शेगुल

Subscribe

गणपतीच्या दिवसात गौरी आवाहनाच्या दिवशी शेगलाच्या भाजीला मोल चढते. गौरीच्या समोर भाकरी आणि शेगलाच्या भाजीचा नैवेद्य सजतो. हातभेटीचा तो प्रसाद तुकडा तुकडा खाताना सगळ्या आठवणी गोळा होतात. मागच्या वादळात चक्कीच्या बाजूला इतकी वर्षे उभा असलेला शेगुल थोडासा कडकडला, वादळात पिळवटला, पण उखडला नाही. तसाच ताठ उभा राहिला. गेल्या महिन्यात गावी गेलो तेव्हा बघितलं, माझ्या बालपणीचा एक कालखंड बघितलेला हा शेगुल घट्ट पाय रोवून उभा होता.

शेगलाचं आणि माझं नातं अगदी लहानपणापासूनच. मी गावी गेलो की, थोरली काकी माझ्या किडकिडीत शरीरयष्टी आणि उंचीकडे बघून काय रे शेगलासारो वाडत गेलस, असं म्हणायची. माझी वाढत गेलेली उंची आणि अंगावर मास नसलेल्या शरीराला शेगलापेक्षा चांगली उपमा देता येणार नव्हती. हल्ली बाजारात भाजी आणायला गेलो की, आई आवर्जून सांगते, येताना चार शेगलाच्या शेंगा घेवन ये. बाजारात एका भाजीवाल्याकडे ह्या शेगलाच्या शेंगा वीस रुपयाला पाच ह्या दराने मिळतात. घरात येऊन भाजी कोपर्‍यात ओतली की, आईचे लक्ष ह्या शेगलाच्या शेंगांकडे जाते. ह्या शेंगा हातात घेत रे वायच बारीक शेंग्यो नाय गावल्यो. केदी सोकाटना हाडलस ही!.

जगातल्या कुठल्याही प्रसिद्ध भाजीवाल्याकडून भाजी आणा पण आणलेल्या भाजीतल्या शेगलाच्या शेंगा आईच्या मनाला येतच नाही. तिच्या दृष्टीने शेगलाच्या शेंगा म्हणजे गावच्या चक्कीच्या बाजूला असलेल्या शेगलाच्या शेंगेची चव दुसर्‍या कुठल्या शेंगेला नाही. वास्तविक इतर ठिकाणच्या शेगलाच्या शेंगांसारख्या याही शेंगा. तरी आईला गावच्या शेंगेची सर कशाला येत नाही हे अधोरेखित केलेलं सत्य. गावात सगळ्यांच्या परड्यात आंब्याच्या, फणसाच्या जोडीला पाटल्यादारी एखादा शेगुल उभा असतोच. सरळसोट उभा असलेला हा शेगुल साधारण थंडीचा मोसमाने उंची गाठली की, पालवायला सुरू होतो. म्हणजे गावातल्या जत्रा संपल्या की, माघ महिन्याच्या आसपास ह्या शेगलाला पालवी फुटायला लागते.

- Advertisement -

मुळापासून काळसर झालेले खोड, मध्येच कुठेतरी पांढरे झालेले. मधल्या सरळ खोडाला आजूबाजूला पसरत गेलेल्या आखूड फांद्या. त्या फांद्यांच्या टोकापर्यंत कुठेकुठे आखूड हिरवीगार पालवी लागलेली. आमच्या घराच्या पाटल्यादारावरून थेट चक्कीच्या दिशेने जाताना वयीच्या बाजूला शांत उभा असलेला शेगुल बघितला की, योगसाधनेत बुडालेला साधक वाटायचा. तेवढीच शांतता, मध्येच होणारी पानांची सळसळ ऐकून मनाची मरगळ क्षणार्धात दूर होते. ह्याच आखूड फांद्यांना शेंगा लगडलेल्या असायच्या. विहिरीवरून येणार्‍या-जाणार्‍या स्त्रियांसाठी हा शेगुल खूप जवळीक साधायचा. विहिरीचं पाणी शेंदायला सोबत आणलेलं काढणी आणि भांडी ह्याच शेगलाच्या मुळात ठेऊन त्या वयीला लावलेली काठी काढून त्या काठीच्या वरच्या बाजूला आडवी काठी लावून ह्या स्त्रिया शेगलाची शेंग बरोबर ह्या गेचक्यात अडकवून काठी ओढायचा की बरोबर शेंगा खाली पडायच्या.

आंबट वरण किंवा कातनाची डाळ केली की, त्यात दोन-चार शेगलाच्या शेंगा टाकल्याच पाहिजे तर त्या डाळीची रूची वाढते. साधा बटाट्याचा रस्सा केला की, चवीला म्हणून शेंगा टाकाव्या. नुसता बटाट्याचा रस्सा असं म्हणायची पद्धत कोकणात नाहीच. ह्या बटाट्याबरोबर शेंगा-बटाट्याचा रस्सा म्हणण्याची पद्धत ही सार्वत्रिक आहे. शेगलाच्या पाल्याची भाजी आवडते म्हणणारा माणूस विरळाच!. कोवळ्या पाल्याची हिरवीगार भाजी सुपात काढल्यावर ती सुबक दिसायची. संध्याकाळच्यावेळी सोबत आणलेली शेगलाच्या पाल्याची भाजी करताना त्या नाजूक डहाळीची सगळी कोवळी पाने बाजूला काढली की, ती नाजूक डहाळी बाजूला ठेवायची. ह्या डहाळ्या बैलांच्या पोटात जायच्या अगोदर ह्या बारीक शिरा वाकवून त्याचे बैल करण्याचे काम आम्ही मुलं करत असू. त्या बैलांबरोबर खेळून झालं की, त्या डहाळ्या तशाच खळ्यात पडून रहात. मग आबा आजोबांचे लक्ष तिकडे जाई आणि भाजी चिरत असलेल्या आईकडे किंवा नंदा काकीकडे येऊन आज जेवणात शेगलाचा पाला काय गो ?. एव्हाना पोरांनी खळ्यात डहाळ्याचा खेळ केलेला दोघींच्या लक्षात आला असे.

- Advertisement -

ह्या शेगलाच्या झाडाने तसं बघितलं तर माझ्या वाढीचा कालखंड बघितला आहे. लहानपणी ह्या शेगलाच्या झाडाच्या समोरच्या जागेत गुरांसाठी कावन घातलेलं असे. आमचा दिवसातला बहुतेक वेळ ह्या कावनाच्या अवतीभवती जात असे. गेल्या काही वर्षात घराच्या मागे असलेली चक्की रस्त्याच्या कडेला आली. पूर्वी बावीवर बायका पाणी भरायला जात असायच्या, पण हल्ली घरात नळ आल्यामुळे तिथेही जाणं होतं नाही. शेगलाकडे नाही म्हणायला दुर्लक्ष झालं आहे. तरी श्रावण महिना आला की, ह्या शेगलाची आठवण येतेच अष्टमीच्या दिवशी. अष्टमीच्या दिवशी गोकळा पूजताना हा शेगुल आठवतो. पण श्रावणात ह्या भाजीचा कडूपणा नाही म्हणायला थोडा कमी झालेला असतो. अष्टमीच्या दिवशी घरातल्या गोपाळकृष्णाला आंबोळ्या, काळ्या वाटाण्याचे सांबारे आणि जोडीला शेगलाची भाजी असाच नैवेद्य कोकणातील घरोघरी केला जातो.

तीनचार महिने वर्षाकाळ अनुभवून मत्त झालेला शेगुल आता चांगला डवरलेला असतो. हे झाडं एकतर पाल्याने, फुलांनी आणि अगदीच नाही तर खारी आणि पक्षांनी गजबजलेलं. शेगुल मुळात पोकळ. ह्या झाडाचा बांधकामास तसा फारसा उपयोग नाही. त्यामुळे ह्या लाकडाची जागा फारतर बैलांच्या वाड्यात बारक्या मेढींना आधार म्हणून आडवी मारायला. चैत्रपालवी लागली की, शेगुल फुलतो तो पिवळ्या फुलांनी. सकाळी झाडाखाली ह्या फुलांचा सडा पडतो. एकदा ताई हवालदारीनीच्या घरी सहज बसायला म्हणून गेलो तर तिने काचेच्या बशीत कसलीशी भाजी दिली आणि मला म्हणाली ओळख बगू. कसली भाजी ती?.

मी पहिल्यांदा चवीसाठी म्हणून चिमुटभर तोंडात टाकली. हिंग-मोहरीची फोडणी दिलेली भाजी कसली हे मला ओळखता येईना. भाजी मात्र चवदार लागत होती. मी बशीतली सगळी भाजी संपवली. ताई गालातल्या गालात हसत म्हणाली, वळाखलस कसली भाजी ती?. मला खरंच कसली भाजी ते ओळखता येईना. मी मला माहीत असलेल्या अनेक रानभाज्यांची नावे सांगितली. ताई, आता तूच सांग गे बाय. माका काय भाजी वळखाक येयत नाय. शेवटी ताईने सांगितलं की, ही शेवग्याच्या फुलाची भाजी. शेवग्याची भाजी खाताना तोंड कडू केलेल्या आम्हाला ही शेवग्याच्या फुलाची भाजी मात्र चवदार लागली. ह्या फुलाची भाजी होऊ शकते हे माझ्या गावी देखील नव्हते.

आजी मात्र सांगायची पितरा सुरू झाली की, शेवग्याच्या झाडाजवळ जाव नुको हा. आजी नाही सांगते मग त्याच्याविरुद्ध केलेच पाहिजे ही बालपणातील अजून एक सवय. आजीच्या जोडीला थोरली काकी पण रे पितराच्या दिवसात पितरा शेगलाच्या झाडावर उतारतत, त्या दिवसात शेवग्याची भाजी खाव नये हे ऐकून लहानपणी दररोज पितरे जर शेगलाच्या झाडावर बसली तर बरे होईल असली कडू भाजी खायला लागणार नाही. बालपणाच्या गोष्टी त्या. पण शेगुल किती बहुगुणी ते आजारपणात कळलं. दररोज चार अशी दीड महिना इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचा परिणाम दातांवर झाला. हे दात पुन्हा मजबूत करण्यासाठी डॉक्टरांनी शेवग्याच्या शेंगा खायला सांगितल्या. डॉक्टरांच्या मते शेवग्याच्या शेंगा चावल्या की कॅल्शियम मिळेल. शेवग्याच्या शेंगेचा हा गुण माहीत नव्हता.

गणपतीच्या दिवसात गौरी आवाहनाच्या दिवशी मात्र शेगलाच्या भाजीला मोल चढते. गौरीच्या समोर भाकरी आणि शेगलाच्या भाजीचा नैवेद्य सजतो. हातभेटीचा तो प्रसाद तुकडा तुकडा खाताना सगळ्या आठवणी गोळा होतात. मागच्या वादळात चक्कीच्या बाजूला इतकी वर्षे उभा असलेला शेगुल थोडासा कडकडला, वादळात पिळवटला, पण उखडला नाही. तसाच ताठ उभा राहिला. गेल्या महिन्यात गावी गेलो तेव्हा बघितलं, माझ्या बालपणीचा एक कालखंड बघितलेला हा शेगुल घट्ट पाय रोवून उभा होता. आपल्या सहस्त्र हातांनी जणू आता आलिंगन देतो आहे की, काय असे वाटावे!. ह्या शेगलाला आंब्या-फणसाच्या झाडाएवढं महत्व लहानपणी नाही मिळालं, तरीही त्याची महती माझ्यालेखी कधी कमी झाली नाही. कोकणी माणसाच्या लेखी शेगलाचे महत्व काय हे कवी डॉ. महेश केळूसकर यांनी त्यांच्या मालवणी कवितेत सांगितले आहे.

ह्यो बाय शेगुल शेगुल
जीवाचो माझ्या मैतर
फाल्या तो तोड्तले पाडतले
जिवाक माझ्या बाय लागलो घोर
ह्यो बाय शेगुल शेगुल
जीवाचो माझ्या बापूस
फाल्या तो हनतले खनतले
म्हायार माझा मगे झाला नास
ह्या भावना शेगलाबद्दल अशाच निरंतन टिकून आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -