घरफिचर्सलोकनाथाची कसोटी ...

लोकनाथाची कसोटी …

Subscribe

एकनाथ शिंदे यांची खरंच ताकद आहे का आणि असली तर ती कशात आहे ? त्यांच्या प्रचंड कामात, त्यांच्या अंगच्या अचंबित करणार्‍या संयमात, कार्यकर्त्यांच्या जाळ्यात, विधीमंडळ की पक्ष यातल्या कसरतीत, जिल्ह्यातील अर्थकारणात, सर्वपक्षीय आमदारांच्या मैत्रीत, माध्यमांकडून मिळत असलेल्या स्नेहात की प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर असलेल्या ताळमेळात, की घाटावर जन्म झाला त्या रांगड्या मातीतल्या गंधात, की वाट्याला आलेल्या गरिबीच्या संघर्षात की राजकीय सारीपाटावरील वाट्टेल तो जुगार खेळण्याची तयारी असणार्‍या कलेज्यात...की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधाची तिर्थरुप नानासाहेब आणि आप्पासाहेब यांनी बैठकीत दिलेल्या शिकवणीत ! एकनाथ शिंदे यांची ताकद नेमकी कशात आहे ? हा खरं तर बर्‍याच जणांसाठी एक उत्सुकतेचा प्रश्न आहे. त्यांच्या निरिक्षकांसाठी ती उत्सुकता इतक्या करताच आहे की एकेकाळी वागळे इस्टेट मधल्या सी फूड कोल्ड स्टोरेजच्या कंपनीच्या टेम्पोवर चालक असलेल्या एकनाथ शिंदे या तरुण मुलामध्ये हे बळ नेमकं आलं कुठून ?

सत्तेची पदं, मदत करणारी माणसं, कार्यकर्ते, पैसा, किर्ती हे सगळं नेमकं कोणत्या गुणांच्या जोरावर मिळालं ? पण मला तर एकनाथ शिंदे या नेत्याची आजची स्थिती आंधळा आणि हत्ती यांच्या गोष्टीसारखी वाटते. आंधळ्याने शेपटीला हात लावला तर हत्ती जाड दोरीसारखा वाटावा. हत्तीच्या पायांना हात लावल्यावर तोच हत्ती उंच गोल स्तंभासारखा वाटावा, कानाला हात लावल्यास मोठ्या सुपासारखा हत्ती वाटावा, शिंदेंचा जो गुण आपल्याला भावतो तोच त्यांचे सामर्थ्य असल्याचं जाणवतं. आणि मग चर्चा होते ती यातलं काय महत्वाचं ? मला तर एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्त्व वरील सर्व गुणांचा मिलाप वाटतो.

कारण मर्यादित 50 किंवा 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुम्ही एकच वैशिष्ट्य घेऊन यशस्वी होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला सगळंच यावं लागतं. पण त्याहीपेक्षा तुमच्याकडे असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींचे भानही तुम्हाला ठेवावं लागतं, इथेच शिंदे बाजी मारतात. त्यांना आपल्या मर्यादा ठाऊक आहेत. म्हणूनच ते कोणत्याही गोष्टीसाठी इतरांपेक्षा आधी सुरुवात करतात, जेणेकरून ते काही पावलं का होईना, पुढेच असतात. मग ती निवडणुकीची तयारी असू द्या किंवा राज्यात आलेल्या एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाताना उचललेल्या उपाययोजनांची तयारी, कृती असू द्या, शिंदेंची सुरुवात इतरांपेक्षा आधी होते.

- Advertisement -

सहाजिकच मिळणारं यश इतरांच्या तुलनेत काकणभर सरस असतं. अलबत त्यामुळे पक्षातले आणि पक्षाबाहेरचे राजकीय प्रतिस्पर्धीही त्यांचा पाडाव करण्यासाठी टपून बसलेले असतात. मंगळवारी ठाण्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असलेले फलक लागले आणि पुन्हा एकदा शिंदे बातमीत आले. नेता मोठा होत असताना त्यांच्या अवतीभवती कार्यकर्त्यांचं मोहोळ जमत असतं, त्यातले काही निः स्वार्थी असतात तर काही संधीसाधू असतात. सध्या अशा संधीसाधू राजकारण्यांनी फक्त गाव-शहराचं किंवा राज्याचचं नव्हे तर देशाचं राजकारण व्यापून गेलेलं आहे. आणि त्यामुळेच खरा कोण आणि बोगस कोण, याची ओळख पटेपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो.

मग तसा निघून जाणारा वेळ कधी एखाद्या राजकीय पक्षासाठी असतो तर कधी सर्वसामान्य जनतेसाठी. ज्या होर्डिंगवर शिंदे यांचा ’भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख झाला ते होर्डिंग लावणार्‍या विजय यादव या तरुणाला पालिका निवडणुकीचं तिकीट हवंय. विजय यादवने निवडणुकीच्या तिकिटासाठी ’भावी मुख्यमंत्री’ असा घाट घाट घातला आणि शिंदे यांच्या विरोधकांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात संशयाचा एक नवा किडा सोडून दिला. विजय यादव यांनी केलेले उपद्वाप शिंदेंसाठी राजकीय दृष्ट्या त्रासदायक आहेतच. पण त्याच वेळेला इथे एका वेगळ्या प्रश्नाकडे मला लक्ष वेधायचे आहे, ते म्हणजे निवडणुकीचं तिकीट मिळण्यासाठी यादवचा प्रयत्न संधीसाधू किंवा लाळघोटेपणाच्या वर्गामध्ये जाणारा असू शकेल. तर मग स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या फ्रेममध्ये येण्यासाठी शिवसेनेतील काही नेते मंडळी सातत्याने या ना त्या कारणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती घुटमळत होती. त्यांना काय साधायचं होतं.

- Advertisement -

यादवला तर निवडणुकीच तिकीट हवंय पण ज्यांना उच्चभ्रूंच्या वस्तीतल्या एखाद्या सोसायटीचा पदाधिकारी होणंही निवडणुकीच्या माध्यमातून अशक्य आहे, अशांना शिवसेनेनं राज्यसभेच्या खासदारकी पर्यंत भरभरुन दिलेलं आहे. तरीही त्यांच्यातला स्वार्थ काही कमी होत नाही. मग असे स्वार्थी स्वरसम्राज्ञींच्या अंत्यसंस्कारापासून ते निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत सगळीकडेच आपल्याला वावरताना दिसत आहेत. प्रश्न फक्त इतकाच आहे की एकनाथ शिंदे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, यांच्यासारख्या नेत्यांनी असा वावर करणा-यांतल्या स्वार्थाचा पोत समजून घ्यायला हवा. वागळे इस्टेटच्या नाक्यावर लागलेला मुख्यमंत्री उल्लेखाचा होर्डिंग फोटो तत्परतेनं ठाण्यातल्या काही मंडळींनी ’मातोश्री’ वर पोस्ट केला. माध्यमांना फॉरवर्ड केला, यात मोठी तत्परता दाखवली. या मंडळींनी शिवसेनेसाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमागील उद्दीष्ट कोणती, हे पाहायला हवे. हे पाहण्याची व्यवस्था सध्या तरी वर्षा किंवा मातोश्रीमध्ये नाही. या गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या तळागाळात जाऊन काम करणार्‍या नेत्यांचे नुकसान होऊ शकते नव्हे तर ते किंबहुना होतच आहे.

ठाण्याने शिवसेनेला आणि ठाकरेंना भरभरून राजकीय यश दिलंय. सत्तेबरोबर संपत्तीही दिली पण त्याच ठाण्यातल्या राजकीय सहकार्‍यांकडे मातोश्रींने नेहमीच काळ्या काचांच्या चष्म्यांमधून बघणंच पसंत केलंय. मग ते स्व.आनंद दिघे असोत किंवा गणेश नाईक, सतीश प्रधान यांच्यासारखे ज्येष्ठ शिवसेनेचे सुभेदार असू द्या किंवा आता अख्खा ठाण्याचा गड एकहाती सांभाळणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे किल्लेदार असू द्या. ठाण्यात स्थानिक नेत्यांचे वाढदिवस असुद्यात किंवा अंत्यसंस्कार, निवडणुकीची रणधुमाळी असू द्या किंवा नेत्यांच्या निवासस्थानाचा मामला, इथे एका विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्याची रीत आहे. इथे कधीकाळी आपल्या दाढीवर हात फिरवत शून्य नजरेत जात स्व. आनंद दिघे आदेश देत असत. तर आता ती जबाबदारी त्याच पध्दतीने एकनाथ शिंदे पार पडतात.

सेनेत आदेशाशिवाय काहीच होत नाही. मग षण्मुखानंद मधल्या रामदास कदम यांच्या विरोधात दिल्या जाणार्‍या घोषणा असूद्यात किंवा पुण्यामध्ये किरीट सोमय्यांना केली गेलेली धक्का बुक्की आणि त्यानंतरचं पायर्‍यांवर ढकललं जाणं. सारं काही आदेश बरहुकूम चालतं, अशा पक्षात

फलकांवर कोणाचे फोटो लावायचे याचाही एक प्रोटोकॉल ठरवण्यात आलेला आहे. अशा पक्षात काही मंडळी राजकारणाशी संबंध नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या निरागस सुनबाईंचा फोटो होर्डिंगवर छापत असतील तर एक तर ते शिंदे यांना अभिप्रेत आहे का, असा प्रश्न आहे आणि जर तसे अभिप्रेत नसेल तर शिंदे यांच्या राजकीय अहितावर कोण उठलं आहे… हे देखील पाहायला हवं. स्वर्गीय आनंद दिघे यांना गृहीत धरण्याची कोणाची हिंमत नव्हती, याचं कारण त्यांना कोणालाही आढेहात घेताना सत्तापद निवडणुका यांचा ताळमेळ बांधावा लागत नव्हता. पण तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत लागू पडत नाही, कारण पक्षाबरोबरच निवडणुकांचे गणित हे देखील त्यांना जुळवायचं असतं. त्यातून अनेक मंडळींनी एकनाथ शिंदे यांना गृहीत धरण्याचा प्रयत्न गेल्या काही काळात केलेला आहे. त्यावर वेळीच मात्रा, उपाय करणं ही शिंदे यांच्या राजकीय दीर्घ वाटचालीसाठी ची सगळ्यात मोठी गरज आहे.

ठाण्यातल्या एका कार्यक्रमात माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी जाहीरपणे एकनाथ आता तुम्ही ’लोकनाथ’ व्हायला हवं असं म्हटलं होतं. शिंदेंची ’लोकनाथ’ होण्यासाठी क्षमता आणि त्याकरता गरजेच्या असलेल्या इतर गोष्टी मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते हा गौरव संपादित करू शकतात. सद्य स्थितीत राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरी पक्षाच्या नेतृत्वाबाबत स्थित्यंतर होताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाची धुरा कुठल्याही क्षणी सोपवली जाईल असं चित्र दिसतंय. त्याच आदित्य ठाकरे यांच्याशी जुळवून घेणं ही येणार्‍या काळातली शिंदे यांच्या समोरची एक आव्हानात्मक बाब असेल. त्यांना त्यासाठी वाढदिवशी शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -