घरठाणेखासगी रुग्णालयांनी गंभीर रुग्णांनाच दाखल करा

खासगी रुग्णालयांनी गंभीर रुग्णांनाच दाखल करा

Subscribe

ठाणे महापालिकेचे आदेश

 ओमिक्रॉन व कोविड १९ च्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व खासगी रुग्णालयांनी सौम्य, अतिसौम्य, लक्षणे नसलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल न करता त्यांना आवश्यक ती औषधे देवून गृह अलगीकरणासाठी घरीच पाठविण्याचे आदेश ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहेत. दरम्यान वाढत्या रुग्ण संख्येच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचे आदेशही सर्व खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
शहरातील खासगी रुग्णालयांनी कोविड १९ च्या अनुषंगाने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य, अतिसौम्य आणि लक्षणे नसल्यास त्यांच्या शरीराचे तापमान आणि पल्स ऑक्सिमीटरव्दारे ऑक्सिजन पातळीची तपासणी करावी. रुग्णास ताप नसल्यास आणि रुग्णाची ऑक्सिजन पातळी योग्य असल्यास रुग्णाला ३ ते ४ दिवसाच्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल न ठेवता गृह अलगीकरणासाठी आवश्यक त्या औषध उपचारासहित डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खासगी रुग्णालयांनी डिस्चार्ज देताना रुग्णांनी पुढील ७ दिवस गृह अलगीकरण करणे आवश्यक असून त्याबाबतच्या सूचना रुग्णांना द्याव्यात. ठाणे महानगरपालिच्यावतीने खासगी रुग्णालयांची याबाबतची तपासणी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत हॉस्पिटलची केव्हाही तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी पथकामार्फत रुग्णस्थिती पडताळून पाहण्यात येणार असून अति सौम्य लक्षणे असणारे रुग्ण ३ ते ४ दिवसाच्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचे आढळुन आल्यास हॉस्पिटलवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या विचारात घेता गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांनाच प्रवेश देण्याचे आदेश महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -