घरपालघरवाहतूक व्यवस्था गोंधळलेली; पोलिसांचा आणखी १५ सिग्नलचा प्रस्ताव

वाहतूक व्यवस्था गोंधळलेली; पोलिसांचा आणखी १५ सिग्नलचा प्रस्ताव

Subscribe

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील गडबडलेली-गोंधळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी आणखी १५ सिग्नल व ५० ब्लिंकर्सची मागणी केली असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील गडबडलेली-गोंधळलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी आणखी १५ सिग्नल व ५० ब्लिंकर्सची मागणी केली असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रात २० ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र ही यंत्रणा योग्यप्रकारे कार्यान्वित होत नसल्याने बहुतांश सिग्नलवर गोंधळाची स्थिती असते, अशा तक्रारी वाहनचालक व नागरिकांच्या आहेत. वसई-विरार महापालिकेने २०१६ साली शहरातील रहदारी व वाहतूक नियंत्रणासाठी १६ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता. या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकामी ३ कोटी ११ लाख ५० हजार इतक्या रकमेचे अंदाजपत्रक बनवण्यात आले होते. मेसर्स सी. एम. एस कॉम्प्युटर लि. या कंपनीसोबत याकरताचा करारही करण्यात आला. अंदाजपत्रीय दरापेक्षा १३ टक्के कमी दर असलेली निविदा काढून २५ जुलै २०१६ साली याकरता स्थायी समितीत ठराव करण्यात आला.

महापालिकेने वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा बसवली असली तरी प्रत्यक्षात त्याचा शहराला काहीही उपयोग होत नाही. नियोजन व देखभाल होत नसल्याने शहरात वाहतूक विस्कटलेली आहे. महापालिका करत असलेला खर्च वाया जात आहे. वाहतूक पोलीस व महापालिकेचे नियंत्रण नसल्याने सर्रास नियमभंग होत आहे.
– महेश कदम, भाजप

- Advertisement -

त्यानंतर पुन्हा शहरातील आणखी पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याकरता याच कंपनीसोबत करार करण्यात आला. या यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीकरता आणखी ६३ लाख ६७ हजार ५४९ इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र आजघडीला शहरातील बहुतांश सिग्नल यंत्रणेवर बोजवारा उडालेला दिसतो. बहुतांश वेळा सिग्नल यंत्रणा ब्लिंकर्सवर टाकली जात असल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तर कित्येक सिग्नल यंत्रणेतील नादुरुस्तीमुळे वाहनचालक नियमभंग करताना दिसतात. झेब्रा क्रॉसिंग, सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने व सिग्नलस्थळी पोलीस अंमलदार नसल्याने सर्रास नियमभंग होताना दिसत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. मात्र महापालिका किंवा वाहतूक पोलिसांचे यावर कोणतेही नियंत्रण दिसत नाही. अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणेमुळेच वाहतूक कोंडी होत असल्याने शहर नियोजनाचा बोजवारा उडतो. संध्याकाळी शहरात बहुतांश ठिकाणी सिग्नलमुळेच गोंधळजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याच्या वाहनचालक व नागरिकांच्या तक्रारी आहेत.

मागील दोन वर्षांत पोलीस भर्ती झालेली नाही. त्यामुळे पोलीस अमलदारांची संख्या कमी आहे. ज्याठिकाणी पोलीस अंमलदार असतात. त्याठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरळीत असते. वाहतूक सुरळीत असते. अशा ठिकाणी सिग्नल्स ब्लिंकर्स मोडवर टाकतो. अन्य ठिकाणी ऑटो मोडवर असतात. वाहतूक व्यवस्था नियंत्रित रहावी. याकरता आमच्याकडून प्रयत्न होत असतात. सिग्नल जंम्पिंगच्या केसेसही आमच्याकडून नोंदवण्यात येत असतात. गरज म्हणूनच आणखी सिग्नलचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.
– दादाराम कारंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, विरार

- Advertisement -

दरम्यान, महापालिकेने ही सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर लावून दिलेली आहे. त्यामुळे ती योग्य प्रकारे नियंत्रित करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, असे सांगून हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अंमलदारांची संख्या कमी असल्याने या कामात थोड्या अडचणी येत असल्याचा खुलासा वाहतूक पोलिसांनी केला आहे. त्यात आता वाहतूक पोलिसांनी आणखी काही सिग्नलची गरज महापालिकेकडे व्यक्त केली आहे. आवश्यकतेनुसार शहरात हे सिग्नल लावण्यात येणार आहेत. मात्र सद्यस्थितीत असलेली सिग्नल यंत्रणाच काम करत नसताना आणखी सिग्नल यंत्रणेवर खर्च कशासाठी?, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

शहरातील कोणताही सिग्नल बंद नाही. तक्रारीनुसार आमचे पथक त्यांची देखभाल व दुरुस्ती करत असते. काही किरकोळ वायर, बल्ब व अन्य दुरुस्ती येतात. याकरता आमचे पाच कर्मचारी व एक व्हॅन सतत कार्यरत असते.
– प्रवीण कोळकर, व्यवस्थापक, मेसर्स सीएमएस कॉम्प्युटर कंपनी

पाच सिग्नल सर्वाधीक गर्दीचे

वसईतील रेंजवाला नाका, वसई एव्हरशाईन, सनसिटी, अंबाडी नाका व पार्वती थिएटर परिसरातील सिग्नलवर सर्वाधिक टॅफिक लागत असल्याचे निरीक्षण खुद्द सिग्नल यंत्रणेची देखभाव व दुरुस्ती करणाऱ्या कंपनीने नोंदवले आहे.

हेही वाचा –

दिशा सालियान प्रकरणात नारायण राणेंना दिलासा, दिंडोशी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -