घरताज्या घडामोडीज्येष्ठ साहित्यिक डॉ अनिल अवचट यांचे निधन, दुपारी २ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ साहित्यिक डॉ अनिल अवचट यांचे निधन, दुपारी २ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार

Subscribe

जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिल अवचट यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. साहित्य विश्वात योगदानासाठी त्यांची मोठी ओळख आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी पुण्याकी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अतिशय संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्तीचे लेखक म्हणून त्यांना ओळखले जायचे. साहित्य विश्वातच नव्हे तर समाजातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ अनिल अवचट यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

अनिल अवचट यांनी दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला. आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कार केले जातील.

- Advertisement -

अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी सामाजिक जीवनात योगदान दिले.

साहित्यिक म्हणून योगदान 

अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं. 1969 साली त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झालं. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

- Advertisement -

पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली, त्यांच्या लेखणीतून, पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले. शिल्पकला, चित्रकला, फोटोग्राफी आणि मुख्य म्हणजे ओरिगामीतून विविध आकार साकारणं हा त्यांचा आवडता छंद! केवळ स्वत:चा विचार न करता दुसऱ्यांसाठी सतत काही ना काही करत राहणारा परोपकारी असा त्यांचा स्वभाव आहे.

मुक्तांगण संस्थेतून सामाजिक कार्य 

आपल्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून व्यसनमुक्तीसाठी त्यांची मुक्तांगण ही संस्था कार्यरत होती. डॉ. अनिल अवचट यांचं लिखाण प्रभावी आहेच, मात्र त्यांचं समाजकार्यही तितकंच उल्लेखनीय आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही तकनिक वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.

 

महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी – अजित पवार

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतीशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असं बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, ‘मुक्तांगण’ परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -