फुलं सकाळ-संध्याकाळ आरती आणि विविध उपक्रम उत्साहात करतात. त्याचबरोबर घराघरातदेखील बाप्पांची अशीच सेवा मनोभावे केली जाते. या दहा दिवसांत घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही असते. गावातदेखील चौकाचौकात गणपती मंडळातर्फे बाप्पा विराजमान झालेले असतात. यामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालेले असते. अनेक ठिकाणी तर नवसाला पावणारा गणपती म्हणून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. विसर्जनापूर्वी उत्तरपूजा करुन मोठ्या उत्साहात बाप्पांचे विसर्जन केले जाते. विसर्जनाच्या दिवशी मंडळांच्या मिरवणुका आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो.

- Advertisement -

गौरी

गणपतीबरोबर येणारा गौरी सणदेखील अनेक घरात साजरा केला जातो. म्हणूनच गणपती प्रतिष्ठापणेनंतर तिसर्‍या दिवशी येणार्‍या गौरींना गौरी-गणपती असेदेखील म्हटले जाते. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात येते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरुन या गौरींना घरात आणले जाते. यावेळी गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते.

ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून तीन दिवस राहणार्‍या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. काही घरात फक्त मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. अनेक ठिकाणी आता लाकडी गौरीदेखील बसवल्या जातात.

कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. तर काहीजणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.

खान्देशातील भालदेव

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला खान्देशातील घराघरात भालदेव बसविण्याची जुनी परंपरा आहे. साधारण तीन, पाच, सात आणि नऊ दिवसांसाठी भालदेवची स्थापना केली जाते. घराच्या दाराजवळ भालदेव बसवला जातो. भालदेव म्हणजे शेणाचा देव. दुभत्या जनावरांचे शेण आणून ते दाराच्या बाजूला टाकले जाते. त्याचबरोबर घरातील केरकचरा या शेणावर टाकला जातो. जितके दिवस भालदेव बसवलेला असतो तितके दिवस कचरा त्यावरच टाकला जातो. भालदेवदेखील दोन प्रकारे बसवला जातो. यात ज्याच्या घरी दुभती जनावरे आहेत अशा घरी ओला भालदेव. तर, ज्यांच्या घरी नाहीत त्यांच्या घरी कोरडा भालदेव बसवला जातो. भालदेव विसर्जनाच्या दिवशी आवळीची गोंडे, फुले आणि मोहळ ठेवून पूजा केली जाते.

भालदेव बसवलेली जागा शेणाने सारवून शेणाच्याच गायी-म्हशी चारणारे गुर्‍हाखी ठेवले जातात. त्यांच्यावर आवळीची फुले, लव्हाळ उभे करुन ठेवले जाते. समोर दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच पापड्या, सांजोर्‍या ठेऊन त्यावर दिवे लावले जातात. विधिवत पूजा करुन भलदेवाचे पूजन केले जाते. भालदेव मागे अशी आख्यायिका आहे की, घराच्या दारात बसलेला भालदेव हा आपल्या घराचा पहारेकरीच असतो. म्हणून या दरम्यान घरातील दूध दुभत्या गोष्टी विकल्या जात नाहीत. इतकंच काय तर ताकसुद्धा बाहेर कुणाला दिलं जात नाही. जास्त असेल तर ते गरीबाला घरात बोलवून खाऊ घातलं जातं. पैसेदेखील देण्याची मुभा यादरम्यान नसते. कारण दारातला भालदेव घरातलं काहीच बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरच काही येऊ देत नाही. सांजोर्‍या, पापड्या हा नैवेद्य आजूबाजूच्या घरात वाटून भालदेवाचं विसर्जन केलं जातं. दुभत्या जनावरांच्या शेणाचं पूजन करणारी खान्देशची संस्कृती नक्कीच कौतुकास्पद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -