घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजीवघेण्या दहशतीपुढे सारेच हतबल...

जीवघेण्या दहशतीपुढे सारेच हतबल…

Subscribe

काश्मिरी पंडितांची दहशतवाद्यांनी कत्तल सुरू केल्यावर आपला जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी ते भारताच्या इतर राज्यांमध्ये आले, पण या हत्याकांडाला आता 30 वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या हत्याकांडाविषयी कुणाला सोयरसुतक नाही असेच दिसते. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या व्यथा, वेदना, हालअपेष्टा जगासमोर आल्या आहेत. त्यांचे त्यांच्या मूळ जागी पुनर्वसन करणे वाटते तितके सोपे नाही. ज्या दहशतीमुळे त्यांना आपली घरेदारे सोडावी लागली, ती सगळ्या भारतीयांसाठी भयसूचक आहे. या जीवघेण्या दहशतीपुढे सारेच हतबल झालेले दिसत आहेत.

काश्मीरमध्ये राहणार्‍या पंडितांची लांडगेतोड दाखवणारा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या फक्त देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटावर प्रतिक्रिया देण्यासाठी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एखाद दुसरा अपवाद सोडला तर याबाबत सगळ्या दिग्गजांनी मिठाची गुळणी धरून गप्प बसणे पसंत केले आहे. मै मराठा हूँ, मराठा मरता हैं या मारता हैं, वगैरे अशी धुँवाधार संवादफेक करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणारा नरधुरंधर नाना पाटेकर यांनी या चित्रपटाच्या विषयाला बगल देताना सामाजिक शांततेचा भंग होता कामा नये, अशी सावध भूमिका घेतली.

काश्मीर हा तिथल्या निसर्गसौंदर्यामुळे भारतातील स्वर्ग मानला जातो, पण या स्वर्गात राहणार्‍या काश्मिरी पंडितांचा 30 वर्षांपूर्वी स्वतंत्र भारतात जो नरसंहार झाला, त्यांच्यावर जे अमानुष अत्याचार झाले, महिलांची अब्रू लुटली गेली, म्हणजे भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंवर जे अत्याचार, बलात्कार, हत्या झाल्या तसाच भीषण अनुभव हिंदू पंडितांना 43 वर्षांनंतर काश्मिरात आला. त्यावेळी भारतावर कुठल्या मध्ययुगीन मुस्लीम सुलतानाचे राज्य नव्हते किंवा ब्रिटिशांचे राज्य नव्हते. भारतातील लोकांचेच राज्य होते. काश्मीरमध्ये भारतीय पोलीस होते. भारतीय लष्कर होते.

- Advertisement -

असे सगळे असताना काश्मिरी पंडितांचे भीषण हत्याकांड झाले आणि पाच लाख पंडित आपल्या कुटुंबीयांसह जीव वाचवण्यासाठी भारताच्या अन्य भागांकडे पळाले. काही पंडितांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. ते अजूनही तिथेच सडत पडत जीवन जगत आहेत, पण इतकी वर्षे झाली तरी त्यांची काही व्यवस्था लावावी असे केंद्रातील कुठल्याच पक्षाच्या सरकारला वाटले नाही. उलट काश्मिरी पंडितांचा विषय सगळ्याच बाजूंनी दाबून टाकण्यात आला. अगदी प्रसारमाध्यमांनीही तो पुढे आणला नाही. यामागील एकच कारण होते की काश्मीरमध्ये हिंदू पंडितांच्या मुस्लीम दहशतवाद्यांनी आणि स्थानिकांनी ज्या हत्या केल्या, बलात्कार केले, त्यांची घरे जाळली, हे देशातील इतर लोकांना कळले, तर देशातील सामाजिक शांतता भंग होईल.

त्याचा देशाच्या इतर भागात राहणार्‍या मुस्लिमांना त्रास होईल. त्यामुळे हा विषय सगळ्याच बाजूंनी दाबून टाकण्यात आला. मुस्लिमांकडून हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यावर त्या घटना दाबून टाकण्यावर भारतातील राज्यकर्ते, बुद्धिवादी, प्रसारमाध्यमांचा कल राहिलेला आहे. अगदी फाळणीनंतर ज्या कत्तली झाल्या तेव्हा पाकिस्तानातून ज्या रेल्वेगाड्या आल्या त्यातून अनेक हिंदूंचे मृतदेह पाठवून देण्यात आले होते. हा इतिहास फार जुना नाही. मोपल्यांनी हिंदूंची केलेली अमानुष कत्तल हा तसाच प्रकार होता. या अलीकडच्या काळातील घटना आहेत. आपण मध्ययुगीन काळात जात नाही. कारण त्यावेळी ज्या अमानुष कत्तली झाल्या त्याची कल्पनाही आपल्याला सोसणार नाही.

- Advertisement -

१२व्या शतकानंतर भारतावर मुस्लिमांची आक्रमणे झाली आणि त्यांनी जे अमानुष अत्याचार केले, त्याची जी दहशत हिंदूंच्या मनावर बसलेली आहे, ती आजही उतरलेली नाही. त्यामुळे मुस्लिमांकडून जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात, तेव्हा अधिक अत्याचार होऊ नयेत म्हणून सामाजिक शांततेच्या नावाखाली सोसत राहायचे, असाच जीव वाचवणारा सुरक्षित पवित्रा हिंदू घेत आले आहेत. या देशात बहुसंख्य हिंदू असले तरी आपले ते काहीही करू शकणार नाहीत याची पूर्ण खात्री असल्यामुळेच एमआयएमचा नेता अकबरुद्दीन ओवेसी जाहीर आव्हान देऊन म्हणतो, भारतातील पोलीस अर्ध्या तासासाठी बाजूला करा, मग बघा 20 टक्के मुस्लीम 80 टक्के हिंदूंचा खात्मा करून टाकतील. असेच विधान पाकिस्तान किंवा बांगलादेशातील एखादा हिंदू नेता करू शकेल का, त्याचे काय होईल याची कल्पनाच केलेली बरी.

पाकिस्तान आणि बांगलादेशात महत्त्वाच्या उच्च पदांवर कुणीही बिगर मुस्लीम दिसत नाही. ओवेसींसारख्या नेत्यांना या देशात आपले कुणी काही बिघडवू शकणार नाही असा आत्मविश्वास येतो कुठून. कारण त्यांना इतिहास माहीत आहे. जेव्हा मध्ययुगीन काळात हिंदुस्तानात पोलीस नव्हते, तेव्हा मूठभर मुस्लिमांनी बहुसंख्य असलेल्या हिंदूंची भीषण कत्तल उडवली होती. ओवेसी यांचा पक्ष ज्या परंपरेचा वारसा सांगतो, त्या निजामाने आणि रझाकारांनी हैदराबादमध्ये हिंदूंची भीषण कत्तल केली होती. या इतिहासातूनच त्यांना प्रेरणा मिळत आहे. त्यात पुन्हा या हिंदूबहुल देशात आपल्याला न्यायालयाची ढाल बनवता येते आणि राज्यघटनेतील व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काचा फायदा घेता येतो. अकबरूद्दीन ओवेसी यांनी हिंदूंच्या कत्तलीच्या केलेल्या विधानावरून न्यायालयात खटला सुरू आहे.

इतके धक्कादायक आणि सामाजिक शांतीभंग करणारे विधान करून आता बराच काळ लोटला आहे, पण न्यायालयाकडून अकबरूद्दीन ओवेसी यांना कुठलीही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. काही लोक अशा विधानांना वेडेपणा म्हणतात, पण इतिहासाचे दाखले पाहिले तर लक्षात येईल की हिंदूंच्या ज्या भीषण कत्तली झालेल्या आहेत, त्या धर्मवेडातूनच झालेल्या आहेत. मग तो औरंगजेब असो, नाहीतर टिपू सुलतान असो. तो काळ राजेशाहीचा होता, पण १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर ४३ वर्षे झाल्यावर भारतीयांचे सरकार, लष्कर, पोलीस, न्यायालये असताना भारताचे घटक राज्य असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादी हिंदू पंडितांची भीषण हत्या करतात, त्यांना पळवून लावतात, त्यांची घरे आणि मालमत्ता काबीज करतात. त्या भीषण हत्याकांडाला आता 30 वर्षे उलटून गेली असली तरी त्या काश्मिरी पंडितांना न्याय मिळत नाही.

जगातील अनेक लोक आपत्कालीन स्थितीत भारतात आश्रयाला आले. त्यात पारशी होते, ज्यू होते, तिबेटी असे अनेक होते. त्यांना भारतीयांनी आश्रय दिला. त्यांना इथे कुठला उपद्रव दिला नाही, पण जे हिंदू पंडित या भारताचेच नागरिक आहेत, त्यांना मुस्लीम दहशतीला बळी पडून घरदारे सोडून याच देशात निराधार जीवन जगावे लागत आहे. त्यातील बर्‍याच जणांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या मुलांबाळांना शिकवले. त्यांच्यामध्ये बदल्याची भावना रुजवली नाही. हाती शस्त्र घ्यायला लावले नाही. काश्मीरमध्ये हल्ले झाले तेव्हा त्या हिंदू पंडितांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या हत्या केल्या असे कुठे दिसले नाही. त्यामुळे ती एकतर्फी कत्तल होती. ज्या वेळी काश्मिरात हिंदू पंडितांची कत्तल झाली तेव्हाही राजकारण केले जात होते आणि आताही तेच होत आहे. आताचे केंद्रातील सत्ताधारी भाजप काश्मीरमधील हिंदू पंडितांच्या हत्याकांडाला राजीव गांधी आणि फारूख अब्दुल्ला यांच्यातील राजकीय वाद कारणीभूत होता, असे म्हणत आहेत.

कारण १९९०मध्ये पंडितांच्या हत्याकांडाचा भडका उडाला, तो त्या अगोदर काही वर्षे धुमसत होता. काँग्रेस आणि सहकाही पक्षांचे नेते म्हणत आहेत की, १९९० मध्ये केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. त्यामुळे पंडितांच्या पलायनाला भाजप जबाबदार आहे. तसेच भाजपला पंडितांचा इतका कळवळा होता तर मग वाजपेयींच्या सरकारपासून ते आता मोदींचे सरकार सात वर्षे सत्तेवर आहे, त्यांनी पंडितांसाठी काय केले, असे विविध प्रश्न विचारत आहेत. सध्या ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा देशभर इव्हेंट करू पाहणार्‍या भाजप नेत्यांंना ही मंडळी उघडे पाडू पाहत आहेत. काश्मिरी पंडितांच्या भयकारी वेदना ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून निदान ३० वर्षांनंतर तरी व्यक्त झाल्या आहेत.

आपल्या देशातील पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, सेक्युलॅरिझम हा सोयीस्कर असतो. ज्यावेळी हिंदू छळला जातो, मारला जातो, तेव्हा फार महत्त्व दिले जात नाही. त्यांची व्यथा आणि वेदना अनुल्लेखाने मारली जाते, पण इतर धर्मांतील त्यात पुन्हा जर ती व्यक्ती मुस्लीम असेल आणि त्याच्या बाबतील काही अनुचित घटना घडली तर मात्र हीच पुरोगामी मंडळी आणि प्रसारमाध्यमे त्याची प्रचंड चर्चा करतात. ती अगदी जागतिक बातमी बनते. युनेस्कोसारखी आंतरराष्ट्रीय संस्था त्याची दखल घेते, पण काश्मीरमध्ये पाच लाख पंडितांना जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी आपली घरेदारे सोडून आपल्याच देशात निराश्रिताचे जीवन जगावे लागते, त्याविषयी मात्र कुणाला काही वाटत नाही. पंडितांच्या व्यथा, वेदना सोयीस्कररीत्या दफन केल्या जातात.

काश्मीर फाईल्स चित्रपटाची निर्मिती, निर्मात्यांचा त्यामागील हेतू, त्यावरून केले जाणारे हिंदू एकगठ्ठा मतांचे राजकारण, या चित्रपटातील वास्तव आणि आभास, असे अनेक पैलू या विषयाला आहेत, पण या चित्रपटाच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र पुढे आली ती फार महत्त्वाची आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर आणि समाज माध्यमांवर ज्यांनी काश्मीरमधून जीव आणि अब्रू वाचवण्यासाठी पलायन केले आणि आता कुठल्या तरी वसाहतींमध्ये कसे तरी जीवन जगत आहेत, त्या काश्मिरी पंडितांच्या थेट वेदना त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या ही गोष्ट काश्मीर फाईल्स चित्रपटापेक्षा मोठी आहे. कारण तिथे कुठलाही अभिनय नाही. आहे ती फक्त भोगलेली वेदना. पलायन केलेले अनेक काश्मिरी पंडित आणि महिला आपल्यावर काय ओढवले ते आपल्या तोंडाने सांगत आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया या पुढील काळातील चिंता वाढवणार्‍या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया फारच बोलकी आहे.

तो पंडित म्हणतो, आम्ही हिंदू पंडित जीव आणि अब्रू वाचवून इकडे आलो, पण उद्या अशाच दहशतवाद्यांनी भारतातून आपणा सगळ्या हिंदूंची कत्तल उडवून पळवून लावले तर आपण कुठे जाणार याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. ही प्रतिक्रिया खरोखरंच विचार करायला लावणारी आहे. सर्वोच्च न्यायालयात नुकताच एक विषय आला आहे. त्यातून भारतातील 10 राज्यांमध्ये हिंदू हे अल्पसंख्याक आहेत, असे निदर्शनास आले आहे. काश्मिरी पंडितांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ३७० कलम रद्द करण्याचे आव्हान पूर्ण झाले असले तरी आजवर तिथे कुणी जमिनी खरेदी केल्याच्या फारशा बातम्या नाहीत. काश्मिरी पंडित तिथे परत जायला घाबरत आहेत. याला एकच कारण आहे, ते म्हणजे मुस्लीम कट्टरवाद्यांची प्रचंड दहशत. भारतीयांचे सरकार, पोलीस, लष्कर, जगातील दुसरा मोठा लोकशाही देश, जगातील चौथ्या क्रमांकाचे लष्कर इतके सगळे असूनही या दहशतीपुढे सगळेच हतबल आहेत. आपण फक्त इस्त्रायलच्या शौर्याच्या गप्पा मारत बसतो.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -