घरफिचर्ससमाजसुधारक हमीद दलवाई

समाजसुधारक हमीद दलवाई

Subscribe

हमीद उमर दलवाई हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावी झाला. दलवाई यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयांमध्ये झाले. हमीद यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रभावामुळे संघटनेची स्थापना केली. मुस्लीम महिलांचे प्रश्न, शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा याबद्दल कोणीच बोलत नाही. या प्रेरणेतून दलवाई यांच्यातील सुधारक जागा झाला आणि १८ एप्रिल १९६६ रोजी त्यांनी मुस्लीम महिलांचा मोर्चा मुंबई विधानसभेवर काढला. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करण्याची, समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे केली.

मुस्लीम महिलांनी त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काढलेला हा पहिला मोर्चा होता. दरम्यान, दलवाई यांची महाराष्ट्रातील बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांशी मैत्री झाली. त्यात अ. भि. शहांची मैत्री महत्वपूर्ण मानली जाते. त्यांच्या पुढाकारातून १९६८ मध्ये ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना झाली. सेक्युलॅरिझम, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मवादी राजकारण, परंपरा-अंधश्रद्धा अशा विषयावर मूलभूत मांडणी आणि योगदान देणारी ही संस्था बुद्धिजीवी तसेच सामान्य मुस्लिमांपर्यंत पोहोचू शकत नाही हे लक्षात आले. हा विचार मुस्लीम समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने समतावादी मित्रांशी चर्चा करून २२ मार्च १९७० रोजी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. समाज प्रबोधनाच्या संतुलित विकासात मुस्लीम समाजानेसुद्धा योगदान दिले पाहिजे हा यामागील उद्देश होता.

- Advertisement -

मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लीम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लीम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लीम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले.

हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यासंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणार्‍या कोणाही द्रष्ठ्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.

- Advertisement -

हमीद दलवाई हे नॅशनल भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. राष्ट्रीय एकात्मता हे अंतिम उद्दिष्ट मानणारे, मुस्लीम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविले. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती. परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणार्‍या हमीद दलवाईंना भारतीय समाजात मानाचे स्थान आहे. अशा या महान समाजसुधारकाचे ३ मे १९७७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -