घरमहाराष्ट्रदुष्काळ सदृश्य नाही, तर दुष्काळ जाहीर करा - अशोक चव्हाण

दुष्काळ सदृश्य नाही, तर दुष्काळ जाहीर करा – अशोक चव्हाण

Subscribe

सरकारने राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. मात्र राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता थेट दुष्काळच जाहीर करा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यावर्षी कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. खरीपाची पिके वाया गेली असून रब्बीची पेरणीही झालेली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, जनावरांना चारा नाही, अशा अनेक अडचणी राज्यासमोर आहेत. त्यामुळे सरकारने राज्यात दुष्काळसदृश्य नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करूनही राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, अशी घणाघाती टीकाही चव्हाण यांनी केली.

उद्यापासून दुष्काळ दौऱ्याला सुरुवात

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने नाकर्त्या सरकारविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा आणि मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात उद्यापासून (बुधवार दि. २४ ऑक्टोबर) होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा आशिर्वाद घेऊन तुळजापूर येथून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत पण सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे या दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून काँग्रेस नेते मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

जनतेच्या हक्कांसाठीच जनसंघर्ष

भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्यांक, महिला, विद्यार्थी, तरूण असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लीम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती करून भाजप शिवसेना सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी हा जनसंघर्षाचा तिसरा टप्पा आहे असे चव्हाण म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -