घरमहाराष्ट्रविधान परिषदेची लगीनघाई; निंबाळकर, खडसे, अहिर, दरेकरांच्या उमेदवारीची चर्चा

विधान परिषदेची लगीनघाई; निंबाळकर, खडसे, अहिर, दरेकरांच्या उमेदवारीची चर्चा

Subscribe

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या, गुरुवारी संपत आहे. शिवसेनेत विधान परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह माजी मंत्री सचिन अहिर, नंदूरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. दिवाकर रावते यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता कमी आहे.

राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता विधान परिषदेची लगीनघाई सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या, गुरुवारी संपत आहे. शिवसेनेत विधान परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह माजी मंत्री सचिन अहिर, नंदूरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. दिवाकर रावते यांना पुन्हा संधी देण्याची शक्यता कमी आहे. सुभाष देसाई यांच्या उमेदवारीबद्दल शिवसेनेत संभ्रम असला तरी मंत्री असल्याने त्यांना सहा महिने निवडून येण्यासाठी मुदत मिळू शकते. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित आहे.

याशिवाय अमरसिंह पंडित, संजय दौंड यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीत आहे. काँग्रेसकडून भाई जगताप, नसीम खान, सचिन सावंत, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे यांची नावे दिल्लीला पाठवल्याचे समजते. भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव अंतिम आहे.

- Advertisement -

तर हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, पंकजा मुंडे आणि प्रसाद लाड यांची नावे आघाडीवर असून माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर यांचा पत्ता कट झाला आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात, मात्र आघाडी किंवा भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्यास विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ ठरेल. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने ही निवडणूक आघाडी आणि भाजपसाठी कसोटीची ठरणार आहे.

यांचा कार्यकाळ संपला

=भारतीय जनता पक्ष
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे , आर. एन. सिंह (सिंह यांचे जानेवारी २०२२मध्ये निधन झाले आहे )

- Advertisement -

=शिवसेना
सुभाष देसाई, दिवाकर रावते

=राष्ट्रवादी काँग्रेस
रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड

मलिक, देशमुखांच्या मतदानाला ईडीचा विरोध

लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो, असे प्रतिज्ञापत्र विशेष पीएमएलए न्यायालयात सादर करत अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या राज्यसभेच्या मतदानाला विरोध केला आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करणार्‍या महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर न्यायालय आज बुधवारी आपला निर्णय देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १० जून रोजी राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी विधान भवनात मतदान करण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका ईडीने विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे.

ट्रायडंटच्या बैठकीत मविआचे भाजपला गाडण्याचे आवाहन

ठाकरे-पवारांच्या उपस्थितीत एकीचा सूर

राज्यसभेची निवडणूक ४८ तासांवर येऊन ठेपली तरीही छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने महाविकास आघाडी आणि भाजपचा जीव टांगणीला लागला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार मलिकार्जुन खरगेंसह मविआतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्व आमदारांसहीत अपक्ष आमदारांची बैठक घेत एकी दाखवत राज्यसभेच्या चारही जागा जिंकणारच असा दावा केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने भाजपला गाडले तसेच या निवडणुकीत सर्व चारही जागा जिंकल्यानंतर जल्लोष करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मविआच्या बाजूने असलेले लहान पक्ष आणि अपक्ष मिळून १२ आमदार उपस्थित असल्याचे म्हटले जाते. दरम्यान राज्यातील अपक्ष आमदारांचा भाव चागंलाच वधारला असून ते सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडीने राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून काही छोट्या पक्षांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतल्याचे लक्षात येताच आघाडीने मंगळवारी सर्व आमदारांची तातडीची बैठक घेतली. राज्यसभेची तांत्रिक माहिती देण्यासाठी आमदारांची बैठक बोलावल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आमदारांचे संख्याबळ तपासण्यासाठीच ही बैठक असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या निमित्ताने महाविकास आघाडीने एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले. बैठकीत आमदारांना राज्यसभा निवडणुकीतील मतदानाबाबत कानमंत्र देण्यात आला. भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आमदारांकडे मोर्चा वळवला आहे.

अशातच काही छोट्या पक्षांनी फटकून वागायला सुरूवात केल्याने महाविकास आघाडीसाठी अडचण होऊ शकते, त्यामुळे साहजिकच आघाडीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आमदारांना एकत्र करून नेमके संख्याबळ तपासण्याचे ठरवले. त्यासाठीच ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. आघाडीचे आणि आघाडीला समर्थन देणारे अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले. छोट्या पक्षांच्या आमदारांनी काहीसा नाराजीचा सूर आळवायला सुरूवात केल्याने महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या १२ आमदारांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवली.

गीता जैन, मंजुळा गावीत, आशिष जयस्वाल, देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), किशोर जोरगेवार, संजय शिंदे, नरेंद्र भोंडेकर शामसुंदर शिंगे (शेकाप), विनोद अग्रवाल, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल,विनोद निकोले (माकप) हे बैठकीला उपस्थित होते. महाविकास आघाडीला अपक्ष आमदारांचे मन वळवण्यात यश आल्याचे यानिमित्ताने दिसून आले. दरम्यान, ट्रायडंट हॉटेलमध्ये आमदार पोहोचल्यानंतर त्यांची नोंदणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. यावेळी त्यांची स्वाक्षरीही घेतली जात होती. एकूण किती आमदार उपस्थित होते तसेच ते कोणत्या पक्षाचे होते, त्यात किती अपक्ष आमदार आहेत याची चाचपणी करण्यासाठीच ही नोंदणी करण्यात आल्याचे समजते.

गिरीश महाजन यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन मनधरणी केली, मात्र ठाकूर यांनी अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

मनसे अजूनही गप्प
प्रमोद उर्फ राजू पाटील हे मनसेचे एकमेव विधानसभा सदस्य आहेत. पक्षप्रमुख राज ठाकरे जो आदेश देतील, तो आपण पाळणार असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -