घरताज्या घडामोडीपूरातत्व खात्याच्या आडमुठेपणामुळे वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा दुर्लक्षित

पूरातत्व खात्याच्या आडमुठेपणामुळे वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा दुर्लक्षित

Subscribe

वाड्यामध्ये क्रांतीकारकांच्या वस्तू धूळ खात पडल्या आहेत.

मुंबई – गोवा महामार्गावर पनवेलपासून ९ कि.मी. अंतरावर  शिरढोण हे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे. शिरढोण गावात असलेला आद्यक्रांतीवीरांचा वाडा आणि स्मारक ही वास्तू पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येते. पुरातत्व विभागाने स्थानिक गावकऱ्यांच्या,जनतेच्या लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा वाडा ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. पुरातत्व विभागाकडून २०१३ मध्ये वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले.सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या वाड्याची डागडूजीकरण झालेच, परंतु नुसतच वाड्याची डागडूजी करणे गरजेचे नाही,तर त्याची देखभाल करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होऊन डागडूजीकरण अथवा सुशोभिकरण करण्यासाठी हा वाडा ग्रामपंचायतीच्या हाती यावा, अशी शिरढोणमधील ग्रामस्थांची मागणी आहे.

वाड्यामध्ये क्रांतीकारकांच्या वस्तू धूळ खात पडल्या आहेत. वाड्यातील जमीन ही वेळोवेळी सारवली जात नाही. वाड्याचे नूतनीकरण झाले असले तरी, वाड्याच्या आत माहिती मिळेल अशी कोणतीही सुविधा नाही. क्रांतीकारकांनी वापरलेल्या वस्तू अथवा जीवनपट उलघडून दाखवणारी भित्तीचित्रे लावण्याची कार्यवाही अद्यापही केलेले नाही.याशिवाय येणाऱ्या पर्यटकाला इतिहास उलघडून सांगणारा मार्गदर्शकही नाही. नूतनीकरण केलेला वाडा अद्यापही नागरिकांसाठी खुला केलेला नाही. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या ४ नोव्हेंबर आणि १७ फेब्रुवारीला पुण्यतिथी निमित्त हा वाडा उघडला जातो. वाड्याच्या परिसरातील गवत काढून ग्रामस्थांकडून साफसफाई केली जाते. परंतु पुरातत्व खात्याकडून देखभाल केली जात नाही. याशिवाय वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांचे स्वहस्ताक्षरीत ’गुरुचरित्र’ आहे. स्मारकात गुरुचरित्राची एक प्रत असून, त्याची मूळ प्रत ही बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे आहे. ही मूळ प्रत आश्रमात असावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

- Advertisement -

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या विचारांची छाप तरुणांंवर पडावी,यासाठी शिरढोणमधील व्याख्याते मंदार जोग हे अनेक शाळा,कॉलेज अथवा इतर ठिकाणी जाऊन व्याख्यानं देत असतात. या गावात जे जे कार्यक्रम होतात त्याची सुरवात आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत यांच्या स्मरणानेच होते. वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त ४ नोव्हेंबर आणि पूण्यतिथीनिमित्त १७ फेब्रुवारीला क्रांतीज्योत आणण्यात येते. ज्या ज्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांचा संबंध आला अशा ठिकाणाहून पायी चालत क्रांतीज्योत आणण्यात येते.

“शिरढोण गावातील वाड्याचे बाह्यकाम पूर्ण झाले असून, आतील काम करण्यासाठी पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होऊन या वास्तूचे डागडूजीकरण अथवा सुशोभिकरण करण्यासाठी हा वाडा ग्रामपंचायतीच्या हाती यावा.”

- Advertisement -

-साधना कातकरी, सरपंच,शिरढोण

“अद्भुत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले ही कोकणाकडे वळत असतात. मात्र कोकणाकडे जाताना लागणारे ऐतिहासिक वारसा असणारे शिरढोण गाव दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे पनवेलहून कोकणात प्रवेश करण्याच्या पळस्पे फाटा मार्गावर ’आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके प्रवेशद्वार’ अशी कमानी असावी,जेणेकरून वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मभूमीची ओळख जगभर पसरेल.”

– मंदार जोग, व्याख्याते,ग्रामस्थ

 

शिरढोण गावचा क्रांतीमय इतिहास होतोय दुर्लक्षित…

पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास लाभला आहे. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले आणि तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. अशा  आद्यक्रांतीकारकांच्या विचारांची प्रेरणा पसरवण्याठी वासुदेव फडकेंच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे गरजेचे आहे. मात्र एकंदरीत पूरातत्व खात्याच्या आडमुठेपणामुळे वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा दुर्लक्षित होत आहे.


हे ही वाचा – Rajya Sabha bypolls : भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला, राज्यसभा पोटनिवडणूकीतून घेणार माघार 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -