घरमहाराष्ट्रनाशिकदहनाच्या चटक्यापासून यंदाही रावणाची सुटका

दहनाच्या चटक्यापासून यंदाही रावणाची सुटका

Subscribe

सर्वच शहरांतील रावण दहन कार्यक्रमांवर राज्य सरकारने लादले निर्बंध

नाशिक : कोरोना संसर्गामुळे दहनाच्या चटक्यापासून यंदाही सलग दुसर्‍या वर्षी रावणाची सुटका झाली आहे. राज्यात मुंबईसह पुणे, रायगड, नगर, ठाणे, नाशिक अशा सर्वच शहरांतील रावण दहन कार्यक्रमांवर राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आज दसर्‍याच्या दिवशी होणारे रावण दहनाचे कार्यक्रम, आतषबाजी आणि जल्लोष नागरिकांना यंदाही अनुभवता आला नाही.

नाशिकमध्ये गोदाकाठी आणि गंगापूर रोडवर रावणदहनाचा कार्यक्रम विशेष लक्षवेधी असतो. मात्र गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम रद्द करावा लागला.पंचवटीत गौरी पटांगणावर दरवर्षी जयश्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय.. असा जयघोष, वानर सेना आणि रावण सैनिकांत होणारे युद्ध, फटाक्यांची आतषबाजी असा सोहळा सर्वांसाठीच लक्षवेधी असतो. दुर्गुणांसह दुष्प्रवृत्तींचा नाश होऊन सद्गुणांसह चांगल्या प्रवृतींना बळ मिळावे, शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रार्थना करत रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा दुसर्‍या वर्षी खंडीत झाली. चतु:संप्रदाय आखाड्यातर्फे हे आयोजन केले जाते.

- Advertisement -

चतु:संप्रदाय आखाडा येथून वाजतगाजत राम, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा करत पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे पुन्हा रामकुंड अशी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर रामकुंडावर वानरसेना आणि रावण सेनेत युद्ध होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चतु:संप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास, भक्तिचरणदास आदींच्या उपस्थितीत दहनाला सुरुवात होते. कोरोना निर्बंधांमुळे गरबा, दांडियासोबतच या कार्यक्रमाच्या आनंदापासून ही नागरिकांना वंचित राहावे लागले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -