घरपालघरपालघर तालुक्यातील करवाळे धरणात बुडून तरुणांचा मृत्यू

पालघर तालुक्यातील करवाळे धरणात बुडून तरुणांचा मृत्यू

Subscribe

रविवारची सुट्टी आणि उन्हाची लाहीलाही क्षमवण्यासाठी मित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा ५० ते ६० फुटावरून उडी मारल्याने पाण्याचा जोरदार फटका बसून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

रविवारची सुट्टी आणि उन्हाची लाहीलाही क्षमवण्यासाठी मित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा ५० ते ६० फुटावरून उडी मारल्याने पाण्याचा जोरदार फटका बसून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील करवाळे धरणात हा तरुण बुडाला. या घटनेची माहिती मिळताच, सफाळे पोलिसांनी सर्पमित्र ग्रुपच्या साहाय्याने तरुणाचा शोध घेतला. मात्र धरणाची खोली ६० फुटाहून अधिक असल्याने तरुणाचा मृतदेह काढण्यात यश आले नाही. अखेर पट्टीचे पोहोणारे डूबे यांच्या मदतीने सोमवारी सकाळी साडेसात वाजता १५ तासांनी मृतदेह काढण्यात यश मिळाले.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मौजमजा करण्यासाठी नवघर येथील सहा तरुण करवाळे धरणात पोहोण्यासाठी दुपारी गेले होते. त्यातील प्रविण प्रभाकर पाटील (वय २५) या तरूणाने ५० ते ६० फूट उंचीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून स्टंट करण्याच्या नादात पाण्यात उडी मारली. उंचावरून उडी मारताना प्रविणच्या छातीवर पाण्याचा जबरदस्त फटका बसून क्षणार्धात ६० फुटाहून अधिक खोल असणाऱ्या धरणात बुडाला. तो पुन्हा वर आलाच नाही. मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर प्रविण धरणाच्या तळाशी जाऊन बुडाला.

- Advertisement -

सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप कहाळे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक सर्पमित्र ग्रुपचे प्रशांत मानकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. धरणातील पाण्याची खोली जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम करूनही प्रविणचा पत्ता लागला नाही. अखेर वसई तालुक्यातील उसगाव येथील पट्टीचे पोहोणारे काही डूबे यांना मदतीसाठी बोलवण्यात आले. त्यांनी सोमवारी पहाटेपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली. यात खोल तळाशी गेलेल्या प्रवीणचा सकाळी साडेसात वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून तरुणांनी अशा प्रकारचे स्टंट करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा –

उन्हाळी सुट्टी रद्द, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिलमध्येही शाळा पूर्णवेळ सुरु राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -