घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री ठाकरेंनी 32 चा कोटा देऊनही सेनेच्या उमेदवारांना मिळाली 26 मतं

मुख्यमंत्री ठाकरेंनी 32 चा कोटा देऊनही सेनेच्या उमेदवारांना मिळाली 26 मतं

Subscribe

शिवसेनेच्या एकूण 55 मतांच्या कोट्यापैकी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 26 याप्रमाणे 52 मते मिळाली, तसेच छोटे मित्र पक्ष आणि अपक्ष मिळून शिवसेनेकडे 64 मते होती. परंतु त्यातील शिवसेनेची 3 मते आणि अपक्षांची 9 मते फुटल्याचे म्हटले जात आहे

मुंबईः महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवारही काठावर पास झालेत. त्यामुळे शिवसेनेलाही हा एक प्रकारचा धोका मानला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांच्यासाठी 32 कोटा ठरवून दिला होता. तसेच इतरांना कोणालाही मध्यस्थी न घेता थेट उद्धव ठाकरेंनी तसं वैयक्तिकरीत्या प्रत्येक आमदाराला बजावलं होतं. परंतु सेनेच्या दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे 26-26 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची जवळपास तीन आणि सहयोगी छोटे पक्ष मिळून एकूण 12 मते फुटली आहेत. राज्यसभा निवडणुकीत 123 मते मिळविणार्‍या भाजपने या निवडणुकीत 134 मते मिळवून महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला.

- Advertisement -

भाजपकडे 114 आमदार असताना 134 मते मिळाली कशी?

शिवसेनेच्या एकूण 55 मतांच्या कोट्यापैकी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 26 याप्रमाणे 52 मते मिळाली, तसेच छोटे मित्र पक्ष आणि अपक्ष मिळून शिवसेनेकडे 64 मते होती. परंतु त्यातील शिवसेनेची 3 मते आणि अपक्षांची 9 मते फुटल्याचे म्हटले जात आहे, तर काँग्रेसकडे एकूण 44 आमदार असतानाही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मिळून फक्त 41 मते मिळाली. चंद्रकांत हंडोरे यांना 22 आणि भाई जगताप यांना 19 मते मिळाली. याचाच अर्थ काँग्रेसचीही 3 मते फुटल्याचे निष्पन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानास परवानगी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीकडे 51 मतेच उरली होती. तरीही राष्ट्रवादीने अपक्षांच्या साथीने 57 मतांची जुळवाजुळव केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे अनुक्रमे 28 आणि 29 मते घेऊन सहजपणे निवडून आले. दुसरीकडे भाजपचे प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे हे पहिल्याच पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून आले. यापैकी श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना प्रत्येकी 30 मते मिळाली, तर प्रवीण दरेकर यांना 29 मते मिळाली आणि उमा खापरे या 26 मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाल्या. प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची 17 मते पडल्याने भाजपने एकूण 134 मते खेचल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच भाजप 106 आणि 8 मित्रपक्षांचे आमदार मिळून 114 मते असूनही 18 अतिरिक्त मतांची बेगमी भाजपने केल्याचे म्हटले जात आहे. याच बेगमीच्या आधारे या लढतीचा निकाल दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या आधारे लागला आणि त्यात प्रसाद लाड यांची सरशी झाली.

एकीकडे वर्धापन दिनी शिवसेनेत कोणीही गद्दार नाही, शिवसेनेत फाटाफूट होणार नसल्याचंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं होतं. परंतु विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आहेत. मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान 20 आमदारांसह शिवसेनेचे नगरविकासमंत्री तसेच ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे थेट काल सायंकाळपासून नॉटरिचेबल असून ते थेट गुजरातमधील सुरतमधील हॉटेल मीडियनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कारभारावर गेले वर्षभर प्रचंड नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होतीच, एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचाः ठाकरे सरकारमध्ये भूकंप; ठाणे, कोकण, मराठवाड्यातील 25 आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -