घरताज्या घडामोडीमुंबईला पावसाने झोडपले ; विक्रोळीत घरावर झाड कोसळले, रेल्वे रुळांवर साचले पाणी

मुंबईला पावसाने झोडपले ; विक्रोळीत घरावर झाड कोसळले, रेल्वे रुळांवर साचले पाणी

Subscribe

मुंबईत सोमवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतील कुर्ला, सायन, विद्याविहार रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर काही प्रमाणात पाणी साचले. तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू होती. तसेच, कुर्ला, हिंदमाता, अँटॉप हिल, परळ, वडाळा, किंग्ज सर्कल, सायन, कलिना, अंधेरी सब वे आदी सखल भागात पाणी साचल्याने बेस्ट व इतर वाहनांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली. त्यामुळे साहजिकच जनजीवनावर परिणाम होऊन त्याचा मुंबईकरांना कमी – अधिक प्रमाणात फटका बसला. दरम्यान, विक्रोळी, खंडोबा टेकडीच्या परिसरात पंचशीलनगर येथे एका घरावर झाड व काही प्रमाणात दरड कोसळली. तसेच, शहर व उपनगरात ११ ठिकाणी घरे, घराचा भाग यांच्या पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.

उपनगरात जोरदार पाऊस

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, मुंबईत सोमवारपासून मुसळधार पावसाने मंगळावारी दिवसभर जोरदार बरसात केली. मंगळवारी सकाळी ८ पासून ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागापेक्षा उपनगजास्त पाऊस पडला. शहर भागात – ५८ मिमी, पूर्व उपनगरात – १०७ मिमी तर पश्चिम उपनगरात – ८४ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
आगामी २४ तासात शहर व उपनगरातील काही भागात मध्यम ते जोरदार तसेच काही भागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन आदी सखल भागात पाणी साचले

- Advertisement -

मुंबईत मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, वडाळा, किंग्ज सर्कल, सायन, शेल कॉलनी चेंबूर, अँटॉप हिल, नॅशनल कॉलेज वांद्रे, कुर्ला, मंडाला, कलिना आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे काही अवधीत निचरा करण्यात आला.

बेस्टच्या ५० बसगाड्यांची वाहतूक वळवली

मुंबईत अंधेरी सब वे, हिंदमाता, वडाळा, किंग्ज सर्कल, सायन, शेल कॉलनी चेंबूर, अँटॉप हिल, नॅशनल कॉलेज वांद्रे, कुर्ला, मंडाला, कलिना आदी ११ ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने बेस्ट परिवहन विभागाने आपल्या ५० बसगाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवली. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना त्याचा त्रास झाला.

विक्रोळीत घरावर झाड, दरड कोसळली

मुंबईत मुसळधार पावसामुळे शहर व उपनगरात मिळून ११ ठिकाणी घरे, घराच्या भिंती, घराचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये, विक्रोळी पार्कसाईट नजीक खंडोबाच्या टेकडीजवळ एका घरावर झाड व काही प्रमाणात दरडीचा भाग कोसळण्याची घटना सकाळी ८.३० वाजता घडली. त्यामुळे घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शहर भागात – २ ठिकाणी, पूर्व उपनगरात – २ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ८ ठिकाणी अशा ११ ठिकाणी घरांची व घरांच्या भिंती यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. तसेच, मुंबईत शहर भागात – ४ ठिकाणी, पूर्व उपनगरात १ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – १ ठिकाणी अशा ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत; मात्र या घटनात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मुंब्र्यात रस्ता खचला

मुंब्रा,सम्राट नगर येथे रस्ता खचल्याची घटना मंगळवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत, रस्त्याची संरक्षण भिंत धोकादायक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परिमंडळ-१चे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त (मुंब्रा प्रभाग समिती), अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

चेंबूर येथे संरक्षक भिंतीचा भाग कोसळला

मुंबईत मुसळधार पावसाची बरसात सुरू असताना चेंबूर, वाशीनाका, विष्णूनगर, भीमटोला येथे संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र गेल्या वर्षी १९ जुलै रोजी याच परिसरातील भारतनगर बंजारा तांडा वस्ती येथे दरड कोसळून १९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गतवर्षीची दुर्घटना व आता पुन्हा भिंत पडल्याची घटना पाहता स्थानिक नागरिक काहीसे भयभीत झाले आहेत.


हेही वाचा : राऊतांनी आम्हाला शिवसेनेबाबत काहीही शिकवण्याची गरज नाही – शहाजीबापू पाटील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -