घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकुत्रे, कोल्हे आणि डुक्कर...!

कुत्रे, कोल्हे आणि डुक्कर…!

Subscribe

आपल्यावर कोणी आरोप केले आणि ते गैरलागू असतील तर त्या व्यक्तीला किती यातना होतात, हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता कळून चुकलं असावं. नवाब मलिक यांनी केलेल्या एका आरोपानंतर फडणवीस इतके सैरभैर झाले, असे वैतागले की त्याला पारावार राहिला नाही. त्यांची पत्नी भडकलीच, पण स्वत: फडणवीस यांनी नवाब मलिक यांना डुकराची उपमा दिली. याआधीही भाजपच्या नेत्यांनी विरोधकांपैकी अनेकांचा बाप काढला. आपल्या विरोधकांना बैल आणि गेंड्याची उपमा देणं ही भाजप नेत्यांची खासीयत आहे. आपण आरोप करतो तेव्हा आपल्यावर आरोप होतील, इतकी राजकीय प्रगल्भता राजकीय नेत्यांमध्ये असावी. त्यालाच खिलाडू वृत्ती म्हणतात. ती भाजप नेत्यांकडे नाही, हे देवेंद्र यांनी दाखवून दिलं. इतर नेते तर बुध्दीने आणि एकूणच कुवतीने बालबोध असल्याने त्यांना आपल्यावर झालेली टीका आणि आरोप अजिबात सहन होत नाहीत. मग ते शरद पवारांना लुटारू आणि उध्दव ठाकरेंना बाजारू म्हणायला कमी करत नाहीत. राज्यातल्या राजकारणाची पत या मंडळींनी इतकी खाली आणलीय की, विचारून सोय नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वभावाने फटकळ होते. ते रागात शरद पवारांनाही मैद्याचं पोतं म्हणायचे. पण पवारांनी त्यांना कधी उलटून उत्तर केलं नाही. पवारांना तसं बोलता येत नाही, असं नाही. प्रतिवाद टाळणं मोठेपणाचं लक्षण आहे.

हे सांगायची वेळ यायचं कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप होय. नवाब मलिक यांनी नार्कोटिक ब्युरो कंट्रोलचे पश्चिम विभाग प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपने यात घेतलेल्या उडीने निर्माण झालेली गोची त्या पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना सतावते आहे. नवाब यांनी केलेल्या आरोपांना विविध प्रकारच्या पुराव्यांचा आधार होता. वानखेडे यांच्या कार्यालयात भाजपशी संबंधित खासगी व्यक्तींचा वाढता राबता, त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांशी असलेले संबंध, यातून त्यांना वाचवण्याची राज्यातल्या नेत्यांची धडपड, आर्यन याला जाणीवपूर्वक अडकवणं, यासाठी १८ कोटींच्या खंडणीची मागणी, किरण गोसावी याच्याशी असलेली सलगी हे सगळे प्रकार खुलेआम सुरू असताना भाजप वानखेडेंना पाठीशी घालत असल्याचं जगाने पाहिलं. वानखेडेंचं खरं रूप जनतेच्याही लक्षात येऊ लागलं तरी फडणवीसांसारखे नेते त्यांचीच री ओढत स्वत:ला अडचणीत टाकत होते. यामुळे नवाब यांच्या आरोपाचं केंद्र वानखेडेंकडून भाजप नेत्यांकडे येत होतं, हेही त्या पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घेतलं नाही. यात मग फडणवीस आलेच.

- Advertisement -

अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय माफियाकडून त्यांच्या पत्नीसाठी आयोजलेला शो असो की ललितमधील बैठका असोत. आरोप होणं स्वाभाविक होतं. आरोप झाल्यावर त्यांना तोंड देणं हा कर्तव्याचा भाग झाला. कर नाही त्याला डर असण्याचं कारण फडणवीस यांनाही कळलं नाही. त्या कर्तव्याला फडणवीसांनी गंभीरपणे घेतलं असतं तर अडचण वाढली नसती. नवाब यांच्या आरोपात तथ्य नाहीत, असं म्हणणं ठिक. पण प्रत्यक्षात हकिकत पाहिली तर आरोपात तथ्य नाही, असं म्हणता येत नाही. यामुळेच पांढर्‍या शुभ्र वस्त्रातील ही मूर्ती अपेक्षित इतकी प्रामाणिक नव्हती, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. याही परिस्थितीत मलिक यांचे आरोप खोट्या माहितीवर आधारीत असतील, तर त्यांना विविध ठिकाणी जाब विचारता येऊ शकतो. ते करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना डुक्कर संबोधलं. एका आरोपाने फडणवीस इतके घायाळ झाले असतील तर ओढून ताणून बोलणार्‍या किरीट सोमय्या, वात्रटिकांचे बादशाह चंद्रकांत पाटील, वायफळ कोट्या करणारे भातखळकर, उद्दामपणे मुख्यमंत्र्यांचा बाप काढणारे आशिष शेलार आणि पराकोटीच्या द्वेषाने पेटलेले नारायण राणे तसंच त्यांचे दोन पुत्र आरोप करतात त्यांचं काय करायचं? हे नेते तर शेलक्या भाजपतलं शब्दांचं भांडार होय. भाजपच्या या टीकाकारांवर फडणवीसांइतकी खालची टीका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही केल्याचं आठवत नाही. आज नवाब मलिकांना डुक्कर संबोधणार्‍या फडणवीसांनी याचा आधी विचार करायला हवा होता. अश्लाघ्य आरोप आणि टीका करणार्‍या आपल्या ज्युनियर नेत्यांना त्यांनी आवरायला हवं होतं. किरीट सोमय्यांसारख्या नेत्यांना तर जगात आपणच जणू अर्थतज्ज्ञ आहोत, असं वाटावं. केंद्रीय संस्थांचे आपणच जणू प्रवक्ते, असा तोरा फडणवीसांनी कधी आवरला नाही. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबी या संस्थांचा गैरफायदा घेत विरोधकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. तेव्हाही फडणवीस मजा पहात होते. इतकंच नव्हे, कर नाही तर डर कशाला? असा ठरलेला डायलॉग ते पुढे करत. अनिल देशमुख यांच्या घरावर पाचवेळा छापे टाकले जात असताना हे नेते इतके आनंदी होते की त्यांची तुलना करता येत नाही. हीच स्थिती दिल्लीत पी. चिदंबरम यांना अटक करताना सीबीआय अधिकार्‍यांनी केलेल्या आततायीपणाची होती. तिथेही भाजपचे नेते वायफळ चर्चा करताना देश पाहत होता. पण त्याचा उलटा परिणाम भाजपच्या प्रतिमेवर पडत आहे, हे त्या पक्षाचे नेते लक्षात घेत नाहीत. त्यामुळे पक्षाते नुकसान होत असते.

नवाब मलिक यांना डुकराची उपमा देण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांचं काय ते फडणवीसांनी सांगितलं पाहिजे होतं. आपला तो बाब्या आणि दुसर्‍यांचं ते कार्टं असं कसं चालेल? ठकास महाठक सापडतोच. हा नियतीचा नियम आहे. सदासर्वकाळ आपल्याच वाट्याला श्रेष्ठत्व येतं असं नाही. आज मलिक हे भाजप नेत्यांना आव्हान बनले आहेत. याला कारण भाजपचे हेच नेते होत. काहीच करता येत नाही, असं लक्षात आल्यावर वक्फबोर्डाला टार्गेट करण्यात आलं, या कारवाईचे मार्गदर्शक कोण हे कोणाला ठावूक नाही, असं थोडंच आहे? मलिकांनी केलेले आरोप तर फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असतानाचे आहेत. तेव्हाच त्यांनी ही प्रकरणं धुंडाळली असती आणि प्रामाणिकपणे कारवाई केली असती तर मलिकांच्या आरोपांना आज उत्तरं देणं सोपं झालं असतं. सत्तेची गणितं यामागे लपली आहेत, हे सांगायची आवश्यकता नाही. आपण करतो, हे जर योग्य असेल, तर राज्य सरकार आता नव्याने समृध्दी महामार्गातील घोटाळ्याची, वीज मंडळातील गैरलागू निर्णयाची, जलयुक्त शिवार या प्रकरणांची चौकशी करणार असेल तर त्यात गैर काय? कर नाही तर डर कशाला, असं कोणी विचारलं तर फडणवीसांकडे काय उत्तर असेल? सत्तेवरून उतरणार्‍यांनी स्वत:ला काचेच्या घराचा इमला समजू नये. आज जे फडणवीस आणि त्यांचे नेते समजताहेत. हे जसं महाविकास आघाडीने करू नये, असं फडणवीसांना वाटत असेल तर गैर नाही. पण आपले नेते हाच उद्दामपणा करतात तेव्हा त्यांचं तोंड आणि हात कोण धरणार? फडणवीसांनी आपल्या या हौशी कलाकारांना रोखलं नाही तर समोरूनही प्रकरणं बाहेर येणं, ही आता काळ्या दगडावरील रेघ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -