घरफिचर्ससारांशमकर संक्रांतीचा मधुर महोत्सव !

मकर संक्रांतीचा मधुर महोत्सव !

Subscribe

हिंदू धर्मात मकर संक्रातीला विशेष महत्व आहे. सर्वसाधारणपणे अपवाद वगळता दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होते. ह्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धाकडे सुरू होतो. ज्योतिष अभ्यासकांच्या मतानुसार याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणूनच त्याला मकर संक्रमण म्हटले जाते. बहुतांश हिंदू सणांची गणना चंद्र भ्रमणाच्या अनुषंगाने केली जाते. मात्र मकर संक्रांतीचे पर्व सूर्यभ्रमणानुसार पंचांगाच्या गणनेने साजरे केले जाते. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीच शरद ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. परिणामी दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते.

आपल्या उत्सवप्रिय देशात प्रत्येक सणाची एक खासियत असल्याचं आपल्याला प्रकर्षाने जाणवते. किंबहुना, आपल्या पूर्वसूरींनी प्रत्येक सण-उत्सवाची रचना करताना अतिशय अभ्यासपूर्ण केलेली आहे. प्रत्येक सणाचं स्वरूप आणि त्यांचे वैशिष्ठ्य वेगळे, त्याचे रीतिरिवाज, परंपरादेखील स्थल-काल-प्रांत परत्वे वेगवेगळे असल्याचं दिसून येत. त्यामुळे कोणत्याही सणाचं नाव जरी घेतलं तरी त्याच्याशी निगडित गोष्टी पटकन आपल्या डोळ्यांसमोर येतात. अगदी उदाहरण द्यायचे तर, दिवाळी हा शब्दोच्चार केला तरी डोळ्यासमोर झटकन चिवडा, फराळ, दिवे, आकाश कंदील, फटाके, असं सगळं चित्र उभं राहतं. तसंच मकर संक्रांत म्हणताच तिळाचे लाडू-चिक्की, तीळगूळ, गव्हाची खिचडी, तीळ घातलेल्या भाकरीचा स्वाद जिभेवर तरळू लागतो. यासोबतच आकाशाला गवसणी घालणारे रंगीबेरंगी पतंगही डोळ्यांसमोर तरंगू लागतात.

तसेच प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचंही प्रकर्षाने जाणवते. या परंपरा सुरू झाल्या त्यामागेदेखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, गणेशचतुर्थी, नवरात्र, या सण-उत्सवांच्या परंपरेमधील आणखीन एक महत्वाचा सण तो म्हणजे मकर संक्रांत…!!

- Advertisement -

हिंदू धर्मात मकर संक्रातीला विशेष महत्व आहे. सर्वसाधारणपणे अपवाद वगळता दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होते. ह्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजेच सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धाकडे सुरू होतो. ज्योतिष अभ्यासकांच्या मतानुसार याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणूनच त्याला मकर संक्रमण म्हटले जाते. बहुतांश हिंदू सणांची गणना चंद्र भ्रमणाच्या अनुषंगाने केली जाते. मात्र मकर संक्रांतीचे पर्व सूर्यभ्रमणानुसार पंचांगाच्या गणनेने साजरे केले जाते. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीच शरद ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. परिणामी दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जाते.

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व
मकर संक्रांतीला सूर्याचे राशी परिवर्तन होत असल्याने धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ठ्या या दिवसाचे विशेष महत्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या घरी जातात, शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे संक्रांतीच्या पर्वाचा सबंध पिता-पुत्राच्या भेटीशी जोडलेला आहे. आणखी एका पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांना मंदार पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयाच्या आनंद स्वरूप मकर संक्रातीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. ज्योतिषशास्त्रात उत्तरायण हा शुभ काळ मानला जातो. भगवान श्रीकृष्णानेही उत्तरायणाचा महिमा श्रीमद्भगवद्गीतेत सांगितला आहे. यामुळेच महाभारत काळात गंगापुत्र भीष्म यांनी सहा महिने बाणांच्या शय्येवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली होती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी प्राणत्याग केला होता.

- Advertisement -

पीक काढण्याचा सण
नवीन पीक आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळेही मकर संक्रात साजरी केली जाते. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार आणि तामिळनाडू आदी राज्यात हा काळ पीक काढण्याचा असतो. म्हणून समस्त शेतकरीवर्ग निसर्ग आणि परमेश्वराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मकर संक्रांत साजरी करीत असतात. मळ्यातून खळ्यात आलेले गहू आणि इतर धान्याच्या राशी हे शेतकर्‍यांच्या मेहनतीचे फळ असले तरी हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादानेच मिळत असल्याची भावना शेतकर्‍यांच्या मनात असते. त्यामुळेच सृष्टी आणि ईश्वराच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच मकर संक्रांत साजरी केली जाते. विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात प्रांत परत्वे सण-उत्सवांच्या पद्धतीमध्ये बदल असला तरी प्रत्येक सण-उत्सव साजरा करण्यामागची भावना मात्र सारखीच असते,म्हणूनच भारतात विविधतेतून एकतेचे सूत्र साधण्याचे काम सर्व सण-उत्सवांनी केले आहे. मकर संक्रांतीच्या सणातूनही ही विविधता दिसून येते, कारण हा सण, विविध राज्यात, लोहडी, पोंगल, मकरसंक्रांत, उत्तरायण,भोगी, भोगाली बिहू या नावाने साजरा केला जातो.

मकर संक्राती
हिंदू सण उत्सवांच्या परंपरांमध्ये गोड पदार्थ किंवा पक्वांन्नांशिवाय त्या सण-उत्सवाला पूर्णता येत नाही.मकर संक्रांतदखील त्याला अपवाद नाही. तीळ आणि गुळाचे लाडू आणि पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे. तीळ गुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला उब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते. म्हणूनच या दिवशी तीळगुळाचा लाडू देऊन तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते. यामागेदेखील परस्परांमधील कटुता दूर व्हावी आणि स्नेहभाव व सकारात्मकता वाढीस लागावी ही भावना असते. याशिवाय नवीन कामाची, व्यवसायाची सुरूवातही या शुभ सणापासून करतात. असे म्हटले जाते की, गोड खाल्ल्याने वाणीमध्ये गोडवा आणि व्यवहारात मधुरता येते आणि आयुष्यात आनंदाचा संचार होतो. म्हणूनच मकर संक्रांतीचे महत्व अनन्यसाधारण आहे.

तीळ गूळ व्यतिरिक्त मकर संक्रातीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसोबतच देशाच्या अनेक भागात मकर संक्रातीला पतंग उडविले जातात. अलीकडच्या काळात तर पतंगोत्सव आणि पतंग उडविण्याच्या स्पर्धादेखील घेतल्या जातात. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये देश-विदेशातील लोक उत्साहाने सहभागी होत असतात. या काळात तीन दिवस आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवले जातात तर रात्रीच्या वेळी दिवे सोडले जातात.
या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात. सुवासिनीला आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेटवस्तू देतात. त्याला संक्रांतीचे वाण असे म्हटले जाते. संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथ सप्तमीपर्यंत केला जातो.

पोंगल
पोंगल दक्षिण भारतात विशेष करून तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जाणारा एक महत्वपूर्ण सण आहे. विशेष करून पोंगल हा सण शेतकर्‍यांचा सण म्हणून ओळखला जातो. शेतातील पीक कापणी झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी पोंगलचा सण साजरा करतात. ‘तइ’ या तामिळ महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे जानेवारीच्या मध्यात तीन दिवस चालणारा हा सण सूर्य आणि इंद्र देवाला समर्पित आहे. पोंगलच्या मध्यात लोक चांगला पाऊस, उत्तम जमीन आणि उत्तम धन धान्य यासाठी परमेश्वराप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्याचे आभार मानतात आणि परमेश्वराची कृपादृष्टी सदैव रहावी यासाठी प्रार्थना करतात. पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी कचरा जाळला जातो. दुसर्‍या दिवशी लक्ष्मी पूजन होते आणि तिसर्‍या दिवशी पशूधानाचे पूजन करण्याची परंपरा आहे.

उत्तरायण
गुजरातमध्ये या पर्वाला उत्तरायण संबोधले जाते. नवीन पीक आणि ऋतूच्या स्वागतासाठी हे पर्व 14 व 15 जानेवारीला साजरे केले जाते. यावेळी पतंग उडवले जातात. सोबतच पतंग महोत्सवाचेही आयोजन केले जाते. इथला पतंग महोत्सव जगभरात प्रसिद्ध असून जगाच्या कानाकोपर्‍यातून लोक येथील पतंग महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. या काळात संपुर्ण आसमंत,विविध आकार-प्रकारांच्या रंगी-बेरंगी पतंगांनी व्यापून गेलेले असते.उत्तरायण पर्वावर उपवास करतात तसेच घराघरातून तीळ व शेंगदाण्याची चिक्की बनवली जाते.

लोहरी
सुगीच्या काळातील हाती येणार्‍या शेतातील पिकाचा आनंद साजरा करण्यासाठी पंजाबात लोहरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पंजाबमध्ये मेळावा लागतो, यात लोक नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त करतात. नदी व सरोवरामध्ये आंघोळीनंतर मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये देवदर्शन केले जाते. सूर्याची पूजा आणि स्तुती या उत्सवात केली जाते. अकबराच्या काळात हिंदू युवतींना पळवून नेले जात असे. त्या मुलींचे रक्षण करणारा दुल्ला भट्टी पंजाबात विशेष प्रसिद्ध आहे. त्याने वाचविलेल्या सुंदरी आणि मुन्दरी या दोन युवती पंजाबी लोककथांमधे अजरामर झाल्या आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले लोकगीते म्हणतात आणि त्यात याच्या नावाचा उल्लेख येतो.

भोगली बिहू
आसाममध्ये माघ महिन्याच्या संक्रांतीच्या पहिल्या दिवशी माघ बिहू म्हणजे भोगाली बिहू पर्व साजरे केले जाते. वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी हा माघ महिना असल्यामुळे याला माघ बिहू म्हणूनही ओळखले जाते. यात बिहूचे तीन प्रकार आहेत: भोगली बिहू (माघ बिहू), काटी बिहू आणि रोंगाली बिहू हे आठवडाभर साजरे करतात. या दरम्यान विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. या व्यतिरिक्त या दिवशी लोक बांबू आणि खराची घर (झोपडी) तयार करतात, ज्याला मेजी किंवा भेळघर म्हणतात. रात्रीच्यावेळी नागरिक आगीभोवती जमतात आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात, ज्याला ‘उरुका’ असे म्हणतात.

सणांमध्ये टेकली भोगा म्हणजेच भांडे फोडणे यांसारख्या पारंपरिक आसामी खेळांचाही समावेश होतो. पूर्वी हा सण संपूर्ण माघ महिनाभर साजरा केला जात असे, म्हणून याला माघ बिहू म्हणून ओळखले जात असे.

आसाममध्ये तीळ, तांदूळ, नारळ आणि ऊस मोठ्या प्रमाणात पिकतो. त्यामुळे भोगाली बिहूच्या वेळी खान-पान उत्साहात असते. विविध प्रकारचे पदार्थ आणि पक्वान्ने बनवली जातात. पंजाबच्या लाहोरीप्रमाणेच आसामात भोगली बिहूच्या वेळी होलिका दहन केले जाते. यावेळी तीळ व नारळाने बनवलेले पदार्थ अग्नी देवतेला अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हशींच्या झुंजीही लावल्या जातात.

तीर्थ दर्शन, यात्रा, मेळावे
मकर संक्रांतीच्या प्रसंगी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी विशेषतः तीर्थस्थानी जत्रा किंवा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या ठिकाणी लाखो श्रद्धाळू गंगा आणि अन्य पावन नदीच्या तीरावर स्नान आणि दान, धर्म करतात.

उत्तरायण म्हणजे काय ?
सूर्याचा प्रवास उत्तरायण आणि दक्षिणायन असा होत असतो. जेव्हा सूर्य उत्तर दिशेला मकर राशीतून मिथुन राशीत जातो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. उत्तरायणात दिवस मोठा आणि रात्र लहान असते. याशिवाय सूर्य कर्क राशीतून धनू राशीत दक्षिण दिशेला जातो तेव्हा त्याला दक्षिणायन म्हणतात. दक्षिणायनात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्हींचा कालावधी प्रत्येकी सहा महिन्यांचा असतो.

उत्तरायणाचे महत्व
शास्त्रात उत्तरायण हा प्रकाशाचा आणि देवतांचा काळ मानला जातो. यावेळी देवतांची शक्ती खूप वाढते अशी मान्यता आहे. गीतेमध्ये उत्तरायणाचे महत्व सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, जो माणूस उत्तरायणाच्या वेळी शुक्ल पक्षाच्या काळात आपला प्राण त्यागतो, त्याला मुक्ती मिळते व जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून त्याला मोक्ष प्राप्त होतो, असेही म्हणतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -