घरमहाराष्ट्रअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आहार भत्ता; मंत्री नवाब मलिक यांची माहिती

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आहार भत्ता; मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Subscribe

महिना तीन ते साडेतीन हजार रुपये मिळणार

अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहात राहून उच्चशिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आहार भत्ता म्हणून महिन्याला तीन ते साडेतीन हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी दिली.

अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा आणि तालुकास्तरावरील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार रुपये देण्यात येतील, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे सन २०२१-२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, ज्यू आणि पारशी अशा अल्पसंख्याक समाजातील उच्चशिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह योजना राबविण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्रे असलेल्या शहरांमध्ये राहण्याची सुविधा झाली आहे. पण अनेक विद्यार्थ्यांना कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना भोजन आणि इतर खर्च करणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांना आहार भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नवाब मलिक म्हणाले.

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून ते आधार क्रमांक संलग्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याची शैक्षणिक संस्था, महाविद्यालयातील उपस्थिती समाधानकारक असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आहार भत्त्याची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. त्याची यादी संबंधित प्राचार्यास पाठविण्यात येईल, अशी माहिती मलिक यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -