घरदेश-विदेशRepublic Day 2022 : प्रजासत्ताकदिनी राजपथावर यंदा भारतीय टपाल विभागाच्या चित्ररथाचे घडणार...

Republic Day 2022 : प्रजासत्ताकदिनी राजपथावर यंदा भारतीय टपाल विभागाच्या चित्ररथाचे घडणार दर्शन

Subscribe

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध मंत्रालये आणि विभाग नाविन्यपूर्ण संकल्पनांसह आपापले चित्ररथ सादर करत असतात. या वर्षी भारतीय टपाल विभागाने देखील अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगीबेरंगी चित्ररथाची रचना केली आहे. यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा भारतीय टपाल विभागाचा चित्ररथाचे दर्शन आपल्याला घडणार आहे.  भारतीय टपाल विभाग गेली 167 वर्षे देशाची सेवा करीत आहे. या विभागाची समर्पण वृत्ती आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात टपाल सेवा, आर्थिक आणि सरकारी सुविधा पोहोचविण्यासाठी असलेली अंतर्भूत प्रेरणा सदैव देशाच्या प्रगतीत योगदान देत राहिली आहेत. संपूर्ण देश यावर्षी स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारतीय टपाल विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथातून विभागात कार्यरत तसेच टपाल कार्यालयांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाप्रती कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.

भारतीय टपाल विभाग : महिला सशक्तीकरणाच्या निश्चयाची 75 वर्षे” ही टपाल विभागाच्या या वर्षीच्या चित्ररथाच्या देखाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. चित्ररथाच्या समोरच्या भागात, भारतीय पोस्ट पेमेंट बँक तसेच टपाल खात्यातील बचत खात्यांच्या 50% खातेदार महिला आहेत यातून महिलांचे आर्थिक समावेशन  अधोरेखित करताना आणि आदर्श महिला कर्मचारी नियोक्ता विभाग म्हणून भारतीय टपाल विभाग प्रसिद्ध आहे. त्यासह भारतीय टपाल विभागाचा आधुनिक चेहेरा आणि सशक्त संपर्क सेवा ठळकपणे दाखविण्यासाठी या चित्ररथात “संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित कार्यालये” दर्शविण्यात आली आहे.

- Advertisement -

या चित्ररथावर, तंत्रज्ञान आणि परंपरा यांचे उत्तम मिश्रण असलेल्या टपाल विभागाच्या कार्याची कल्पना येण्यासाठी आणि विभागाचा आधुनिक चेहेरा दर्शविण्यासाठी, एका हातात डिजिटल साधन आणि दुसऱ्या हातात पोस्टमनची पारंपरिक पिशवी घेतलेली पोस्टवूमन दर्शविण्यात आली आहे. तिच्या बाजूला, भारतीय जनतेची टपाल विभागावरील अढळ श्रद्धा दर्शविणारी, सर्वत्र आढळणारी उंच, लाल टपाल पेटी उभी आहे. टपाल विभागाच्या कार्यात दशकानुदशके जी स्थित्यंतरे आली आहेत तिचा अंदाज येण्यासाठी पोस्टवूमनच्या शेजारी पोस्टमनचे प्राथमिक रूप असलेला पूर्वीच्या काळातील डाकिया अथवा हरकारा उभारण्यात आला आहे. काही काळापूर्वी संपलेल्या “पंतप्रधानांना 75 लाख पोस्टकार्डे अभियाना”ची देखील प्रतिमा येथे आहे.

- Advertisement -

या चित्ररथावर हजारो ग्राहकांचा विश्वास असलेल्या स्पीड पोस्ट, ई-वाणिज्य, एटीएम कार्ड्स यांसारख्या सेवा उभारण्यात आल्या आहेत तसेच समाजाप्रती बांधीलकी जपणारी दिव्यांग-स्नेही रँप सुविधेने सुसज्जित असलेली टपाल कार्यालये दर्शविण्यात आली आहेत.

चित्ररथाच्या मागच्या भागात, पंतप्रधानांच्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ‘सुकन्या समृद्धी योजने’वर भर देणाऱ्या श्रीनगर येथील तरंगत्या टपाल कार्यालयाचा नमुना देखील ठेवण्यात आला आहे.

लिंगसमानतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आणि त्यासाठीचा टपाल विभागाचा निश्चय दर्शविणारी “संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित कार्यालये” देखील या चित्ररथात उभारण्यात आली आहेत. टपाल कार्यालयाच्या त्रिमितीय टेबलांवर आपण ग्राहकांची आधार जोडणी, पोस्टल एटीएम सुविधा अशा सेवा देणाऱ्या टपाल विभागाच्या महिला अधिकाऱ्यांना बघितल्यावर टपाल विभागाच्या महिला सशक्तीकरणाप्रती असलेल्या निश्चयाची जाणीव होते. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचा विचार केला तर या बँकेच्या सुमारे 50% ग्राहक (2.24 कोटी) महिला आहेत आणि यातील 98% खाती महिलांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत.

भारतीय टपाल विभागाच्या अभिमानास्पद प्रवासाची साक्षीदार असलेली आणि भारताच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमारतींपैकी एक असलेली सर्वात जुनी, कोलकाता जीपीओ कार्यालयाची इमारतदेखील या चित्ररथात दिमाखाने उभी करण्यात आली आहे. चित्ररथाच्या खालच्या भागात, खादीच्या कापडावर छापलेल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित स्टँप्सचा कोलाज लावण्यात आला असून तो प्रजासत्ताक दिनानंतर विविध टपाल कार्यालयांमध्ये लावण्यात येईल.

या चित्ररथाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे रथाच्या खालील भागात खऱ्या पोस्टमन आणि पोस्ट वुमनच्या उंचीचे पुतळे बसविण्यात आले आहेत. भारतीय टपाल विभागामध्ये फार पूर्वीच्या काळी असलेले हरकारे, त्यानंतर सायकलवरून घरोघरी जाणारे पोस्टमन आणि आता ई-बाईकवरून फिरणारे आधुनिक पोस्टमन अश्या टपाल विभागाच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून हे पुतळे बसविण्यात आले आहेत.

भारतीय टपाल विभागाच्या या चित्ररथाची मध्यवर्ती संकल्पना आणि आरेखन टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून या कार्यात मुंबई विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी सर्जनशील सूचनांचे योगदान दिले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांची निवड कशी होते?

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात भाग घेणाऱ्या चित्ररथांच्या निवडीसाठी सुस्थापित प्रणाली विकसित केलेली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आणि केंद्र सरकारची मंत्रालये आणि विभाग यांच्याकडून संरक्षण मंत्रालय चित्ररथाचे प्रस्ताव मागविते.

त्यानंतर, कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, नृत्य दिग्दर्शन, इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींच्या समितीच्या अनेक बैठकांमध्ये चित्ररथांच्या प्रस्तावांचे मूल्यमापन करण्यात येते. ही तज्ञ समिती, तिच्या शिफारसी सादर करण्यापूर्वी, रथांच्या मध्यवर्ती कल्पना, संकल्पना, आरेखन आणि दृश्य परिणामांच्या आधारावर प्रस्तावांची तपासणी करते. संपूर्ण संचालनाच्या कार्यक्रमाला असणारी कालमर्यादा लक्षात घेऊन केवळ काही मर्यादित संख्येतील चित्ररथ संचालनातील सहभागासाठी निवडले जातात. त्यापैकी तीन सर्वोत्कृष्ट चित्ररथांना चषक देऊन गौरविण्यात येते.


Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज ! काय आहे वैशिष्ट्ये ?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -