घरAssembly Battle 2022Bhagwant Mann Oath यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; केजरीवालांची...

Bhagwant Mann Oath यांनी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; केजरीवालांची कार्यक्रमाला उपस्थिती

Subscribe

आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे आयोजित कार्यक्रमात पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भगवंत मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पंजाबचे सहप्रभारी राघव चढ्ढा हेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यानंतर भगवंत मान म्हणाले की, मी केजरीवाल यांचे विशेष आभार मानतो. ज्यांनी 20 -20 दिवस उपोषण केले, आंदोलने केली, एक पक्ष सुरु केला आणि ज्यामुळे संपूर्ण देशाचे राजकारण सुधारले. याचे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत केले पाहिजे.

- Advertisement -

भगवंत मान पुढे म्हणाले की, पंजाबच्या कानाकोपऱ्यातून लोक भगत सिंह यांचे गावी खटकर कलान येथे आले आहेत. या लोकांचे मी मनापासून आभार मानतो. दिल्लीचे मंत्रीमंडळ इथे आले आहे. सीएम केजरीवाल, डेप्युटी सीएम आले आहेत. पंजाबच्या आमदार इथे उपस्थित आहेत. ज्यांनी खूप चांगलाप्रकारे विजय मिळवला, मी सर्वांचे आभार मानतो. पूर्वी शपथविधी सोहळे स्टेडियम आणि इतर ठिकाणी व्हायचे. पण मला वाटले की, आपल्याला शहीदांची आठवण येते. त्यामुळे समारंभासाठी या गावाची निवड करण्यात आली.

मान  म्हणाले की, हे भगतसिंगांचे गाव आहे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी काम करत आहे. हे गाव माझ्यासाठी नवीन नाही. मी इथे अनेकदा आलो आहे. लोकांनी तुम्हाला साथ दिली. अनेक जन्म घ्यावे लागतील लोकांचे हे प्रेम उतरवण्यासाठी.

- Advertisement -

पंजाब निवडणुकीत ‘आप’ने जिंकल्या 92 जागा

पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दलाने तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.

भगवंत मान यांनी विनोदी कलाकार म्हणून केली करिअरला सुरुवात

कॉमेडियन म्हणून भगवंत मान यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यांनी 2008 मध्ये कपिल शर्मासोबत ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोमध्ये भाग घेतला. या शोमधून भगवंत मान यांना खूप प्रसिद्धी मिळाली. कॉमेडीसोबतच भगवंत यांना अभिनयातही खूप रस होता त्यामुळे ते चित्रपटात आले. ‘कचरी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 12 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

पंजाब पीपल्स पार्टीमधून झाली राजकीय कारकिर्दीची सुरुवात

प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे आणि तत्कालीन अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी मार्च २०११ मध्ये पंजाबमध्ये पीपल्स पार्टीची स्थापना केली तेव्हा भगवंत मान यांनीही राजकारणात उतरले आणि पीपीपीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक बनले. फेब्रुवारी २०१२ मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत भगवंत मान यांनी लेहरागागा मतदारसंघातून पीपीपी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.

भगवंत मान यांनी आम आदमी पक्षात केला प्रवेश

पीपल्स पार्टीला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही, त्यानंतर मनप्रीत सिंग बादल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे, भगवंत मान यांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी वेगळा मार्ग निवडला आणि 2014 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये (आप) प्रवेश केला.

सलग 2 लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये प्रचंड पाठिंबा मिळाला आणि पक्षाने भगवंत मान यांच्या जागेसह चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा चेहरा होते आणि ते संगरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भगवंत मान विजयी झाले.

भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’चा ऐतिहासिक विजय

आम आदमी पक्षाने यावेळी भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबमधील 117 पैकी 92 जागा जिंकल्या आणि दोन तृतीयांश बहुमत मिळवले.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -